परवीन बाबी.. गूढ आयुष्य असलेली ग्लॅमरस आणि शापित अभिनेत्री..

आज परवीन बाबीचा वाढदिवस. बॉलीवूडमधल्या  हिरॉइन्सची एकदम सोज्वळ आणि शालीन प्रतिमा बदलून मिनी स्कर्ट, मोकळे केस, ओठात सिगारेट अशी खुल्लमल्ला रूपात आणणारी परवीन बॉबी ८० च्या दशकात तरुणांच्या स्वप्नातली हिरोईन  होती. अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोचलेल्या या ग्लॅमरस नायिकेचा  एकंदरच आलेख  तितक्याच वेगाने ढासळला  आणि आज हयात असती तर सत्तरीत असू शकलेल्या परवीनचा अंतही कायमसाठी गूढ ठरला.

स्रोत

परवीन बाबी..
परवीन मूळची गुजरातमधल्या जुनागढ संस्थानातली. ४ एप्रिल १९४९चा तिचा जन्म. कॉलेजमध्ये तिनं इंग्रजी साहित्यातली पदवी मिळवली. बिनधास्त लूकमधली परवीन एकदा चित्रपट निर्माते बी. आर. इशारा यांच्या नजरेस पडली, अन त्यांना त्यांची 'हिरॉईन' गवसली. १९७३ मध्ये क्रिकेटपटू सलीम दुराणीसमवेत यांच्यासमवेत तिचा 'चरित्र' झळकला. पुढची सलग दहा वर्षे परवीन रुपेरी पडदा गाजवत राहिली. १९७६ मध्ये  अमेरिकेच्या प्रसिद्ध 'टाईम' नियतकालिकानं तिचं छायाचित्र मुखपृष्ठावर प्रसिद्ध केलं अन रातोरात ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली.  तोपर्यंत सलवार-कमीज,साडी, केसांच्या वेण्या घालणाऱ्या हिरॉइन्सची प्रतिमाच तिने आमूलाग्र बदलून टाकली. त्यावेळी जबरदस्त क्रेझ असलेल्या बोल्ड झिनी बेबी अर्थात झीनत अमानशी तिची तुलनाही होऊ लागली. ती तिची स्पर्धकही झाली.

स्रोत

परवीनची कारकीर्द..
परवीननं त्याकाळच्या जवळजवळ सर्वच टॉपच्या कलाकारांसोबत काम केलं. सहजगत्या बोल्ड अवतारात वावरणारी परवीन तरुणाईच्या हृदयाची धडकन होती. मजबूर, अमर अकबर अँथनी, दीवार, शान,  सुहाग, कालिया, काला पत्थर, नमक हलाल, काला सोना, खुद्दार, क्रांती अशा जबरदस्त हिट चित्रपटांतून तिची बिनधास्त छबी चमकत राहिली. त्या काळात महेश भट, कबीर बेदी, डॅनी डेंझोप्पा अशा चित्रसृष्टीतल्या सेलिब्रिटीसोबत तिच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत होत्या. महेश भटचा १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ' अर्थ ' हा त्याच्या अन परवीन च्या नात्यावर बेतला होता असं म्हणतात.

स्रोत

परवीनचे अखेरचे दिवस..
चित्रपटसृष्टीत अल्पावधीत टॉपवर गेलेली  परवीन अविवाहित होती. १९८२ मध्ये  यशाच्या शिखरावर असताना जसा विनोद खन्नाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला, तसाच त्यांनतर वर्षभरातच एकाएकी परवीन बॉबीही हे क्षेत्र व मायभूमीही सोडून विदेशात निघून गेली.  तिच्या बाबतीत अफवांचे पीक पसरलं अन अखेरर्यंत ते कायम राहिलं. १९८४ ला कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यानं अमेरीकेच्या विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी तिला ताब्यात घेतलं. तिचं एकंदर वर्तन पाहून तिला मानसोपचार केंद्रात दाखल केलं. पाच वर्षांनी ती भारतात परतली खरी, पण ती मानसिक विकाराची बळी ठरली होती. आपल्याला विष प्रयोग करून मारण्याचा काही व्यक्तींनी कट रचला असून  त्यात बिग बी अमिताभ ही सामील असल्याचा आरोप करून तिनं खळबळ उडवून दिली. बॉलिवूडमध्ये टॉपवर असलेली बोल्ड परवीन जन्माने मुस्लिम होती. आयुष्याच्या अखेरीस तिनं खिश्चन धर्म स्वीकारला होता. चंदेरी  दुनियेतील गॉसिप्स, पार्ट्या असले प्रकार  तिला पचवता आले नाहीत. तिनं एकांतवास पत्करला. चित्रपटसृष्टीपासून पूर्ण अलिप्त झाली. मुंबईतल्या आलिशान घरात ती एकटी राहू लागली. बाह्य दुनियेशी सर्व संबंध तिनं तोडून टाकले. त्यामुळं तिच्या अखेरच्या दिवसांबाबत फारशी काही माहिती कुणाला समजली नाही. एकाकी आयुष्य जगत असताना दहा वर्षांपूर्वी २० मे २००५ ला तिचा मृतदेह बेवारशी अवस्थेत तिच्या घरात सापडला. जुनागढ संस्थानच्या प्रधानाच्या या कन्येचा मृत्यू जसा चटका लावणारा होता, तसाच तो कायमचं गूढ ही निर्माण करून गेला..
(आबिद शेख, पुणे)
(८८०६७०६४६६)

सबस्क्राईब करा

* indicates required