computer

गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या सीझनचं ट्रेलर समजून घ्या आपल्या मायबोलीत आणि एकदम साध्यासोप्या शब्दांत!!

Subscribe to Bobhata

मंडळी गेम ऑफ थ्रोन्सची गंमत अशी आहे की ते  एपिसोड्स जाम पावर पॅक्ड असतात.  म्हणजे बघा ना, आपल्या मराठी -हिंदी मालिकेत वीस मिनिटात काहीच होत नाही. आणि जिओटीमध्ये दहा तासांत आख्खे जाडजूड पुस्तक संपवतात.    दोन वर्षं वाट पाहिल्यानंतर गेम ऑफ थ्रोन्स शेवटच्या सीझनचा ट्रेलर परवाच रिलीज झालाय.  यांचे एपिसोड एवढे हेवी असतात तसेच ट्रेलर्ससुद्धा ऍक्शनपॅक्ड असतात.  त्यामुळं ट्रेलर समजून घ्यायला पण डोकं लावावं  लागतं राव. पण तुम्ही काळजी करू नका, आज तुम्हाला ट्रेलर समजावून देत आहेत विक्रम एडके.. 

वाचा मग या नव्या ट्रेलरमध्ये लपलंय काय..

१)

पहिलंच दृश्य आर्याचं आहे. अगदी ती किंग्स लँडिंगच्या तळघरात गेली होती त्याची आठवण करून देणारं. ती प्रचंड घाबरलीये, तिच्या वयाला शोभेलशी पण स्वभावाला न शोभणारी. ज्या ब्रिएनला हाऊंडसुद्धा टरकतो, तिलासुद्धा न घाबरणारी आर्या कशाला तरी घाबरलीये, त्यापासून पळतेय. काय असावी ती महाभयंकर गोष्ट? पुढच्याच दृश्यात डावोस अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतोय, वॅरीस काळजीत पडलाय, पण आर्या म्हणतेय, I know death. It's got many faces. I look forward to seeing this one आणि ती ड्रॅगनग्लासपासून बनवलेले एक खंजीर किंवा भाल्याचं टोक उचलते. केवढा विरोधाभास भरलाय आर्याच्या दोन्ही दृश्यांमध्ये! ती मेनी फेस्ड गॉडची भक्त आहे. मृत्यू हाच एकमेव देव आहे हे तिला सिरियो फोरेलने शिकवलंय. त्यानेच हेही शिकवलंय की, मृत्यूला 'नॉट टुडे' म्हणायचं असतं. आणि तरीही ती पळतेय. काय असेल जे मृत्यूपेक्षाही भयानक आहे?

२)

पुढची दृश्यं मजेदार आहेत. आपल्याला गोल्डन कंपनी दिसते. त्यात त्यांचा जो कमांडर दिसतोय, तो आहे हॅरी स्ट्रिकलॅण्ड. या हॅरीला 'होमलेस हॅरी' म्हणतात. त्याचे पणजोबा ब्लॅकफायर-उठावात सहभागी झाले होते. त्यात त्यांच्या सगळ्या जमिनी गेल्या. त्याचे आजोबा, वडील आणि तो हे सारे विजनवासातच जन्मले. पुढे गोल्डन कंपनीचा कमांडर माईल्स टॉईनच्या मृत्यूनंतर त्याची जागा हॅरीने घेतली. टॉर्मण्ड जिवंत असलेला पाहून आपण सुटकेचा नि:श्वास सोडतो. सर्सिने कायबर्नच्या साथीने माऊंटनचं सैन्यच गोळा केलंय. पण या दृश्यांना ब्रॅनचा आवाज आहे. ब्रॅन म्हणतो, Everything you did brought you where you are now. Where you belong. Home! तो हे म्हणत असतानाच जॉन आणि डेनेरिस विण्टरफेलमध्ये प्रवेश करताना एक मुलगा पाहातो. अगदी तसंच, जसं पहिल्या पर्वाच्या पहिल्या भागात ब्रॅनने रॉबर्टला येताना पाहिले होते. ब्रॅनचे ते वाक्य नक्कीच जॉनला उद्देशून असावे. पण समजा ते जेमीला उद्देशून असले तर?
 

३)

जॉन आणि डॅनी एकत्रच विण्टरफेलमध्ये येतात. तिने त्याला बरोबरीचं स्थान दिलेलं दिसून येतो. पण हाच तर टिरियनचा डाव नसेल? डॅनीने जॉनला राजा तर मानलं, पण मांडलिकत्वही पत्करायला सांगितलं. जॉन मांडलिकत्व पत्करून आता तिच्याशी लग्न करण्यापर्यंत पोहोचलाय. मग जॉनने त्याचं स्वातंत्र्य गमावलं की अजूनच मोठं राज्य मिळवलं? लक्षात घ्या, जॉनला अजून त्याची वंशावळ माहिती नाहीये. त्या आधी घडलेल्या या गोष्टी आहेत. एकदा ते उघड झालं की, डॅनीच्या राज्यपदाला काहीही अर्थ राहात नाही. जी डॅनी जॉनशी प्रेमाने वागतेय तिला सत्य कळल्यावर किती किळस येईल वगैरेचे मीम्स फिरतायत. मला पडलेला प्रश्न वेगळाच आहे. डॅनीला सत्य कळल्यावर, तिला तिचं दुय्यम झालेलं स्थान सहन होईल का?

