१९५१ सालीही बॉलिवूड मध्ये होतं 'कास्टिंग काऊच'...वाचा या फोटोमागची खरी कहाणी !!

सोशल मिडीयावर व्हायरल होण्याचं जे फॅड आलेलं आहे ते सुरु झाल्यापासून बॉलीवूड मधला एक फोटो सोशल मिडीयावर सतत फिरत आहे. हा फोटो आहे एका ऑडिशनचा. या फोटो मध्ये एक मुलगी आपल्या अंगावरचे कपडे काढत आहे आणि २ पुरुष तिला बघत आहेत. या फोटो बद्दल असं म्हटलं जातं की, जुन्या बॉलीवूडच्या ऑडिशन्स अश्या प्रकारच्या असायच्या. मुलींना त्यांच्यातल्या कलेच्या आधारावर काम न देता अश्या प्रकारच्या किळसवाण्या पद्धतीने त्यांना फिल्म ऑफर केली जायची. खरं तर हे आजही बदलेलं नाही.

या फोटो बद्दल म्हणायचं झालं तर हा एक व्हायरल फोटो आहे त्यामुळे आम्हाला त्याच्या खरेपणावर शंका होती. म्हणून आम्ही बरीच शोधाशोध केली तेव्हा माहित पडलं की हा फोटो फोटोशॉप किंवा खोटा नसून तो अस्सल आहे.

यात हातात सिगरेट असलेली व्यक्ती आहे ‘अब्दुल राशिद कारदार’. हा फोटो १९५१ साली ‘जेम्स बर्क ’ या फोटोग्राफरने घेतला होता. १९५१ च्या आसपास कारदार यांच्या ‘दिल-ए-नादान’ या फिल्मसाठी नवीन चेहऱ्यांच्या शोधात एक स्पर्धा भरवली गेली होती. स्पर्धेतील फायनलिस्टच्या स्क्रीन टेस्टच्या दरम्यान हा फोटो घेण्यात आल्याचं म्हटलं जातं. यावेळी काढलेला हा एकच फोटो नसून असे बरेच फोटो त्यावेळी काढले गेले होते. शेवटी या स्पर्धेतून २ हिरोईन्स ना निवडण्यात आलं आणि १९५३ साली फिल्म रिलीज झाली. बॉलीवूड मधल्या कास्टिंग काउच या प्रकाराचं त्याकाळातील हे एक उदाहरण असल्याचं म्हटलं जातं.

सर्व फोटो स्रोत

 

ए. आर. कारदार कोण होते ?

अब्दुल राशिद कारदार (१९०४-१९८९) यांना ए. आर. कारदार या नावाने ओळखलं जातं. कारदार हे त्याकाळातील ‘शहाजहान’, ‘दिल्लगी’, ‘दुलारी’, ‘दिल दिया, दर्द लिया’ या हिट सिनेमांचे दिग्दर्शक होते. त्यांनी उभारलेला कारदार स्टुडीओ हा त्याकाळातील प्रतिष्ठित आणि आधुनिक फिल्म स्टुडीओ म्हणून ओळखला जायचा. या स्टुडीओ बद्दल एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे कारदार स्टुडीओ मधला मेकअप रूम हा पहिला असा मेकअप रूम होता जिथे ‘एसी’ लावलेला होता. ही त्याच्या श्रीमंतीची झलक होती.

ए. आर. कारदार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांना संधी दिली होती. मजरूह सुल्तानपुरी यांनी गीतकार म्हणून आपल्या करीयरची सुरुवात शाहजहान फिल्म पासून केली. नौशाद या संगीत दिग्दर्शकाला कारदार यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी दिली होती. त्याचबरोबर महेंद्र कपूर या दिग्गज गायकातील कलागुणांना कारदार यांनीच एका टॅलेंट शो मध्ये हेरलं होतं. मोहंम्मद रफी यांचं त्या काळातील सुपरहिट गाणं ‘सुहानी रात ढल चुकी’ हे कारदार यांच्याच ‘दुलारी’ या फिल्म मधलं होतं.

मंडळी, कारदार यांनी फिल्मी जगताला काही हिट सिनेमे दिले यात वाद नाही, पण या दृश्यातून त्यांची एक काळी बाजू समोर येते हे मात्र खरं.

सबस्क्राईब करा

* indicates required