सिंघम अजय देवगणचा वाढदिवस- त्याचा कोणता रोल तुम्हांला जास्त आवडतो?

भौ, आज आपल्या बाजीराव सिंघम म्हणजेच अजयराव देवगणसाहेबांचा हॅप्पीवाला बड्डे आहे. "फूल और कांटे" पाह्यलाय का? एकाचवेळेस दोन बाईक्सवर दोन पाय ठेवून उभा राहात एंट्री घेणारा हा हिरो आहे तरी कोण म्हणून तेव्हा जाम चर्चा झाली होती. 

तशी बॉलीवूडमध्ये चलती असते ती दिसायला सुंदर असणाऱ्या हिरोंची. या परंपरागत प्रतिमेला छेद देणारा अजयचा चेहरा तसा सर्वसामान्यच.  पण, अभिनय, दणकट शरीरयष्टी, संवाद बोलण्याची अनोखी ढब आणि डोळ्यांत अंगार असलेल्या या अभिनेत्यानं गेल्या २७ वर्षांत अभिनयाची एकेक शिखरं पादाक्रांत करून सर्व थरातल्या प्रेक्षकांची वाहवा मिळवलीय. एकच एक भूमिकेत अडकून न पडता ऍक्शनपट, कॉमेडी, थ्रिलर आणि हॉरर अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका या भावानं साकारल्या आहेत. 

स्रोत

आता हिंदी सिनेसृष्टीत कुणाचं कोण काय लागतं हे तर सगळ्यांना माहित असतं. तरीही आम्ही सांगतोच! तर, अजयराव आपल्या काजोलचे मिष्टर, तनुजाचे जावई आणि शोभना समर्थांचे नातजावई! पण त्याही आधी फाईटमाष्टर वीरु देवगणांचे चिरंजीव. तसं पाहायला गेलं तर आपल्या मुंबईचा छोकरा.  मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं चित्रसृष्टीत दाखल व्हायचा निर्णय घेतला. फुलटू कडक ऍक्शन आणि अभिनय क्षमतेच्या बळावर  १९९१ ला आला 'फुल और कांटे'!! एंट्रीलाच त्यानं पडदा गाजवला. अन मग त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. गेल्या २७ वर्षात अजय देवगणने एकापेक्षा एक भारी सिनेमे दिलेत.  कंपनी,लिजेंड ऑफ भगतसिंग, हम दिल दे चुके सनम,  ओंकारा,गंगाजल, अपहरण, गुलाल, शिखर, राजनीती, हम किसी से कम नही, गोलमाल, रेनकोट, प्लॅटफॉर्म,लज्जा दृश्यम, रेड असे निरनिराळ्या जातकुळीचे सव्वाशे चित्रपट त्याने केलेत.  

स्रोत
'सिंघम'मधला  बाजीराव सिंघम तर ब्येष्टच!!   गोलमाल, बोलबच्चन, इष्क आदी चित्रपटांतील त्याच्या बहारदार विनोदी भूमिकांना रसिकांची वाहवा मिळालीय. तसा हा पुरस्कार सोहळ्यांमध्ये कधी रमला नाही. प्रसिद्धीसाठी कुठल्या खटाटोपी केल्या नाहीत.शांत, संयमी पण निग्रही स्वभावाच्या या अभिनेत्याला 'फूल और कांटे, कंपनी या चित्रपटांसाठी  उत्कृष्ठ नायक म्हणून पुरस्कार मिळाले. अजयने फक्त हिरोच्याच नाही, तर खलनायकाच्याही भूमिका केल्या आहेत. 'दिवानगी' मधील भूमिकेसाठी उत्कृष्ठ खलनायकाचाही पुरस्कार त्याला मिळालाय.

 गंगाजल, अपहरणसारख्या चित्रपटांतील नायकाप्रमाणेच खाकीमधली त्याची खलनायकी भूमिकाही गाजली. ओंकारा, रेनकोट, प्लॅटफॉर्म, दृश्यमसारख्या समांतर चित्रपटांमधला त्याचा अभिनय लाजवाब ठरला. चार वर्षापूर्वी यशराज फिल्म्सच्या शाहरुख खान अभिनित 'जब तक है जान' समोर त्याच दिवशी आपला 'सन ऑफ सरदार' प्रदर्शित करून बॉक्स ऑफिसवर आपला चित्रपट यशस्वीही करून दाखवला. हिंदी चित्रपटसृष्टीतील  उत्कृष्ठ कामगिरीबद्दल भारत सरकारने 'पदमश्री' प्रदान करून या सिंघमचा सन्मान केलाय. 

स्रोत

अजय देवगण त्याच्या फिल्मी करिअरशिवाय त्याच्या साधेपणाबद्दलही बराच प्रसिद्ध आहे.  सर्वसामान्यांना आपल्याश्या वाटणाऱ्या या अभिनेत्याच्या साधेपणाचे  असे अनेक किस्से वाई पाचगणी भागात चर्चिले जातात. कारण त्याच्या बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण त्या भागात झाले आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही जमिनीवर पाय घट्ट जमिनीवर रोवून उभ्या असलेल्या सिंघम अजय देवगणचा आज वाढदिवस. वयाची ४९ वर्षे पूर्ण करून त्याने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलंय हे त्याच्या बलदंड शरीरयष्टीकडे पाह्यल्यावर खरं वाटत नाही. हिंदी व मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही रस दाखवणारा बॉलिवूडचा हा 'सिंघम' यापुढेही दर्जेदार, करमणूकप्रधान चित्रपटांची परंपरा कायम ठेवेल यात शंका नाही.
 
(आबिद शेख, पुणे)
(मोबाईल- 8806706466)

सबस्क्राईब करा

* indicates required