computer

तुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं करतं का? जाणून घ्या त्यामागची कारणं..

“केलंस ना अंथरूण ओलं? आता लहान राहिलास का तू?”

“कधी अक्कल येणार तुला? झोपेत अंथरूण ओलं करण्याचं वय आहे का तुझं?”

हे असे संवाद कुणी आपल्या मुलाला/मुलीला रागावण्यासाठी वापरत असेल तर थांबा… रागावण्यापेक्षा गरज आहे लहान मुलं झोपेत अंथरूण ओलं का करतात हे समजून घेण्याची!

लहान मूल असलेल्या प्रत्येक घरातील ही समस्या आहे. कुणी मुद्दाम झोपेत शू करत नाही. असं होण्यामागे काय कारणे आहेत ती आपण समजून घेऊया…

१. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अंथरूण ओले होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. या लहान वयात मुलांनी आपल्या शरीरावर पूर्णतः नियंत्रण मिळवलेले नसते, त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक क्रिया रोखल्या जात नाहीत.

२. ज्या मुलाचं वय ५ वर्षापेक्षा अधिक आहे आणि एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा तो अंथरूण ओले करत असेल त्या मुलाला ‘नॉक्टर्नल एनयूरेसिस’ ही समस्या आहे असे वैद्यकीयदृष्ट्या समजले जाते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

३. रात्रीच्यावेळी लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात एक हार्मोन काम करत असतं. या हार्मोनला ‘एन्टी डाइयूरेटिक हार्मोन’ म्हणतात. जर तुमचं मुल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर त्याच्यामध्ये ADH चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते.

४. झोपेत शु होण्यामागचं एक प्रमुख कारण मूत्राशयाचा आकार लहान असणं हेही एक असू शकतं. मूत्राशय किडनीतून येणारं मुत्र साठवण्याचं काम करत असतं. जर त्याचा आकार लहान असेल तर वारंवार शु होऊ शकते. याखेरीज मूत्राशयाचा अशक्तपणा हे दुसरं कारण असू शकतं.

५. जी मुले गाढ झोपतात त्यांच्यामध्येही अंथरूण ओले करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.

६. मुलांचा स्वभाव फारच चंचल असेल आणि दिवसभर ती खेळण्यात व्यस्त असतील तर रात्री त्यांचे अंथरूण ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

७. बऱ्याचदा मानसिक ताणतणावामुळे असे होऊ शकते. असे आढळून येते की, मानसिक तणाव एखाद्या दिवशी जास्त असेल तर मूल अंथरूण हमखास ओले करते आणि मानसिक तणाव अजिबात नसेल तर मात्र असे होत नाही.

८. साधारणपणे मुलांच्या पाचव्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत हळू हळू ही सवय आपोआप कमी होत जाते. त्यामुळे दहा वर्षापर्यंतचा मुलगा/मुलगी अंथरूण ओले करत असेल तर तशी फार काळजीची गोष्ट नाही.

९. कित्येकदा मुलांच्या आईवडिलांना लहानपणी अशी सवय असेल तर मुलांमध्येही अशी सवय आढळून येते. त्यातही मुलींपेक्षा मुलांमध्ये झोपेत शू करण्याची शक्यता तिपटीने जास्त असते असे अभ्यासातून दिसून आले आहे.

समजा कुणी रात्रीशिवाय दिवसाही अंथरुण ओले करत असेल, लघवीला त्रास होत असेल, नैसर्गिक विधींवर नियंत्रण राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

 

आता प्रश्न येतो की, लहान मुलांची ही सवय कशी कमी करायची? तर त्यावर अर्थातच रागावणे हा उपाय अजिबात नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. उलट त्यांना स्वतःला या बाबतीत अपराधी वाटू नये म्हणून जवळ घेऊन समजावणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मुलांची मने ताणतणाव विरहित राहावी म्हणून पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांवर ओरडल्याने ती अधिक तणावाखाली जातात आणि प्रेमाने समजवल्याने त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी बाथरूमला जायची सवय मुलांना लावली पाहिजे. एक निश्चित वेळ ठरवून रोजच्या रोज त्याच वेळी बाथरूमला गेल्यास अंथरुण ओले होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात द्रव पदार्थ पाजवणे टाळले तरी सुद्धा या समस्येवर मात करता येऊ शकते.

 

तर आता मुलांनी अंथरूण ओले केले तर त्यांना तुम्ही रागावू नका आणि दुसरे कुणी रागावत असेल तर त्यांना समजावून सांगा. हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून लहान मुले असलेल्या अनेक घरातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required