computer

गेम ऑफ थ्रोन्स- ही गाण्यातली जेनी कोण आहे आणि हे गाणं सेव्हन किंगडममध्ये प्रसिद्ध आणि तितकंच महत्त्वाचं का आहे?

Subscribe to Bobhata

आठव्या सीझनचा दुसरा एपिसोड, 'अ नाईट ऑफ सेव्हन किंग्डम्स'मध्ये पॉड्रिक एक गीत गातो. तेच गाणं एपिसोडच्या अंतिम श्रेयावलीतही आहे. त्या गाण्याला म्हणतात, 'जेनीज् साँग'. आता ही जेनी कोण? तर जेनी म्हणजे जेनी ऑफ ओल्डस्टोन. डेनेरिसचे वडील एरीस (दुसरा) टार्गेरियन अर्थात मॅडकिंग त्याचा काका डंकन टार्गेरियनची ही बायको. ती सामान्य घराण्यातील होती. डंकनचे वडील एगॉन (पाचवा) टार्गेरियन याने डंकनचं लग्न लियोनेल बराथियनच्या मुलीशी ठरवलं होतं. ते डावलून आयर्न थ्रोनच्या वारसाने कुणा सामान्य स्त्रीशी लग्न करणं एगॉनला अर्थातच पसंत पडलं नाही. परंतु डंकनचं जेनीवर एवढं काही प्रेम होतं की, त्यापायी त्याने सिंहासनावरील अधिकार स्वखुशीने सोडला. त्यामुळे सिंहासन त्याचा धाकटा भाऊ जेहेरीस (दुसरा) टार्गेरियनला मिळाले. जेनीची घोस्ट ऑफ हाय हार्ट अर्थात वूड्स विचशी मैत्री होती. या विचनेच सगळ्यांत पहिल्यांदा 'प्रिन्स दॅट वॉज प्रॉमिस्ड'चं भाकित केलं. किंबहूना त्या भाकितामुळेच जेहेरीसने आपली मुलं एरीस (दुसरा) अर्थात मॅडकिंग व ऱ्हेआला टार्गेरियन यांचं एकमेकांशी लग्न लावून दिलं. त्यांची मुलं म्हणजे ऱ्हेगार, व्हिसेरिस आणि डेनेरिस. गोष्ट इथेच संपत नाही. अपमानित झालेल्या लियोनेल बराथियनने बंड केलं. त्याचं पर्यवसान लियोनेल डंकन द टॉलकडून (प्रिन्स डंकन नव्हे) हारण्यात झालं. शेवटी प्रिन्स डंकनच्या बहिणीचा विवाह लियोनेलच्या मुलासोबत करण्यात आला.

एका राजपुत्राने सामान्य मुलीशी लग्न करण्यासाठी म्हणून राज्याधिकारावर पाणी सोडणे, ही केवढी तरी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच संपूर्ण सेव्हेन किंग्डम्समध्ये जेनी आणि डंकनवर खूप सारी गाणी प्रसिद्ध झाली. परंतु त्यातही सगळ्यांत प्रसिद्ध गाणे जर कोणते असेल, तर ते आहे 'जेनीज् साँग'. राजा एगॉनने नातू ऱ्हेगारच्या जन्मानिमित्त समरहॉल येथे भव्य समारंभ आयोजित केला होता. तिथे अचानकपणे आग लागली. त्या आगीत समरहॉलसह एगॉन, जेनीचा नवरा डंकन आणि सर डंकन द टॉल भस्मसात झाले. त्यावर कुणा अज्ञात गीतकाराने लिहिलेय, High in the halls of the kings who are gone, Jenny would dance with her ghosts ...!

मालिकेत या ओळींच्या पुढे तितकीच सुंदर आणि शोकांत अशी कडवी लिहिलीयेत. पण वेस्टेरोसमधील एक ऐतिहासिक गीत, एवढ्यापुरतेच या गाण्याचे महत्त्व नाही. एक तर हे गीत टार्गेरियन घराण्याच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे डंकनने प्रेमासाठी सत्तेवर पाणी सोडले आणि अखेरीस त्याचे प्रेम त्याच्या विरहात एकटेच राहिले, यात निश्चितपणे मालिकेच्या भविष्यातील घटनांशी संबंधित गूढार्थ दडलाय. डंकनप्रमाणेच ऱ्हेगारनेही प्रेमविवाह केला होता. डंकनच्या विवाहाची परिणती जशी बराथियन्सच्या बंडात झाली, तशीच ऱ्हेगारच्या विवाहाचीदेखील झाली. डंकनच्या विवाहामुळेच जेहेरीस राजा झाला आणि ऱ्हेगार जन्माला येऊ शकला, तद्वतच (मालिकेनुसार) ऱ्हेगारच्या विवाहामुळे जॉन तथा एगॉनचा (सहावा) जन्म झाला. मालिकेत तरी जॉन हाच वूड्स विचने सांगितलेला 'प्रिन्स दॅट वॉज प्रॉमिस्ड' असल्याच्या तर्काला या मुळे बळकटीच मिळतेय.

मालिकेतील गीताचे बोल आहेत -

High in the halls of the kings who are gone
Jenny would dance with her ghosts. 
The ones she had lost and the ones she had found. 
And the ones who had loved her the most.
The ones who’d been gone for so very long
She couldn’t remember their names
They spun her around on the damp, cold stone
Spun away her sorrow and pain
And she never wanted to leave

आता जॉन जर तो 'प्रिन्स' असेल, तर डेनेरीसचे महत्त्व जवळजवळ शून्यवत होतेय. इथे जर डेनेरिसला जेनी मानलं (प्रत्यक्षात गाणं दाखवताना जी जी दृश्यं दाखवलीयेत, त्या प्रत्येक दृश्यात एक एक स्त्री आहे. सांकेतिकरित्या ती प्रत्येक स्त्री जेनी असू शकते किंवा त्या सगळ्याच जेनी असू शकतात!), तर तिचं सबंध आयुष्य आणि त्यातून आलेलं एकटेपण खूपच उठून दिसतं. आज ती राणी आहे. पण विण्टरफेलला आल्यापासून तिला काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही. तिच्या दृष्टीने टिरियन चुकलाय. काल परवाच्या सान्साने And what about the North विचारून ती सर्सि, बेलिश यांची शिष्योत्तमा असल्याचे सिद्ध केलेय. जॉनने तर बॉम्बच फोडलाय. Power resides where men think it resides आणि डेनेरीस सध्या तरी राजकीयदृष्ट्या Powerless झालीये. ही जेनी एकटी पडलीये आणि समरहॉल जरी नाही तरीही विण्टरहॉल्समध्ये लवकरच भुतांचा नाच सुरू होण्याची शक्यता आहे. डेनेरीसवर विण्टरफेलमध्ये जमलेल्या भुतांसोबत नाचण्याची वेळ येईल का? तशी वेळ आलीच तर ती जिवंतपणीच येईल की भूत होऊन? आणि जर डेनेरीसला जेनी मानलं, तर जॉन डंकन होऊन राज्यावर पाणी सोडेल का? म्हणजे तसा तो त्याला मिळालेले प्रत्येकच पद सोडतो, पण तरी!!

 

लेखक : विक्रम श्रीराम एडके

सबस्क्राईब करा

* indicates required