शनिवार स्पेशल : सेक्रेड गेम्स - भारतातलं पहिलं नेटफ्लिक्स ओरिजिनल, हे नाही पाह्यलं तर काय पाह्यलं भाऊ ?

सरताज “इमानदार आदमी को बम्बई में जगह नहीं, इंडिया में जगह नहीं !!”

गणेश गायतोंडे “गणेश गायतोंडे है में...सर्व शक्तिशाली, इकलौता भगवान्....”

हे दोन संवाद ‘सेक्रेड गेम्स’च्या वेगवेगळ्या भागात येतात. या दोन्ही संवादावरून बोलणारं पात्र कोण आहे व त्याची या सर्व ‘खेळा’मधली भूमिका काय आहे हे स्पष्ट होतं. 
‘सेक्रेड गेम्स’ बद्दल पुढे बोलण्याआधी कथानकाचा थोडक्यात आढावा घेऊया :

स्रोत

सरताज सिंग हा पोलीस खात्यातला नवीन ‘खिलाडी’ आहे. पोलीस खातं काम कसं करतं याबद्दल त्याला अजून फारसं समजलेलं नाही. सामान्य माणसाला दिसणारं पोलिसांचं काम आणि प्रत्यक्ष काम यांच्यात किती फरक असतो हे त्याला आणि बघणाऱ्याला पहिल्याच भागात लक्षात येतं. 

सरताज सिंगने तो पर्यंत फक्त ‘सोनू पाकीटमार’ला पकडलेलं असतं. एवढीच काय ती त्याची कर्तबगारी. हे कमीच म्हणून की काय तो आपल्याच खात्यातील सहकाऱ्यांकडून पिडला गेला आहे. हे सर्व चालू असताना त्याला एक फोन कॉल येतो. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीकडून समजतं की पुढील २५ दिवसात मुंबई संपणार आहे. इथूनच गोष्टीला खरी सुरुवात होते.

स्रोत

फोनवर बोलणारी व्यक्ती असते गणेश गायतोंडे. एका लहानशा गावातून आलेला आणि पुढे  गुन्हेगार बनलेला मुलगा. त्याचं आणि सरताज सिंगचं काय कनेक्शन आहे आणि २५ दिवसात काय होणार आहे हे तुम्ही स्वतःच बघा.

स्पॉयलर अलर्ट. जर तुम्ही ‘सेक्रेड क्रेड गेम्स’ अजून बघितलेलं नाही किंवा बघून पूर्ण केलेलं नाही, तर पुढे वाचू नका.

सुरुवातीलाच हे नमूद करणं गरजेचं आहे की नेटफ्लिक्सच्या ‘नार्कोस’ सारख्या दर्जेदार सिरीजच्या तोडीचीच भारतीय सिरीज तयार करण्यात नेटफ्लिक्स यशस्वी झालं आहे. पण नार्कोसच्या बरोबरीला ठेवून त्याला त्या वर्गात टाकणं सुद्धा गैर आहे.  कारण ‘सेक्रेड गेम्स’ने स्वतःचं असं वेगळं अस्तित्व तयार केलंय...

स्थानिक लोकांची गोष्ट फक्त स्थानिक नसून ती देश पातळीवरील घडामोडींशी कशी जोडली गेली आहे व त्याचा परिणाम अगदी लहानातल्या लहान घटकावर कसा पडतो हे ‘सेक्रेड गेम्स’चं बलस्थान आहे. त्यामुळे ही गोष्ट फक्त गँगस्टर आणि पोलिसांची उरत नाही. तिचा आवाका वाढतो. त्यासाठी वापरण्यात आलेली रुपकं व पात्र योजना चांगली जमून आली आहेत. उदाहरणंच द्यायचं झालं तर ‘इसा’ हे पात्र. गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दिन सिद्दिकी) तोंडून आपल्याला समजतं की दंगलीत इसाचं नुकसान झालं, याचा राग काढण्यासाठी त्याने मुंबईत जातीय बॉम्बब्लास्ट घडवून आणले. इसा कोणाची आठवण करून देतो हे प्रेक्षकांना वेगळं सांगायला लागत नाही.

आपल्याकडे मुंबईची गोष्ट सांगणाऱ्या कथानकांची कमी नाही. स्वतः अनुराग कश्यपचा सत्य, अग्ली, ब्लॅक फ्रायडे इत्यादी मुंबईच्या गल्लीबोळातल्या गोष्टी सांगण्याऱ्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’ आपल्याला त्या मुंबईपेक्षा वेगळी मुंबई दाखवतो.

स्रोत

एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा नव्हे. त्यामुळे सेन्सॉर व इतर बंधनाची इथे अडचण होत नाही. आपल्याला सांगायची गोष्ट कोणत्याही अडचणी शिवाय सांगू शकणं हे नेटफ्लिक्ससारख्या माध्यमातून साध्य झालं आहे. 

