computer

हॅरी पॉटरचं अद्भुत जग निर्माण करणाऱ्या 'जे. के. रोलिंग' यांच्या बद्दल या १२ गोष्टी माहित आहे का ?

एक संपूर्ण पिढीला भुरळ घालणाऱ्या हॅरी पॉटरच्या लेखिका जोअॅन कॅथलीन रोलिंग उर्फ जे. के. रोलिंग यांचा आज वाढदिवस.  जवळजवळ २३ वर्षांपूर्वी त्यांनी हॅरी पॉटर सिरीजमधलं पाहिलं पुस्तक लिहिलं होतं. तिथून पुढे एका अनोख्या जादुई सफरीला सुरुवात झाली. नुकतंच फँटँस्टिक बीस्ट सिरीजच्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.

मंडळी, हॅरी पॉटरला तर आपण सगळेच ओळखत असतो. पण त्याला जन्म देणाऱ्या लेखिकेबद्दल आपल्याकडे फारच थोडी माहिती असते. जे. के. रोलिंग यांच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांचं आयुष्य देखील अद्भुत आहे. चला तर त्यांच्याविषयी माहित नसलेल्या १२ अद्भुत गोष्टी जाणून घेऊ.

१. जन्म

१. जे के रोलिंग यांचा जन्म ३१ जुलै, १९६५ साली इंग्लंडच्या ग्लॉस्टरशायर भागात झाला. त्याचं बालपण फारसं सुखात गेलं नाही. त्यांच्या आई वडिलांचे संबंध सुरुवातीपासून ताणलेले होते. पुढे जाऊन आईला मेंदूच्या आजाराने ग्रासलं. याचा आजाराने त्यांचा मृत्यू झाला. 

२. लग्न

१९९२ साली त्याचं लग्न झालं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. १९९३ साली त्यांच्या मुलीचा जन्म जन्मानंतर १९९५ साली त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळाला सुरुवात झाली.  
 

३. नैराश्य

घटस्फोटानंतर त्यांच्याकडे नोकरी नव्हती. मुलीची सर्व जबाबदारी त्याच सांभाळत होत्या. त्यांच्या मनावर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे त्या खचल्या. त्यांना नैराश्य आलं. नैराश्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले. पण त्यांनी या काळाचा फायदा आपल्या लिखाणासाठी करून घेतला. आत्महत्या करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा इलाज करून घेतला.

४. आत्मा शोषणाऱ्या पिशाच्चाची कल्पना कुठून आली ?

हॅरी पॉटर सिरीजच्या तिसऱ्या भागातल्या आत्मा शोषणाऱ्या पिशाच्चाची कल्पना त्यांना त्यांच्या नैराश्येच्या काळातून सुचली.

५. हॅरी पॉटरची कल्पना कशी सुचली ?

हॅरी पॉटर सिरीजची कल्पना त्यांना १९९० साली मँचेस्टर ते लंडन रेल्वेप्रवासात सुचली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांनी ही कल्पना लगेचच एका नॅपकीनवर लिहून काढली होतं. याचा अर्थ हॅरी पॉटर पहिल्यांदा एका नॅपकीनवर लिहिला गेला होता.

६. हॅरी पॉटर पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट

१९९५ साली त्यांनी हॅरी पॉटर पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट लिहिला. या काळात त्यांच्याकडे घर नसल्याने त्या त्यांच्या बहिणीसोबत राहत होत्या.

७. तब्बल १२ प्रकाशकांनी नकार दिला

हॅरी पॉटर सिरीजचं पाहिलं पुस्तक छापण्यासाठी तब्बल १२ प्रकाशकांनी नकार दिला होता. १३ व्या म्हणजे ब्लुम्स्बरी प्रकाशन संस्थेने त्यांचं पुस्तक छापलं..

८. हर्मायनी हे पात्र कोणावर आधारित आहे ?

हॅरी पॉटर मधलं हर्मायनी हे पात्र त्यांनी स्वतःवरून घेतलंय. हर्मायनीप्रमाणे त्यांनाही पुस्तकं वाचण्याची आवड आहे.

९. आजवर हॅरी पॉटर सिरीजच्या किती कॉपीज विकल्या गेल्या आहेत ?

त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या फक्त १००० आवृत्या काढण्यात आल्या होत्या. पुढे जेव्हा या पुस्तकावर फिल्म आली, तेव्हा हा आकडा एवढा वाढला की आजवर हॅरी पॉटर सिरीजच्या ७ पुस्तकांच्या तब्बल ५० कोटी प्रती छापल्या गेल्या आहेत. अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालंय. आपल्या मराठीत देखील हॅरी पॉटर सिरीज उपलब्ध आहे.

१०. हॅरी पॉटरवर सिनेमा बनवण्यापूर्वी त्यांची कोणती अट होती ?

जे. के. रोलिंग यांनी त्यांच्या हॅरी पॉटर सिरीज सिनेमांमध्ये फक्त ब्रिटिश अभिनेत्यांनाच घ्यावं अशी अट घातली होती. पण सिनेमा पाह्यला तर लक्षात येईल की फक्त ब्रिटीशच नाही, तर स्कॉटिश, वेलश आणि आयरिश लोकांनीही या सिनेमांत कामं केली आहेत.

११. जे के रोलिंग मधला K कोणासाठी आहे ?

जे के रोलिंग मधला K हे त्यांच्या आजींच्या नावाचं अक्षर आहे. त्यांच्या आजींच नाव होतं 'कॅथलीन'. 

१२. जगातील सर्वात यशस्वी लेखिका

आज त्या जगातील सर्वात यशस्वी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. २०१० साली त्याचं नाव कोट्यधीशांच्या नावात सामील झालं होतं. त्यावेळी त्यांची संपत्ती होती तब्बल १ अब्ज अमेरिकन डॉलर्स.

१३. तब्बल १ कोटी डॉलर्सचं दान

वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठाला ‘डिजनेरेटिव्ह न्यूरोलॉजिकल क्लिनिक’ सुरु करण्यासाठी १ कोटी डॉलर्स दान केले होते. त्यांनी ४५ व्या वयात हे करण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या आई याच वयात वारल्या होत्या.

१४. हॅरी पॉटर पुस्तकाचा शेवट

हॅरी पॉटर पुस्तकांच्या सिरीजचा शेवट त्यांना ‘scar’ म्हणजे ‘घाबरणे’ या शब्दाने करायचा होता, पण हा विचार त्यांनी पुढे बदलला आणि सातव्या पुस्तकाचा शेवट ‘All was well’ या वाक्याने झाला. म्हणजेच  "शेवटी सर्व ठीक होते".

मंडळी, जे के रोलिंग याचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं. बेघर असल्यापासून ते जगातील सर्वात श्रीमंत लेखिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. या प्रेरणादायी लेखिकेला बोभाटाचा सलाम !!

 

आणखी वाचा :

हॅरी पॉटरची मराठमोळी कास्टिंग बघितली का ??

सबस्क्राईब करा

* indicates required