computer

३०० तरुण मराठी कलाकारांना घेऊन तयार झालेला मराठी चित्रपट 'युथट्युब'...

Subscribe to Bobhata

सध्याची तरूण पिढी सोशल मिडिया  आणि युट्युबवर रमताना  दिसतेय. त्यातून काहींची मैत्री होते तर काही लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स पण येतात. आजच्या या युट्युबवर वाढलेल्या पिढीसाठी  मैत्रीची नवीन ओळख करून देणारा,  कॉलेजमधली दंगा-मजामस्ती-सच्ची दोस्ती दाखवणारा,  त्याचबरोबर  लैंगिकता-महिलांच्या विविध समस्यावर वाचा फोडण्यासाठी प्रत्येकाच्या मनाला भिडणारा आणि विचार करायला लावणारा युथट्युब नावाचा सिनेमा  घेऊन येत आहेत दिग्दर्शक, लेखक ,निर्माते आणि मिरॅकल्स अॅक्टींग अकॅडमीचे संचालक-- ' प्रमोद प्रभुलकर'!!
 
हा युथट्युब सिनेमा येतोय १ फेब्रुवारीला. त्यानिमित्ताने बोभाटाच्या प्रतिनिधीने प्रमोद प्रभुलकरांशी साधलेला हा मनमोकळा संवाद...
 

युथट्युब या चित्रपटाच्या नावामागचं गुपित काय आहे??

-युथट्युब हा चित्रपट पूर्णतः तरुण पिढीवर बेतलेला अफलातून सिनेमा आहे. हे पब्लिक युट्युबवर आणि फेसबुक-ट्विटर-इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर वाढलेली आहे. हातात सतत मोबाईल हवा आणि सोबत लॅपटॉप असणं ही त्यांची मूलभूत गरज बनली आहे. अर्थात या गॅझेटसच्या आहारी गेल्यामुळे त्यातून विविध समस्याही निर्माण झाल्या आहेत. अशा या पिढीच्या आयुष्यावर बेतलेला  हा  युथट्युब  चित्रपट आहे. यातली बहुतेक पात्रं  १६-२५ या वयोगटातली  आहेत.

एकाच वेळी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ह्या तिन्ही भूमिका निभवताना कसा अनुभव होता आणि हा प्रवास कधीपासून सुरु झाला?

- माझाच चित्रपट असल्याने दिग्दर्शक, लेखक  होणं साहाजिकच आ. हे तसं म्हटलं तर अवघड देखील आहे. निर्माता म्हणाल तर,  मला परिस्थितीने या चित्रपटासाठी  निर्माता केलंय. पण एकूणच युथट्युब चित्रपटासाठी तीन भूमिका निभावतानाचा अनुभव कमाल होता. हां,  दिग्दर्शक म्हणूनच्या प्रवासाबद्दल सांगायचे तर खूप वर्षापूर्वी कॉलेजात असताना मराठी वाड्:मय मंडळाच्या एका कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांची ओळख झाली. पुढे त्यांना संपर्क केला, तर तेव्हा त्यांनी ४ महिने माझी परीक्षा घेतली. चार महिन्यानंतर मला संजय सूरकर ह्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 'चौकट राजा' सारखा चित्रपट देणाऱ्या संजय सूरकरांकडे काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. त्यानंतर मी पाच-सहा वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 

सहाय्यक दिग्दर्शक ते दिग्दर्शक याबद्दल काय सांगाल?

--रावसाहेब, घराबाहेर, तू तिथे मी, इंद्रधनुष्य सिरीयल, गोड गुपित, ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझं घर, फिनिक्स आणि आता १ फेब्रुवारीला येणारा युथट्युब या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहे. सोशल मेसेज आणि मनोरंजनाचा मेळ घातलेले हे सर्व चित्रपट आहेत. तसाच युथट्युबसुद्धा मनोरंजनासोबतच सोशल मेसेज देणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा चित्रपट आहे.

युथट्युब या चित्रपटात प्रामुख्याने कोणत्या समस्या दाखविण्यात आल्या आहेत?

--युथट्युब हा तरूणाईवर बेतलेला चित्रपट असल्याने तरूणाईच्या समस्या मांडणारा हा चित्रपट आहे. यात समाजमाध्यमांचा अतिवापर,  त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, सेक्स विषयी पालकांसोबत न होणारा संवाद, महिलांवर होणारे अत्याचार-बलात्कार अशा विविध समस्यांवरचा सोशल मेसेज त्याचबरोबर मनोरंजन प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सेक्सविषयी या चित्रपटात नेमकं काय मांडलं आहे

-- खरं सांगायचं तर सेक्स याविषयी या तरुण मंडळींना माहित असतंच असं नाही. एकतर  कोणीतरी समवयस्क गटातलं काहीतरी सांगतं, त्यांचे ऐकून यांच्या डोक्यात काहीतरी फँटसीज आणि कल्पना तयार होतात. पॉर्न व्हिडीओ आणि खऱ्या आयुष्यातला सेक्स हा तर आणखी दुसराच मुद्दा आहे. एकूणातच सेक्सविषयी गैरसमज प्रचंड आहेत. या चित्रपटात काही सेक्स समस्या देखील मांडण्यात आल्या आहेत. सिध्दांत धोत्रे हा सेक्स डॉक्टरचं पात्र यात साकारत आहेत.