४)

पुढे आजवरच्या टिव्हीच्याच नव्हे तर सबंध इंडस्ट्रीच्याच इतिहासातील सर्वाधिक प्रतीक्षित युद्धाची हलकीशी झलक दिसते. मारा अथवा मृत्यूहूनही भयंकर परिणाम सोसा, याच विचाराने मंडळी लढायला निघालीयेत. जॉन जणू सगळ्यांना उद्देशून बोलतोय. ज्याक्षणी तो म्हणतो, ".. doesn't feel', त्याचक्षणी ग्रेवर्म मिसांदेचं चुंबन घेतो. अनसलीड सैन्याला कोणतीही भावना शिकवलेली नाही, पण तरीही त्यांच्यात भावना आहेत. They feel! ही गोष्टच त्यांना व्हाईटवॉकर्सहून वेगळ्या उंचीला पोहोचवते. वाक्य आणि दृश्याचा परस्परविरोध ट्रेलरची खोली अजूनच वाढवतात. जॉन अगदी नेडसारखाच विण्टरफेलच्या गॉड्सवुडमध्ये उभा आहे. त्याच्यातलं स्टार्क रक्त टार्गेरियन रक्तापेक्षा जास्त घट्ट आहे. सगळ्यांत भाव खाऊन गेलीये ती सर्सि! सगळं जग गेलं खड्ड्यात, असे बेफिकिर भाव चेहऱ्यावर ठेवून अद्यापही काहीतरी कुटील, कपटी आखणी करतेय ती!
 

५)

आणि मग सुरू होतो, या ट्रेलरचा परमोच्च बिंदू! जेमीचा संवाद. तो म्हणतोय, I promised to fight for the living. I intend to keep that promise. केवढे कंगोरे आहेत या वाक्याला! तो विण्टरफेलला येताना सर्सिला सोडून आलाय. तो तिलासुद्धा डेडच मानतोय आता. सर्सिवर खरोखर प्रेम केलेली एकमेव व्यक्तीच जर असं बोलत असेल, तर सर्सिचं सारं वैभव मातीमोलच म्हटलं पाहिजे. पण हा संवाद तो कुणाला उद्देशून म्हणतोय? लेडी ऑफ विण्टरफेल सान्साला, किंग इन द नॉर्थ जॉनला, क्वीन डेनेरिसला की..! की ब्रॅनला!! ब्रॅन आणि जेमी समोरासमोर येतील, तेव्हा काय होईल ती घटना मालिकेतील सर्वोच्च बिंदूंपैकी एक असणार आहे! Things I do for love पासून ते I promised to fight for the living पर्यंतचा जेमीचा प्रवास, अचंबित करुन सोडणारा तर आहेच परंतु जेमीबद्दल आदर वाढवणाराही आहे. शिवाय, I intend to keep that promise हे वाक्य, जेमी त्याच्या Oathbreaker या ओळखीपासून सकारात्मक मार्गावर खूपच पुढे गेला असल्याचेही सुचवते.
 

६)

मग दिसतो हाऊंड. आगीला घाबरणारा आणि तरीही निर्धारपूर्वक आगीजवळ उभा असलेला. त्याला काही भविष्य दिसलेय का? की त्याला माऊंटन दिसलाय? सर्सिची योजना पाहाता क्लेगेनबोल होणार आणि हाऊंड माऊंटनला मारणार, हे घडण्याची खूपच शक्यता आहे. जॉन आणि डॅनी उरलेल्या दोन ड्रॅगनकडे निघालेयत. डॅनीचा ड्रोगोन आहे त्याअर्थी जॉन ऱ्हेगालवर बसणार, हे निश्चित. ऱ्हेगाल नाव, जॉनचे वडील ऱ्हेगारवरून आलंय हा काव्यात्मक न्याय!

पुन्हा एकवार एक महाभयंकर युद्ध. जॉन, डॅनी, सान्सा, आर्या, टिरियन, जेमीसारखे नेतृत्व ज्यासाठी तयारी करताहेत; ब्रिएन, ग्रेवर्म, जोराहसारखे महायोद्धे ज्यासाठी निघालेयत; सॅमवेल आणि गेण्ड्रीसारखे लोक ज्यासाठी खपतायत, ते युद्ध आता ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर समोर येऊन उभे ठाकलेय, हेच पुढच्या दृश्यातील त्या अनडेड घोड्याची टाप सुचवतेय. टिव्हीच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ महागाथा, रसिकांची इच्छा नसतानाही शेवटाकडे झुकतेय..!!

 

 

लेखक : विक्रम श्रीराम एडके

सबस्क्राईब करा

* indicates required