computer

दिनविशेष : वाचा ‘चार्ली चॅप्लिन' बद्दल या १० महत्वाच्या गोष्टी !!

मूकपट असो वा बोलपट त्याने दोन्हीकडे आपली छाप सोडली. त्याला मुकाभिनायाचा बादशहा म्हणतात पण त्याचा ‘दि ग्रेट डिक्टेटर’ पाहिला की वाटतं हा माणूस फक्त एका पठडीत सामावू शकत नाही. आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते तुम्हाला एव्हाना समजलं असेलच. बरोबर ओळखलत. आम्ही आज बोलतोय ‘चार्ली चॅप्लिन’ बद्दल.

मंडळी आज या महान कलाकाराचा आज वाढदिवस. टूथब्रशच्या आकारातील मिशी (हिटलर आणि त्याच्यातील हे एकच साम्य), मळका कोट, मोठी पँट, डर्बी टोपी आणि छडी. असा त्याचा अवतार. सिनेमातील त्याचा वावर लोकांना त्यांची दुःख विसरायला लावायचा. विरोधाभास म्हणजे या कलाकाराचं आयुष्य काही सुखकर गेलं नव्हतं. पण स्वतःच दुःख विसरून तो दुसऱ्यांना हसवायचा हे त्याचं मोठेपण.

मंडळी, या कॉमेडीच्या बादशहाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चार्ली बद्दल १० गमतीदार गोष्टी सांगणार आहोत.

१. जन्म

खरं तर चार्लीचा जन्म कुठे झाला आणि किती साली झाला याचा ठोस पुरावा अस्तित्वात नाही. त्याच्या जन्माबद्दल त्यानेच सांगितल्या प्रमाणे तो १८८९ साली लंडनच्या दक्षिणेला असलेल्या वॅल्वॉर्थ येथे जन्मला. त्याचे आई वडील गायन आणि अभिनयातून चरितार्थ चालवायचे. चार्ली ३ वर्षांचा होई पर्यंत दोघांचा घटस्फोट झाला होता.

२. शिक्षण

चार्लीचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. तो ७ वर्षांचा असतानाच त्याला नोकरी करावी लागली. त्याला शाळेत जायलाही मिळायचं नाही. त्याची गरिबी बघून एका संस्थेने त्याला शाळेत दाखल केलं. पुढे त्याच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं आणि त्याने शाळा कायमची सोडली.

३. आईचं आजारपण

घटस्फोटानंतर चार्लीची आई हॅना चार्ली आणि त्याच्या भावाबरोबर वेगळं राहू लागली. घटस्फोटानंतर तिघांचं आयुष्य बदललं. घरात दारिद्र्य आलं. दोन वेळच्या अन्नासाठी चार्लीला नोकरी करावी लागली. या सगळ्यांचा परिणाम हॅनाच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला आणि तिला वेड्यांचा इस्पितळात भर्ती करावं लागलं. तिच्या आजारपणाचं एक कारण कुपोषण होतं.

४. रंगभूमीवर पदार्पण

आईची परिस्थिती गंभीर असताना त्याने त्याच काळात रणभूमीवर पदार्पण केलं. आई वेड्यांचा इस्पितळात असताना तो वडिलांकडे राहायला गेला. वडिलांच्या मदतीने तो एका नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या मंडळीत सामील झाला. पुढे त्याची वाटचाल नाटकांकडे झाली. त्याने नाटकांमधून अभिनयाला सुरुवात केली.

५. पहिली फिल्म

चार्लीची पहिली फिल्म होती ‘मेकिंग अ लिव्हिंग’(१९१४). त्याला स्वतःला ही फिल्म आवडली नाही. पण याच फिल्म पासूनच प्रेक्षकानी त्याला विनोदी अभिनेता म्हणून मान्य केलं.

६. चार्लीचा प्रसिद्ध अवतार

चार्ली चॅप्लिनचा जो खास अवतार आपण ओळखतो तो पहिल्यांदा दिसला ‘Mabel’s Strange Predicament’ या फिल्म मध्ये. ही फिल्म तयार झाल्यानंतर तो ‘Kid Auto Race at Venice’ या फिल्म मध्ये याच अवतारात दिसला होता. गंमत म्हणजे दुसरी फिल्म पहिल्या फिल्मच्या २ दिवसाआधी रिलीज झाली होती.

७. चार्ली चॅप्लिन आणि ऑस्कर

चार्ली चॅप्लिनला १९७२ साली त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सन्मानार्थ ‘ऑस्कर’ पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ऑस्करच्या इतिहासत एक नवीन रेकॉर्ड तयार झाला होता. स्टेजवर त्याचं आगमन झाल्यांनतर तिथे जमलेले लोक तब्बल १२ मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होती. ऑस्करच्या इतिहासात हे फक्त एकदाच घडलं आहे.

८. मिकी माऊस आणि चार्ली चॅप्लिन

डिझ्नीचा मिकी माऊस हा ‘चार्ली चॅप्लिन’ वरून प्रेरित आहे. चार्लीने त्याच्या करियर मध्ये डिझ्नी बरोबर हात मिळवणी केली होती.

९. दि ग्रेट डिक्टेटर

चार्लीने हिटलर जिवंत असताना ‘दि ग्रेट डिक्टेटर’ सिनेमात हिटलर आणि त्याच्या नाझी विचारांची खिल्ली उडवली होती. या सिनेमासाठी माणसं अनेक दिवसापासून वाट बघत होते. चार्लीचा हा पहिला वाहिला बोलपट होता. या फिल्मला ऑस्कर पुरस्कारांमध्ये ३ नामांकने मिळाली होती.

१०. चार्लीचं प्रेत पळवणारे चोर.

चार्लीचा मृत्यू २५ डिसेंबर १९७७ साली वयाच्या ८८ व्या वर्षी झाला. त्याच्या मृत्यू नंतर ३ महिन्यांनी त्याचं शव कबरीतून चोरांनी पळवलं. चार्लीच्या पत्नीला चोरांनी प्रेताच्या बदल्यात तब्बल ६,००,००० स्विस फ्रँक मागितले होते. पण चार्लीची पत्नी हुशार होती. तिने या चोरांचा फोन टॅप करून या चोरांना पोलिसांच्या हवाली केलं. त्यातील एका चोराने तिची माफी देखील मागितली.

मंडळी, या शिवाय तुमच्या कडे चार्लीचे असेच काही भन्नाट किस्से असतील तर आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required