रणबीर संजय दत्तच्या भूमिकेत कसा दिसतो ? 'संजू'चा टीझर बघा आणि तुम्हीच ठरवा !!

Subscribe to Bobhata

संजय दत्तच्या आयुष्यावर सिनेमा बनणार ही बातमी आल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. संजय दत्तच्या भूमिकेत असलेला रणबीर या भूमिकेला न्याय देऊ शकेल का किंवा संजय दत्तवर सिनेमा बनवण्याची खरच गरज आहे का ? त्या गुन्हेगारावर काय चित्रपट करताय !! वगैरे वगैरे. अखेर हा सिनेमा तयार झाला असून त्याचा टीझर आजच लाँच करण्यात आलेला आहे. सिनेमाचं नाव आहे ‘संजू’.

संजय दत्त सोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सारखे सिनेमे केलेले राजकुमार हिरानी यांनी 'संजू' दिग्दर्शित केला आहे. राजकुमार हिरानी यांना 'थ्री-इडीयट्स'पासून एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या सिनेमात दिसणारं वेगळेपण ते प्रथमच तयार करत असलेल्या बायोपिक मध्ये दिसेल का अशी शंका होतीच. पण संजूच्या पोस्टर आणि टीझर वरून आपल्याला थोडा दिलासा मिळतो.

टीझर मध्ये नक्की काय आहे ?

स्रोत

आपण आधी पोस्टर बद्दल बोलूया. पोस्टर मध्ये संजय दत्तच्या ५ वेगवेगळ्या रुपात रणबीर दिसतो. पोस्टरवरून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे संजय दत्तची गोष्ट सांगताना त्याच्या जीवनातील ५ वेगवेगळ्या टप्प्यांचा आधार घेतला गेला आहे. शेवटी सिनेमाची टॅगलाईन आहे ‘one man, many lives’. म्हणजेच ‘माणूस एक, भूमिका अनेक’.

आता वळूया टीझरकडे. टीझर मध्ये याच पाच रूपांचं एकत्रीकरण केलेलं आपण पाहू शकतो. संजय दत्त कारागृहाच्या बाहेर येऊन आपली गोष्ट सांगू लागतो त्या प्रसंगापासून टीझरची सुरुवात होते. तिथून पुढे हा प्रवास इतर टप्पे पार करत शेवटी संजय दत्तच्या आयुष्याची छोटीशी झलक दाखवून संपतो. टीझर सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढवतो यात शंका नाही. १ मिनिट २५ सेकंदाचा हा टीझर आपल्याला खिळवून ठेवतो.

स्रोत

टीझर वरून तर असं दिसतं की सिनेमा फार गंभीर कॅटेगरीतला नाही. राजकुमार हिरानी स्टाईलचा सहज सोप्प्या व हलक्या फुलक्या पद्धतीचा हा सिनेमा असेल.

रणबीरच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर रणबीरने बऱ्याच वर्षानंतर  जोरदार ‘सिक्स’ मारलाय राव. संजय दत्तच्या रोल मध्ये रणबीर अगदी फिट वाटतो. त्याचे आधीचे सिनेमा बघितले तर त्याचं करियर काही फारसं चांगलं चालेलेलं नाही. त्याचे एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे येत होते. मधल्या काळात तो कुठेतरी हरवला होता पण आता ‘संजू’च्या निमित्ताने तो पुन्हा कमबॅक करेल असं वाटत आहे.

स्रोत

या सिनेमातील इतर पात्रांचा लुक अजून गुलदस्त्यातच आहे. तेही थोड्याच दिवसात कळेल. शेवटी हा तर टीझर आहे राव, ट्रेलर अजून बाकी आहे. सिनेमा २९ जूनला रिलीज होणार आहे.  

चला मंडळी तुम्ही सुद्धा पटपट ‘संजू’चा टीझर बघून घ्या. आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बरं का....

सबस्क्राईब करा

* indicates required