computer

भारतीय सिनेमात ८० वर्षांपूर्वी चक्क एक बाई स्टंटस करायची?? वाचा या जिगरबाज बाईबद्दल..

मंडळी, एखाद्या अभिनेत्याने अॅक्शनपटात स्वतःच स्वतःचे स्टंट केले तर ती मोठी बातमी बनते. आज अशा प्रकारचे स्टंट करणारी अभिनेत्री तशी अभावानेच आढळेल. पण तुम्हाला माहित आहे का आजपासून ८०-९० वर्षापूर्वी भारतीय सिनेमातली पहिली स्टंटवूमन होऊन गेली. ज्या काळात मुली राजकुमारी, प्रेमिका सारखे रोल्स करायच्या त्याकाळात तिने नवीन पायंडा घालून दिला. कोण होती ती ? चला जाणून घेऊ !!

 

तिचं नाव होतं 'मेरी अॅन एव्हान्स'. तिचा जन्म ८ जानेवारी. १९०८ साली ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे झाला होता. तिचे वडील हे ब्रिटीश सैन्यात होते. वडिलांसोबत ती वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी मुंबईत आली. १९१५ साली वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. तिला लहान वयातच स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं. पण तिने आपली वेगळी वाटही धरली होती.

मेरीने घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बॅले, टॅप डान्स, अशी कौशल्ये आत्मसात केली. तिच्या या कौशल्यानेच पुढे तिला स्टंटवूमन म्हणून नाव मिळवून दिलं. आज सिनेमात बॉडी डबल वापरून स्टंट केले जातात, पण तिने त्याकाळी कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सगळे स्टंट केले होते.

 

पुढे तिने ‘झार्को सर्कस’ मध्ये काम सुरु केलं आणि त्यानंतर ती सिनेमात आली. तिचा सर्वात गाजलेला सिनेमा होता १९३५ सालचा ‘हंटरवाली’. या सिनेमापासूनच तिने आपलं मेरी हे नाव बदलून ‘नादिया’ नाव लावायला सुरुवात केली. ब्रिटीश सत्तेच्या काळात सिनेमाही बदलत होता. एक महिला अन्यायाशी लढत आहे हे कथानक त्या काळात सर्वाधिक गाजलं होतं. तिच्या सिनेमाने त्याकाळी रोकॉर्ड तर बनवलाच पण महिलांसाठी एक नवीन उदाहरण उभं केलं.

तिच्या सिनेमांच्या यशानंतर तिची प्रसिद्धी भारताबाहेर जाऊन पोहोचली. ग्रीस, इटली, फ्रांस इत्यादी देशात तिचे चाहते होते.

तिच्या कामाप्रमाणेच तिच्याकडच्या गोष्टीही अॅक्शनपटाला शोभेल अशा होत्या. तिने आपल्या घोड्याला ‘पंजाब का बेटा’ हे नाव दिलं होतं तर कुत्र्याला ‘गनबोट’ नाव दिलं होतं. ती आपल्या कारला ‘रोल्स रोयस की बेटी’ म्हणायची.  

नादियाला सगळे फियरलेस नादिया म्हणायचे. सिनेमाच्या पोस्टरवरही ‘फियरलेस नादिया’ हेच नाव असायचं. तिच्या कामातून तिने हे नाव सार्थ करून दाखवलं होतंच. आज आपल्याकडे स्त्री केंद्रस्थानी असलेल्या फिल्म्स तयार होत आहेत. त्याची खरी सुरुवात ही नादियाने केली होती असं म्हणायला हरकत नाही.

अशा या डेरिंगबाज 'मेरी अॅन एव्हान्स' उर्फ फियरलेस नादियाचा ९ जानेवारी, १९९६ साली मृत्यू झाला. बोभाटा तर्फे तिला आदरांजली.

जाता जाता :

गेल्यावर्षी गुगलने तिच्या ११० व्या वाढदिवसानिमित्त डूडलद्वारे तिला मानवंदना दिली होती. विशाल भारद्वाजने रंगून सिनेमात कंगना राणावतच्या पात्राद्वारे अशीच मानवंदना देण्याचा प्रकार केला होता. पण तो सिनेमा दणकून आपटला !!

सबस्क्राईब करा

* indicates required