लैंगिक शिक्षण याविषयी तुम्हाला काय वाटतं?

--खरंतर लैंगिक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. शालेय जीवनापासून लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी हातभार म्हणून आम्ही आता लहान मुलींच्या, पिडीतग्रस्त महिलांच्या समस्येवर आधारित छोट्या स्वरूपात मुलाखत व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर करत आहोत, जेणेकरुन जनजागृती होईल आणि आवाज समाजापर्यंत पोहचेल.

युथट्युब या चित्रपटात ३०० नवीन कलाकरांना प्लॅटफॉर्म मिळत आहे याविषयी काय सांगाल...

--मिरॅकल्स अकॅडमीच्या कलाकार -तंत्रज्ञ एकूणच टीमबरोबर नवीन चित्रपट साकारला आहे. यात माझ्याच अकँडमीच्या ३०० कलाकाराना प्लॅटफॉर्म मिळाला आहे हे सांगताना अभिमान वाटतो. शिवानी बावकर, पौर्णिमा डे, शर्वरी गायकवाड, मृण्मयी कुलकर्णी, सिध्दांत धोत्रे, विनय रावल, रतीश आरोलकर, अनिकेत वाघ  हे प्रमुख भूमिकेत आहेत, तर याशिवाय इतर ३०० नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. नेहमीची स्टारकास्ट प्रेक्षक देखील बघून कंटाळले असतील तर त्याच्यासाठी नवीन कलाकाराचा युथफुल चित्रपट नक्कीच मनोरंजनाची मेजवानी ठरेल.

मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मिडिया प्रा.लि यांच्या प्रवासाविषयी...

- आमच्याकडे जे जे या विश्वातील ज्ञान आहे ते समाजातील सर्वांना सांगावं यासाठी २००२ मध्ये मिरॅकल्सची स्थापना झाली. माझी ( प्रमोद प्रभुलकर ) आणि मधुराणी प्रभुलकर आम्ही ही अकॅडमी याच उद्देशाने स्थापन केली आहे. अभिनयाची आवड असेल तर वयाची, कसे दिसता, कोणत्या क्षेत्रात काम करता अशी कोणतीही अट नाही. फक्त अभिनयाची आवड हवी. या सगळ्या लोकांना  दर रविवारी आमच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

युथट्युब चित्रपट असो की इतर काही प्रोजेक्टस, मधुराणी प्रभुलकर यांची साथ कशी लाभते आणि त्यांच्या कवितेचं पान या वेबसिरीजविषयी सांगा.

- माझ्या आयुष्यातील प्रत्येक पायरीवर तिने मला साथ दिली आहे. या युथट्युब चित्रपटात तिचा अगदी छोटा रोल असला तरी चित्रपटाच्या इतर गोष्टींत तिचा मोठा वाटा आहे. कवितेचं पान या विषयी म्हणायचे तर कवितेची आवड असणाऱ्यांसाठी आणि नसणाऱ्यांसाठी आवड निर्माण व्हावी म्हणून हे कवितेचं पान आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

युथट्युब मधील टॅगिंग, दोस्ती आणि रूमझुम रूमझुम ही गाणी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहेत. हा लोकांचा प्रतिसाद तुम्हांला कसा वाटतोय?

--प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या गाण्यासाठी मिळत आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत संगीत यांची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर मधुराणी प्रभुलकर, सायली केदारे, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना आर्या आंबेकर, शिखा जैन ,सायली पंकज,सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे.

शिवानी बावकर (शितली) हिचा पहिला सिनेमा याविषयी काय सांगाल.

शिवानी बावकर ही मिरॅकल्स  अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. तिचे या चित्रपटात एक वेगळे पात्र  आणि प्रमुख भूमिका आहे. प्राची कर्णिक हे पात्र या चित्रपट साकारत आहे. शितली सारखीच प्राची कर्णिक पण प्रसिद्ध नक्की होईल आणि प्रेक्षकांना आवडेल. त्यामुळे प्रेक्षकांनी १ फेब्रुवारीला युथट्युब जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा.

 

लेखिका : प्रज्वली नाईक

सबस्क्राईब करा

* indicates required