computer

एकाच दिवशी ९ मराठी चित्रपट प्रदर्शित होतायत....नावं बघून घ्या !!

मंडळी, हिंदीत सिनेमाचं गणित बसवण्याची जी पद्धत आहे ती मराठीत यायला आणखी बराच काळ जावा लागणार आहे असं दिसतंय. अहो का म्हणून काय विचारता. एकाच दिवशी मराठीत ९ चित्रपट रिलीज होतायत. सर्वात आधी या ९ चित्रपटांची यादी बघून घ्या.

भाई व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध), लकी, रेडिमिक्स, आसूड, प्रेमरंग, दहावी, धडपड, प्रेमवारी, उनाड मस्ती.

मंडळी, यातले २ चित्रपट नावाजलेल्या दिग्दर्शकांचे आहेत. महेश मांजरेकर यांचा ‘भाई व्यक्ती की वल्ली’ आणि संजय जाधव यांचा ‘लकी’ हे ते दोन सिनेमे. या दोन सिनेमांना सोडून वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांचा रेडिमिक्स हा सिनेमा पण स्पर्धेत आहे. या तीन सिनेमांना सोडता बाकीच्या सिनेमांचं नावही कोणाला फारसं माहित नाही.

मराठी चित्रपटांना थियेटर मिळत नाही हा दरवेळी उपस्थित होणारा प्रश्न आहे, पण एकाच दिवशी ९ चित्रपट रिलीज होणार असतील तर थियेटर तरी कसे मिळणार भाऊ

एकाच दिवशी भरमसाठ सिनेमे रिलीज होण्याची ही काय काही पहिलीच वेळ नाही. सैराट नंतर असाच एक काळ आला होता जेव्हा एकाच दिवशी ५ पेक्षा जास्त सिनेमे रिलीज होत होते. शेवटी व्हायचं काय तर त्यातला एकपण चालायचा नाही.

मंडळी, हा सगळा गोंधळ असला तरी मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसचं गणित आणि दर्जा राखण्यात काही प्रमाणात का होईना यशस्वी होत आहे असं म्हणायला हरकत नाही. २०१८ वर्ष हे याचं उत्तम उदाहरण आहे

उद्या जर सिनेमा बघण्याचा बेत आखत आहात तर सध्या तरी दोनच चांगले पर्याय आहेत. पहिला म्हणजे “भाई व्यक्ती की वल्ली”. पुलंच्या आयुष्यावर आधारित २ भागांच्या सिनेमाचा हा शेवटचा भाग आहे. पण जर तुमचा पहिला भाग बघायचा राहून गेला आहे किंवा तुम्हाला संजय जाधव यांचे सिनेमे आवडत असतील तर तुम्ही ‘लकी’ पण निवडू शकता.

आता तुम्हीच सांगा या शुक्रवारी तुम्ही कोणता मराठी सिनेमा बघणार ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required