computer

तुम्ही खूप घोरता का? मग हे घोरण्याच्या समस्येवरचे ६ रामबाण उपाय वाचाच!!

घोरणे हा प्रकार इतरांच्या झोपेचं खोबरं करतो. तसेच घोरणारी व्यक्ती इतरांसमोर विनोदाचाही भाग बनते. साधारणपणे घोरणे हा प्रकार आपल्याकडे गमतीशीर समजला जातो. पण तुम्हाला माहित आहे का घोरणाऱ्या व्यक्तींमधल्या ७५% लोकांना श्वास कोंडल्याचा अनुभव येतो. याला शास्त्रीय भाषेत ‘obstructive sleep apnea’ म्हणतात. श्वसनात असा अडथळा निर्माण झाल्याने हृदयाचे विकार होऊ शकतात.

स्रोत

एका अभ्यासानुसार घोरण्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे. याखेरीज घोरणाऱ्या व्यक्तीच्या एकूण दैनंदिन कामावर याचा खोलवर परिणाम होतो. श्वास कोंडल्याने दचकून जाग येते, मग पुन्हा झोपेसाठी वेळ जातो. काहीवेळा झोपेतून अचानक जाग आल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. पुन्हा झोपायचं म्हटलं तर त्यालाही वेळ जातो. मग पुन्हा तेच चक्र सुरु राहतं. याचा परिणाम म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे अशी लक्षणं दिसू लागतात.

मंडळी, घोरणे या समस्येवर विज्ञानाने काही रामबाण उपाय सुचवले आहेत. चला तर आज विज्ञानाच्या सल्ल्याने घोरण्यावर मात करू.

१. उताणे झोपू नका.

श्वसनक्रिया सुरळीत राहावी यासाठी उताणे झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपा. उताणे झोपल्याने होतं काय, की जीभ मागच्या बाजूला सरकते आणि श्वसनाच्या मार्गात अडथळे येतात. उताणे झोपलेल्या माणसाच्या तोंडून जो विचित्र आवाज येत असतो तो हवेचा मार्ग रोखल्याने निर्माण होतो.

२. मद्यपान टाळा

एकंदरीत आरोग्यासाठी मद्यपान हे वाईटच पण घोरण्याच्या बाबतीत म्हणाल तर घोरणाऱ्या व्यक्तीने मद्यपान हे टाळलच पाहिजे. याचं कारण असं, की झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी मद्यपान केल्यास घश्यातले स्नायू शिथिल पडतात, त्यामुळे न घोरणारी व्यक्तीही घोरू लागते.

३. पूर्ण झोप घ्या.

घोरण्याच्या अनेक कारणांमध्ये अपुरी झोप हे एक कारण आहे. ७ ते ८ तासांची झोप ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पुरेशी झोप मिळत असेल तर घोरणे कमी होते. याखेरीज झोपेची वेळ ठरवा. भरपूर काम करून तुम्ही जर उशिरा झोपत असाल तर तुम्हाला गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप ही घोरण्याला निमंत्रणच असते.

हे उपाय करा आणि झोपेचं खोबरं टाळा...

४. वजन कमी करा.

स्लिम व्यक्तींनाही घोरण्याचा त्रास असतो, पण लठ्ठ व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. गळ्याच्या भोवती जर मांस वाढलेलं असेल तर झोपेत घश्यावर दबाव निर्माण होतो. अशावेळी श्वास सुरळीत करण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. तर, वजन कमी करणे हा घोरण्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो.

५. नेजल स्ट्रीप किंवा नेजल डायलेटर वापरा.

नेजल स्ट्रीप आणि नेजल डायलेटर हे दोन्ही श्वसनक्रिया सुरळीत करण्याचं काम करतात. घोरताना श्वास कोंडला जाऊ नये म्हणून हे दोन उपाय रामबाण ठरू शकतात.

६. पुरेसं पाणी प्या

दिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने घोरणे कमी होते. हे कसे ? त्याचं काय आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नाकाच्या आतील भाग आणि घशातल्या टाळूचा भाग चिकट होतो. हा चिकटपणा अर्थातच श्वसनक्रियेत अडथळा आणतो. परिणामी घोरणे सुरु होते भाऊ. म्हणूनच पुरेसं पाणी प्या. फक्त घोरणे नाही तर इतर अनेक आजार कमी होतील.

तर मंडळी, तुम्हाला जर घोरण्याचा त्रास असेल तर हे ६ उपाय करून बघा..... आणि जर नसेल तर इतरांना हे उपाय समजावेत म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.

 

 

आणखी वाचा :

अगदी युद्ध चालू असतानासुद्धा हमखास झोप येईल अशा या दोन ट्रिक्स...आजपासून तुम्हीही झोपा फटाफट आणि ते ही डाराडूर !!

चक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ?...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का ?

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

८ तासांच्या झेपेनंतरही थकवा जाणवतो? मग हे वाचाच!!

हे १० प्राणी फक्त झोपण्यासाठीच जन्माला आले आहेत...माणूस कितव्या नंबरवर आहे बघा !!

सबस्क्राईब करा

* indicates required