दिनविशेष : ५० वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट 'पिंजरा' !!

Subscribe to Bobhata

'आली ठुमकत नार लचकत', 'छबिदार छबी मी तोऱ्यात उभी', 'दे रे कान्हा चोळी अन लुगडी', 'दिसला ग बाई दिसला', 'इष्काची इंगळी डसली', 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली', 'मला लागली कुणाची उचकी',  ' तुम्हावर केली मी मर्जी बहाल.....'अशी अवीट गाणी चार दशकं जुनी आहेत यावर नव्या पिढीचा सहजासहजी विश्वास बसणार नाही.पण हे खरं आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात 'शोले' ने जो अभूतपूर्व इतिहास घडवलाय..त्या पद्धतीची अमीट मोहोर निर्माण केलेला पिंजरा हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज ५० वर्षे झाली.  मराठी चित्रसृष्टीला कित्येक कसदार चित्रपटांची निर्मिती झाली; पण 31 मार्च 1972 ला प्रदर्शित झालेल्या 'पिंजरा'च्या लोकप्रियतेचा उच्चांक आजतागायत कायम राहिला आहे.

स्रोत

एका सरळमार्गी शिक्षकाची  तमाशातल्या कलावंतीणच्या मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेली ससेहोलपटीची या चित्रपटाद्वारे  साकारलेली कथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. मराठीतले श्रेष्ठ निर्माते दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या या चित्रपटानं जगभरातल्या रसिकांनाच मोहिनी घातली. डॉ.श्रीराम लागू, निळू फुले आणि संध्या यांच्या अभिनयाची जुगलबंदी, शंकर पाटील यांचे  खुमासदार अन  काळजात कळ उमटवणारे संवाद, जगदीश खेबुडकरांची बहारदार गाणी आणि त्यांना राम कदमांनी चढवलेला नितांतसुंदर स्वरसाज अशा बहारदार मिलाफामुळं निर्माण झालेल्या या अनवट कलाकृतीची मोहिनी गेली जवळपास अर्धशक कायम आहे.

स्रोत

'पिंजरा' ची कथा प्रारंभी साधीसुधी, गावरान वळणाची वाटणारी व अखेरीस काळजावर ओरखडा उमटवणारी आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एक टिपिकल खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं अन् ग्रामस्थांना आदर्शवादाचं बाळकडू पाजणाऱ्या श्रीधरपंत या मास्तराच्या आयुष्याचा उतरत जाणारा आलेख त्यात चितारलेला आहे.  जगण्याच्या ध्येयवादातून गावात आलेल्या तमाशाच्या फडाला मास्तर  कडाडून विरोध करतात..त्या कलावंतीणला तो अपमान वाटतो..त्या अवहेलनेमुळे तिचं मन दुखावलं जातं.. आणि ' मास्तर, नाय तुला तुणतुणं देऊन तमाशाच्या फडावर उभं केलं तर चंद्रकला चंद्रावळकर नाय मी'..अशी घोर प्रतिज्ञा ती  करते. तो सूड पुरा करून जिवंतपणी स्वतःचा पुतळा बघण्याच्या मरणयातना देत मास्तरच्या आयुष्याची अक्षरशःती वाताहात करते, अशी ही कथा चित्रपटात अप्रतिमरीत्या फुलवली आहे. मास्तरच्या मुख्य भूमिकेत असलेले डॉ.श्रीराम लागू, कलावंतीण झालेली संध्या आणि आदर्शवादी आयुष्य अन वास्तववादी जगण्यातली मेख लक्षात आल्यानं प्रवाहासोबत वाहत असलेला निळू फुलेंनी रंगवलेला तमासगीर यांच्या कसदार अभिनयाच्या जुगलबंदीने चित्रपटाने आगळी उंची गाठली आहे.

स्रोत
 
जर्मन साहित्यिक हेंरिच मॅनच्या 'प्रोफेसर अनरट' या कादंबरीवर आधारित ' द ब्ल्यू एंजल' हा चित्रपट  खूप गाजला होता. जोसेफ स्टर्नबर्ग च्या या चित्रपटावरूनच 'पिंजरा'चे कथानक बेतले आहे. साध्या सोप्या शब्दांची, मधाळ चालीची या चित्रपटातील सर्वच्या सर्व नऊ गाणी तुफान हिट झाली. हल्ली त्याची रिमिक्स ही कानावर पडू लागली आहेत. 'पिंजरा' हिंदीतही त्याच नावाने, त्याच कलाकारांसोबत हिंदीतही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार आता हयात नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेली ही अजरामर कलाकृती रसिकांच्या काळजात कायम घर करून राहील हे नक्की.

लेखक - आबिद शेख, पुणे
८८०६७०६४६६

सबस्क्राईब करा

* indicates required