computer

स्पायडरमॅनचा जन्मदाता जेव्हा भारतीय सुपरहिरो तयार करतो...जाणून घ्या ‘स्टॅन ली'च्या भारतीय सुपरहिरोबद्दल !!

कॉमिकच्या जगताचा बादशहा ‘स्टॅन ली’ नोव्हेंबर २०१८ मधे आपल्याला सोडून गेला. ‘स्टॅन ली’ने जन्माला घातलेल्या पात्रांनी जवळजवळ २ पिढ्यांचं बालपण समृद्ध केलं आहे. स्पायडरमॅन, डॉक्टर स्ट्रेंज, अॅव्हेंजर्स, एक्स-मॅन, थॉर, इत्यादी. एकंदरीत ‘मार्व्हल’ची दुनियाच त्यांच्या कल्पनेतून साकार झाली आहे. मंडळी, हॉलीवूडच्या या सुपरहिरोजना तर आपण सगळेच ओळखतो पण भारताच्या सुपरहिरोला आपण फारसं ओळखत नाही.  हा सुपरहिरो देखील ‘स्टॅन ली’नेच जन्माला घातला आहे. चला तर जाणून घेऊया या सुपरहिरो बद्दल.

‘स्टॅन ली’ या बाप माणसाने भारतीय प्रेक्षकांसाठी एक खास सुपरहिरो जन्माला घातला होता. या सुपरहिरोचं नाव आहे ‘चक्र:दि इन्व्हीन्सिबल’. हा सुपरहिरो तयार करण्यामध्ये शरद देवराजन यांनी ‘स्टॅन ली’ यांना मदत केली होती. आता या ‘चक्र’ सुपरहिरोचं रूप काय होतं ते जाणून घेऊया.

चक्रच्या कथेला स्पायडरमॅन आणि आयर्नमॅनच्या कथेचा ‘भारती टच’ होता. राजू राय नावाचा एक ‘टेक जीनियस’ मुलगा असतो. त्याने त्याच्या तंत्र कौशल्याने एक निळ्या रंगाचा सूट तयार केलेला असतो. हा सूट त्याच्या शरीरातील शक्तींना एकत्रित आणून त्याला शक्ती प्रदान करतो. प्रत्येक सुपरहिरो आपल्या शहराला वाचवतो तसा हा चक्र मुंबईला वाचवतो. त्याचा शत्रू असतो ‘बॉस यम’.

‘चक्र’वर तयार झालेली पहिली कॉमिक पुस्तिका २०११ साली बाजारात आली. यानंतर ‘चक्र’वर २०१३ साली सिनेमाही आला. हा सिनेमा कार्टून नेटवर्कवर दाखवण्यात आला होता. याचे २ भाग इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु मधून रिलीज करण्यात आले होते. इंग्रजी डबिंग मध्ये चक्रला दिलेली अमेरिकन बोलण्याची ढब काहीशी न पटण्यासारखा असल्याने त्यावर टीकाही झाली होती.

मंडळी, २०१६ साली ‘स्टॅन ली’ यांनी स्वतः घोषणा केली होती की ‘चक्र’ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. यासाठी ‘स्टॅन ली’ने ‘फँटम प्रॉडक्शन’ सोबत हातमिळवणी केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘विक्रमादित्य मोटवाने’ करणार होते. २०१६ ते २०१७ दरम्यान चक्र फिल्म रिलीज होणार होती. याहून मोठा सरप्राईज म्हणजे मार्व्हलच्या प्रत्येक सिनेमात ‘स्टॅन ली’ काही सेकंदाच्या भूमिकेसाठी येतात तसेच चक्र मध्ये पण दिसणार होते. पण हा खेळ मोडला हे भारतीय प्रेक्षकांचं दुर्दैव म्हणावं लागेल. 

झालं असं की, गेल्याच महिन्यात ‘फँटम प्रोडक्शन्स’ कंपनी बंद पडली आणि परवाच ‘स्टॅन ली’ यांनी जगाचा निरोप घेतला. ‘स्टॅन ली’ च्या स्वप्नातला ‘चक्र’ प्रत्यक्षात कधी अवतरेल हे आता स्वप्नच राहिलं आहे.

....पण मंडळी टेन्शन नॉट !! ‘स्टॅन ली’ चा चक्र तुम्ही आजही युट्युबवर पाहू शकता. या दिग्गाजाने भारतासाठी एक सुपरहिरो तयार केला होता ही नक्कीच भारतीयांसाठी आनंदाची बाब राहील.

बोभाटातर्फे ‘स्टॅन ली’ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

सबस्क्राईब करा

* indicates required