computer

बॉलीवूडने ही पोस्टर्स हॉलीवूडमधून ढापलीयेत...बघा तर यात तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव आहे का !!

आपल्या हिंदी सिनेसृष्टीत ढापण्याची परंपरा खूप मोठी आहे. काही जणांनी तर फक्त उचलेगिरी करुन आपली करियर्स केली. जुन्या जमान्यात इंटरनेटचा इतका प्रसार न झाल्यानं ही चोरी खपून जायची. गाणी, कथा, पोस्टर्स.. अगदी हवं ते उचललंय आपण हॉलीवूडमधून.  पण आजकाल या चोऱ्या लपून राहात नाहीत बरं मंडळी!!
चला तर मग पाहूयात उचलेगिरीचे काही नमुने.. 

गझनी आणि हल्क

गंमत म्हणजे हे दोन्ही सिनेमे एकाच वर्षी म्हणजे २००८ला आले होते. कदाचित त्यामुळंच त्यांच्या पोस्टरमध्ये इतकं साम्य असेल, नाही का?

जब तक हैं जान आणि टोटल रिकॉल

हे दोन्ही सिनेमेही एकाच वर्षी २०१२ ला रिलीज झाले होते. स्पेशल फोर्सेस आणि जब तक हैं जानच्या पोस्टरमध्येही साम्य आहे, पण दोन्ही पोस्टर्समधल्या पोझेस वेगवेगळ्या आहेत. 

आशिक बनाया आपने आणि ३-आयर्न 

२००५ला आलेल्या आशिक बनाया आपनेचं पोस्टर ३-आयर्न नावाच्या कोरियन सिनेमाच्या पोस्टरवरुन घेतलं होतं. आपल्याला भाषेबिषेचा काय फरक पडत नाय, आवडलं  की कॉपी केलं!!

काईट्स आणि द नोटबुक

हे आहे २०१०साली आलेल्या काईट्सचं पोस्टर. हो, बार्बरा मोरी आणि आपल्या हृतिकचं प्रकरण असल्याच्या बातम्या या सिनेमाच्या वेळेसच आल्या होत्या. खरं खोटं आता त्यांनाच माहित. हो, पण हे पोस्टर २००४साली आलेल्या द नोटबुकच्या पोस्टरवरुन ढापलंय हे आम्हांला चांगलंच माहित आहे.. 

मौसम आणि टायटॅनिक

२०११साली आपल्याकडे मौसम नावाचा एक पिक्चर येऊन गेला. तो आल्याचं आणि गेल्याचंही कुणाला कळालं नाही ते सोडा. पण त्यांनी १९९७च्या जगप्रसिद्ध टायटॅनिकच्या पोस्टरवरुन उचलेगिरी केली होती. 

धूम ३ आणि  द डार्क नाईट

आपला परफेक्शनिस्ट आमीर खानचे सिनेमे पण यात मागे नाहीत बरं.. त्याच्या धूम ३ चं पोस्टर द डार्क नाईटवरुन घेण्यात आलं होतं. 
 

पिके आणि क्विम बॅरियर्स

हे पुन्हा एकदा आमीर खानच्याच सिनेमाचं चोरुन केलेलं पोस्टर. हे आमीरकाका स्वत: मी यंव केलं, त्यंव केलं, असं प्रत्येक सिनेमाच्या वेळेस करत असतात. जरा चोरलेल्या गोष्टींचं क्रेडिटपण द्यायला शिका सांगा कुणी त्यांना..
 

हलचल आणि माय बिग फॅट ग्रीक वेडिंग

प्रियदर्शनचे सिनेमे म्हणजे धमाल असते. त्यातलाच एक धमाल सिनेमा आहे हलचल. मात्र त्याचं पोस्टर ढापलं होतं माय बिग फॅट ग्रीक वेडिंगवरुन, तर राहिलेला सिनेमा ढापला होता 'घायाळ' या मराठी सिनेमावरुन!! आहे की नाही चोरीची कमाल. हे म्हणजे आपली रंजना मुंबईचा फौजदारमध्ये एकीकडून वांगी, दुसरीकडून खोबरं-लसूण तर तिसरीकडून कोथिंबीरीच्या चार काड्या उसन्या आणून भरलं वांगं करते, त्यातली गत म्हणायची.. 

फुँक आणि चेसर

फुँक आणि द चेसर या दोन्ही सिनेमांची गोष्ट खूप वेगळी आहे. फुँक म्हणजे आपला तोच तो चित्रविचित्र आवाज काढून घाबरवणारा  भूतांचा भारतीय पिक्चर तर द चेसर आहे गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या एका डिटेक्टिव्हचा साऊथ कोरियन सिनेमा.. 

