computer

ब्लॉकबस्टर आणि बॉक्स ऑफिस हे दोन शब्द आले तरी कुठून ??

“अरे तो नवीन आलेला सिनेमा पाहिलास का? बॉक्स ऑफिस वर कमाल केलीय त्याने!”
“हो रे. अगदी ब्लॉक बस्टर ठरला म्हणे तो सिनेमा.” 

आता हा संवाद इथे का दिला असेल बरं? हा तर आपला दैनंदिन जीवनातील साधा संवाद आहे. मित्र मैत्रिणी एकत्र आले तर आपसूकच सिनेमाच्या गप्पा सुरु होतात. आता सिनेमा म्हंटलं की तो हिट झाला किंवा फ्लॉप झाला हा विषय हमखास निघतोच! पण काय गंमत असते बघा मंडळी, काही शब्द आपल्या तोंडी इतके रुळले असतात की आपण ते सहज उच्चारून जातो पण त्या शब्दांचा नेमका अर्थ काय? ते शब्द मुळात आले कुठून? ते आपल्या रोजच्या भाषेत कसे रुळले याचा विचार शक्यतो आपण करत नाही. आता उदाहरणार्थ हा वरील संवादच बघा ना… बॉक्स ऑफिस म्हणजे नक्की काय आणि ब्लॉक बस्टर म्हणजे नेमकं काय हे किती जणांना माहीत आहे? आता सिनेमा बॉक्स ऑफिस वर हिट झाला किंवा ब्लॉक बस्टर ठरला याचा अर्थ त्या सिनेमाने चांगली कमाई केली हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण हे शब्द कुठून आले आणि तितकाच मर्यादित यांचा अर्थ आहे का हे मात्र फार कमी जणांना माहीत असते. पण आजपासून बोभाटाच्या वाचकांना ते माहीत होणार हे निश्चित आहे. चला तर मग जाणून घेऊया…

सुरुवात करूया बॉक्स ऑफिस पासून. सध्याच्या ऑनलाइन तिकिटांच्या काळात बॉक्स ऑफिस ही संकल्पना थोडीशी मागे पडत असली तरी अद्यापही बॉक्स ऑफिस कालबाह्य झालेले नाहीत. ही एक अशी जागा असते जिथे तुम्ही पैसे देऊन सिनेमाची तिकिटे खरेदी करू शकता. मग याला बॉक्स ऑफिस असे नाव का? तर पूर्वीच्या काळी तिकीट विक्रीचे काउंटर अस्तित्वातच नव्हते. त्या काळी एका लांब काठीला एक बॉक्स बांधला जायचा. लोकं सिनेमाला जमली की सिनेमा सुरू होण्यापूर्वी तो बॉक्स प्रेक्षकांमध्ये फिरवला जायचा आणि प्रेक्षक त्यात पैसे टाकायचे. छापील तिकिटे वगैरे प्रकार नव्हताच! मग हा बॉक्स कितपत भरला त्यावर सिनेमा हिट की फ्लॉप हे ठरवत असत. कालांतराने हा बॉक्स प्रेक्षकांत फिरवण्याऐवजी सिनेमागृहाच्या प्रवेशद्वारापाशी एका ऑफिसमध्ये ठेवला जाऊ लागला आणि त्याला बॉक्स ऑफिस हे नाव कायमचं चिकटलं! पण मंडळी, आता पुढील काळ हा ऑनलाइन तिकिटांचा आहे. यापुढे किती दिवस बॉक्स ऑफिस नावाची संकल्पना टिकून राहते हे काळच ठरवेल. 

आता बघूया ब्लॉक बस्टर म्हणजे काय. आज जरी हा शब्द यशस्वी सिनेमांसाठी वापरला जात असला तरी याचे मूळ कुठे आहे हे समजल्यावर तुम्हाला खरोखर नवल वाटेल. या शब्दाचा प्रथम वापर झाला तो 1940 मध्ये अमेरिकेच्या वृत्तपत्रामध्ये. आणि हा शब्द वापरला गेला तो बॉम्ब साठी! होय… आकाशातून इमारतीवर, म्हणजेच बिल्डिंग ब्लॉक्स वर फेकला जाणारा बॉम्ब जो पूर्ण ब्लॉक उध्वस्त करतो त्याला ‘ब्लॉकबस्टर असं संबोधलं गेलं होतं. अल्पावधीतच हा शब्द सगळीकडे लोकप्रिय झाला. मग याचा वापर सुपीक डोक्याच्या सिनेमावाल्यांनी केला नसता तरच नवल. 1943 मध्ये ‘बाँबर्डीअर’ या सिनेमाच्या जाहिरातीत हा शब्द वापरला गेला होता. त्यानंतर सिनेमाच्या समीक्षकांनी सुद्धा ब्लॉक बस्टरला उचलून धरला. समीक्षणात सर्रास ‘प्रेक्षकांच्या हृदयावर पडणारा ब्लॉकबस्टर’ असे सिनेमाचे वर्णन केले जाऊ लागले. हळू हळू त्याचा मूळ अर्थ मागे पडला आणि हा शब्द फक्त सिनेमासंबंधी वापरला जाऊ लागला ते आजतागायत. 

बॉक्स ऑफिस आणि ब्लॉक बस्टर हे दोन शब्द पहिल्यांदाच एकत्रित वापरले गेले ते सन 1950 मध्ये. डेली मिरर नावाच्या वृत्तपत्राने आपल्या बातमी मध्ये असं छापलं होतं की ‘सॅमसन अँड डेलिया’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस ब्लॉक बस्टर ठरणार आहे.’ आणि झालंही तसंच. हा सिनेमा बॉक्स ऑफिस मध्ये चांगलाच यशस्वी ठरला आणि अश्या तर्हेने जागतिक सिनेसृष्टीला हे दोन शब्द कायमचे बहाल झाले. 

तर मंडळी, या पुढे जेव्हा कुठल्या सिनेमाबाबत चर्चा कराल तेव्हा तुम्हाला ‘बॉक्स ऑफिस’ आणि ‘ब्लॉक बस्टर’ यांचा नेमका अर्थ माहीत असणार आहे. तुम्ही तो तुमच्या मित्रांनाही नक्कीच सांगणार. खरं ना?

हा लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि… शेअर तर तुम्ही करणारच. ते सांगायची आवश्यकता आहे का?

 

लेखक : अनुप कुलकर्णी.

 

आणखी वाचा :

कोणताही सिनेमा शुक्रवारी का रिलीज होतो?

पडद्यामागची गोष्ट - सिनेमातील 'फॉले' हा काय प्रकार असतो भाऊ ? पहा व्हिडीओ...

सबस्क्राईब करा

* indicates required