computer

सावधान !! आलीये निपाह व्हायरसची साथ...जाणून घ्या याची कारणं, लक्षणं आणि तुम्ही घ्यावयाची खबरदारी...

स्वाईन फ्ल्यू, इबोला नंतर आता नवीन व्हायरस माणसांचा जीव घेत आहे राव. ह्या व्हायरसचं नाव आहे ‘निपाह’. हा व्हायरस केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात वेगाने पसरत असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय २५ जण गंभीर अवस्थेत आहेत. मृतांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्स लिनी यांचाही समावेश आहे.

मंडळी हे नवीन नैसर्गिक संकट आलेलं असताना आपल्याला याबद्दल फारच कमी माहिती असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निपाह व्हायरस बद्दल सर्व महत्वाची माहिती देणार आहोत... मग करायची का सुरुवात ?

तर मंडळी, ह्या निपाह व्हायरसचा इतिहास मोठा रंजक आहे. आधी तो जाणून घेऊया....

१. हा व्हायरस पहिल्यांदा १९९८ साली मलेशियात आढळून आला. मलेशियाच्या ‘कम्पंग सुगाई निपाह’ या भागात व्हायरस आढळून आल्याने त्याच जागेच नाव त्याला देण्यात आलं.

२. सुरुवातीला हा व्हायरस डुकरांपासून पसरत आहे असं आढळलं. पण त्याचं मूळ कारण सापडलं नाही. यात तब्बल २६५ शेतकऱ्यांचा बळी गेला होता

३. २००४ साली बांगलादेश मध्ये ह्या रोगाची लक्षणे दिसून आली होती. तिथेही याचं मुख्य कारण सापडलं नाही.

४. त्याआधी २००१ साली पश्चिम बंगालच्या सिलीगुडी मध्ये या रोगाने ४५ जणांचा बळी घेतला होता.

५. पुन्हा २०११ साली बांगलादेश मध्ये रोगाची लागण झाली आणि तब्बल ५० लोक मारले गेले. पण रोगाचा उगम आढळला नाही.

राव, या रोगावर सध्या संशोधन सुरु आहे. मुख्य म्हणजे हा रोग का होतो आणि त्यावर उपचार काय आहे हे अजूनही समजलेलं नाही. त्यामुळे त्यापासून जीव कसा वाचवायचा हा गंभीर प्रश्न आहे. पण ह्या रोगापासून सावध कसं राहायचं हे आम्ही तुम्हाल सांगू शकतो.

तर आता पाहूया या रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपला बचाव कसा करायचा ते.

लक्षणे

१. ताप, डोकेदुखी, उलट्या, विस्मरण, आळस येणे, श्वास घेण्यात अडचण ही निपाहची सुरुवातीची लक्षणे असतात.

२. ही लक्षणे १० दिवसांपर्यंत दिसू शकतात.

३. पुढे रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. काही रुग्णांमध्ये मज्जासंस्थेसंबंधी समस्या उद्भवतात.

३. काही गंभीर केसेस मध्ये रुग्ण कोमात गेलेले आढळून आलेत.

४. या रोगाचा शेवटचा टप्पा असतो ताप मेंदूत जाऊन रुग्णाचा मृत्यू.

निपाह कसा पसरतो.

१. वटवाघूळ किंवा डुक्करापासून निपाह पसरतो असे प्राथमिक अंदाज आहेत. तसेच तज्ञांनी सांगितल्या प्रमाणे आजारी घोडे आणि इतर जनावरांपासून देखील तो पसरू शकतो.

२. प्राण्यांनी उष्ट्या केलेल्या फळांमुळे तो पसरण्याचा धोका सर्वात जास्त असतो. खास करून वटवाघूळाने उष्टावलेल्या फळांनी लागण होऊ शकते.

३. लाळेवाटे किंवा द्रवपदार्थाने तो पसरला जाऊ शकतो. प्राण्यांपासून माणसाला आणि एका माणसांपासून इतरांना तो पसरत जातो.

काळजी कशी घ्यावी ?

१. झाडांवरून पडलेली फळे खाऊ नका. ही फळे पक्षांनी खाल्लेली असू शकतात. त्याचबरोबर अर्धवट खाल्लेली फळे खाऊ नका.

२. खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाऊ नका.

३. डुक्कर, घोडे, वटवाघूळ या सारख्या प्राण्यांपासून दूर राहा. वटवाघूळांचा राबता असलेल्या ठिकाणचं पाणी पिणे टाळा.

४. आंबे विकत घेताना विशेष काळजी घ्या. आंबे नीट धुतल्याशिवाय खाऊ नका.

४. तुमच्या आजूबाजूला कोणाला लागण झालेली असेल तर त्यांना भेटताना मास्क घाला. मास्क घातल्याशिवाय त्यांच्याशी संपर्क येऊ देऊ नका. कारण निपाह श्वसनावाटे पसरू शकतो.

तर मंडळी, या नव्या रोगावर पुढील काळात उपाय शोधून काढला जाईलच पण सध्या वर सांगितलेल्या मुद्द्यांप्रमाणे स्वतःची काळजी घ्या.

 

आणखी वाचा :

शनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव !!

जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!

उचकी थांबवण्याचे ६ सॉल्लिड उपाय, यातला तुम्ही कोणता अंमलात आणता ?

सबस्क्राईब करा

* indicates required