गुलाल आणि द शिल्ड

अनुराग कश्यपचा गुलाल अंगावर येणारा सिनेमा आहे.. बघितला नसाल तर पाहाच असं आमचं बोभाटाच्या वाचकांना सांगणं आहे. हो, हा सिनेमा जसा अनुरागचा आहे, तितकाच तो पियुष मिश्राचा देखील आहे. पण इतक्या चांगल्या सोन्यासारख्या सिनेमानंसुद्धा माती खाल्ली आणि द शिल्ड या पिक्चरचं पोस्टर कॉपी केलं.

जॉनी गद्दार आणि द बिग लेबोस्की

चांगल्या सिनेमांना काहीतरी शाप असतो. ते तुफान दे-मार असे चालतच नाहीत. जॉनी गद्दार हा असाच एक सिनेमा. त्यांनी बिग लॅबोस्कीचं पोस्टर ढापलं...

अग्ली और पगली आणि टील डेथ

डोकं बाजूला ठेवून टाईमपास करण्याचे काही मूव्ही असतात. अगली और पगली त्यातलाच एक. तेव्हा मल्लिका शेरावत जरा चालायचीसुद्धा. गेल्या वर्षी तिनं फ्रान्समधल्या घराचं भाडं थकवलंय  अशी बातमी होती. या सिनेमाचं आणि टिल डेथ सिनेमाचं पोस्टर अगदी सेम टू सेम आहे.

ऐतराज आणि द ग्रॅॅज्युयेट

प्रियांका चोप्रा व्हॅम्प असलेला ऐतराज हा एक मस्त सिनेमा होता. सहसा आपला हिंदी किंवा मराठी सिनेमा चालू झाला की पुढं काय होणार हे लगेच सांगता येतं. हा सिनेमा पाहाताना ते अंदाज कधी कधी मस्त चुकतात. या सिनेमानं द ग्रॅज्युएट या सिनेमाच्या पोस्टरवरुन आयडिया उचलली होती.

नक्शा आणि सहारा

नक्शा...कधी ऐकलंय का या सिनेमाचं नांव? लहान मुलांची गोष्ट असते ना, कुठेतरी गुप्त खजिना आहे आणि त्याचा नकाशा सांकेतिक भाषेत कुठेतरी लपवून ठेवलाय.. हो, तसलाच होता हा सिनेमा. कथेतच ओरिजिनॅलिटी नाहीय, मग पोस्टरमध्ये कशी असेल बरं?

अतिथी तुम कब जाओगे आणि लायसन्स टू वेड

अतिथी तुम कब जाओगे हा तसा बरा सिनेमा होता. त्यांनी लायसन्स टू वेड सिनेमाचं पोस्टर कॉपी केलं होतं.

जिस्म २ आणि स्कीन

जिस्म आणि स्कीन.. नावातच सगळं हाय ना राव!! आणि नावासारखंच पोस्टर करायचं म्हटल्यावर ते तरी दुसरं काय करणार!!

हिस्स आणि किंग आर्थर : द लिजंड ऑफ द स्वोर्ड

आपल्या मल्लिका शेरावतचा आणखी एक सिनेमा आहे 'हिस्स'.. याचं पोस्टर किंग आर्थर : द लिजंड ऑफ द स्वोर्ड या सिनेमावरुन घेतलं होतं. दोन्ही पोस्टर्स सिनेमाची मध्यवर्ती संकल्पना चांगली दाखवतात, ते फक्त दुसऱ्यांचं काम न उचलता स्वत:चं केलं असतं तर जरा बरं झालं असतं. 

अनजाना अनजानी आणि अॅॅन एज्युकेशन

अन्जाना अन्जानी तसा बरा होता. त्यांनीदेखील पोस्टर बनवताना डोक्याला जास्त त्रास न देता सरळ एज्युकेशन सिनेमाची कॉपी मारली आणि दिलं ते आपल्याकडे धाडून!!

रावडी राठोड आणि द रिप्लेसमेंट किलर्स

आपल्या राजू भाटीयाला आधी खिलाडी सिरीज मिळाली आणि नंतर साऊथ इंडियन स्टाईल मसाला सिनेमे. त्यातलाच हा रावडी राठोड..  बघा बरं रावडीचं आणि रिप्लेसमेंट किलर्सचं पोस्टर शेम टू शेम वाटतंय का ते?

बाहुबली आणि सिमॉन ब्रीच

राजमौलीच्या बाहुबलीनं बरेच रेकॉर्ड्स मोडले आणि तमाम बॉलीवूडला "कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा" या प्रश्नानं सतावलंसुद्धा. पण बघितलं, या असल्या सोन्यासारख्या सिनेमानं पण दुसऱ्यांचं पोस्टर कॉपी करुन माती खाल्ली..

 

हे तर मंडळी झाले काही नमुने.. तुम्हांलाही आणखी उदाहरणं माहितीच असतील. सांगता का मग आम्हांला पण त्या सिनेमांची नावं ??

सबस्क्राईब करा

* indicates required