‘सेक्रेड गेम्स’ च्या सौंदर्य स्थळांमध्ये त्याची भाषा हा एक बोलण्याचा वेगळा विषय ठरू शकतो. मुंबईकरांच्या तोंडी जे शब्द सहज निघतात ते सेन्सॉरच्या पचनी पडत नाहीत. हे शब्द कापले जातात किंवा म्युट केले जातात. नेटफ्लिक्स सारख्या माध्यमातून ते कोणत्याही बीप शिवाय येत असल्याने ‘सेक्रेड गेम्स’च्या माध्यमातून पहिल्यांदाच खरीखुरी मुंबईच्या मातीतली कथा सांगितली जात आहे हे जाणवत राहतं.

भाषेबद्दलच बोलतोय तर आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ८ भागांच्या सिरीज मध्ये प्रामुख्याने ३ भाषा ऐकू येतात. हिंदी, मराठी आणि पंजाबी. मराठी आणि पंजाबी भाषा वापरताना पात्रांच्या तोंडी दोनचार वाक्यानंतर हिंदी घुसवलेली नाही. अस्सल मराठी आणि अस्सल पंजाबी वाक्यंच वापरण्यात आली आहेत. 

गोष्ट सांगण्याची  वापरलेली  पद्धत अफलातून आहे. मिथक आणि संकेतांचा वापर करून ही गोष्ट उलगडत जाते. एका बाजूला मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाची गोष्ट, त्याच्या समांतर देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडी व या संग्रहाला पुराणाशी जोडणारा धागा. ही भट्टी वेगळीच आहे. ३ लेखक आणि २ दिग्दर्शकांनी मिळून केलेली मेहनत दिसून येते.

स्रोत

‘सेक्रेड गेम्स’ मधल्या स्त्री भूमिका देखील एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. कुक्कु, सुभद्रा, कांता बाई, झोया मिर्झा या चारही व्यक्तिरेखा आपापलं वेगळं अस्तित्व दाखवून देतात. त्या फक्त मुख्य पात्रांच्या हातातील बाहुल्या न राहता प्रसंगी नियंत्रण स्वतःच्या हातात घेतात. 

आता काहींना बोल्ड सिन्स बघून या पात्रांच्या डेप्थबद्दल मर्यादा वाटू शकतात. पण उदाहरणच द्यायचं झालं तर सुभद्रा (राजश्री देशपांडे) जेव्हा गणेश गायतोंडेला धर्म आणि सामान्य माणसाच्या श्रद्धेचं तत्वज्ञान सांगते, तेव्हा ती फक्त एक सामान्य व्यक्तिरेखा राहत नाही. तिच्या पात्राला असलेली खोली इथे लक्षात येते.

स्रोत

लहानसहान प्रसंगातून ‘सेक्रेड गेम्स’ वेगळा ठरतो. सरताज आणि काटेकर यांच्यातील समुद्र किनाऱ्यावरचा संवाद. समुद्र किनाऱ्यावरची घाण आणि मुंबईतील गुन्हेगारी हे इथे जोडले जातात. त्याच बरोबर काटेकर आणि त्याच्या पत्नीचा घरातला प्रसंग. काटेकरने २६/११ च्या हल्ल्यात गोळी खाल्ली होती, पण त्याच्या इलाजासाठी त्याला साधे पैसेसुद्धा मिळालेले नाहीत. काटेकर पोलीस खात्यातील अशा अनेकांचा प्रतिनिधी म्हणून उभा राहतो.

पहिल्यांदाच सैफ अली खानने उत्तम भूमिका साकारली आहे. सरताजच्या भूमिकेला त्याचा स्टारडम अडचण बनत नाही. इतर पात्रांसारखाच तो दिसतो. राधिका आपटेच्या भूमिकेला बरंच कमी फुटेज दिलं आहे. पण तिची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. तिचे डायलॉग कमी असले तरी तिने हावभावांवरून भूमिका चांगली वठवली आहे. जितेंद्र जोशीने साकारलेला ‘काटेकर’ तर डोळ्यात पाणी आणतो. जितुने ही भूमिका जिवंत केली आहे. सुभद्रा हे पात्र साकारणाऱ्या राजश्री देशपांडेने सुद्धा कामलीचं काम केलं आहे.

स्रोत

नवाजुद्दिनने भूमिकेला न्याय दिला आहे हे वेगळं सांगायला नको. एक गोष्ट जाणवते, काही प्रसंगांमध्ये वासेपूरचा फैझल आठवल्याशिवाय राहत नाही. नवाजुद्दिन अशा पात्रांना वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतो. 
शेवटी एवढंच म्हणेन की खूप दिवसानंतर एक दर्जेदार सिरीज आली आहे. अजिबात चुकवू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required