computer

डोहाळे का लागतात ? डोहाळे लागलेल्या स्त्रीलाही या मागचं नक्की कारण माहित नसणार !!

कुणाला काही खूप खावंसं वाटत असेल, तर आपण पटकन म्हणतो, "काय, डोहाळे लागलेत का काय"? पण हे डोहाळे का आणि कसे लागतात हे तुम्हांला माहित आहे का? नाही? विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!! 
तर मंडळी, आज आम्ही घेऊन आलोय डोहाळ्यांसंबंधीची माहिती. 

आपल्या महान भारतीय संस्कृतीत जन्माला आलेल्या प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे आणि लगेच त्याला किंवा बाळ झालंच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. ते काही असलं आणि गर्भारपण कितीही अवघड असलं तरी  आपल्या पोटात एक जीव वाढतोय ही भावनाच लै भारी असते.  पूर्वी लोकांना ढीगाने पोरं व्हायची, पण आता एक नाहीतर फारतर दोन मुलं होत असल्यानं त्या गरोदरपणाचंही जाम  कौतुक असतं. एकदा का  घरात हे गुपित उघड झालं,  की सगळ्यांच्या आनंदाला अगदी उधाण येतं. वडीलधारी मंडळी आपापल्या परीने सुचतील तशा सूचना करतात. “जड वस्तू नकोय उचलायला”, “गरम पडेल असं काही खाऊ नको हो”, “क्काहीही खावंसं वाटलं ना, तर अगदी हक्काने सांग हो”, अशा एक ना अनेक सूचनांचा मारा होतो.

पण खरं सांगायचं तर हे गरोदरपणातले नऊ महिने काही सोपे नसतात हो. काही बायकांना सकाळी उलट्यांचा त्रास होतो, कुणाला काही पचतच नाही, एक ना दोन!!  नऊ महिन्यांत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात, तिची दिनचर्या बदलते, मानसिक स्थिती बदलते. या काळात हार्मोन्स जाम बदलतात, त्या बदलत्या हार्मोन्सच्या पातळीमुळे ती बाई आणखीनच संवेदनशील बनते. या सगळ्या काळात गरोदर  स्त्रीच्या मनाशी संबंधित एक फार महत्वाची असते ती म्हणजे “डोहाळे”.

तुकोबांनी आपल्या अभंगात सांगितलेच आहे,

“गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।।

 म्हणजे पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. कारण त्या ठिकाणचा म्हणजे गर्भाचा स्वभाव तेथेच म्हणजे आईमध्येच प्रकट होतो.

वैज्ञानिकदृष्ट्या पाहायचं तर गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक तऱ्हेचे हार्मोन्स क्रियाशील होतात. यातले काही हार्मोन्स जास्त सक्रीय होतात आणि त्यामुळं बायकांना वेळीअवेळी एखादी ठराविक गोष्ट खाण्याची सॉलीड इच्छा होते.  यालाच एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे डोहाळे लागणे असे म्हणतात. जे पदार्थ एरवी नावडते असतात, ते अशावेळी अचानक आवडायला लागतात, खावेसे वाटतात,  ते खायला मिळाले नाहीत तर कमालीची बेचैनी होते. आणि हवं ते खायला मिळालं की, मनभर लगेच समाधान पसरतं. हे डोहाळे म्हणजे बाळालाच तो पदार्थ खायची इच्छा होते आहे असं मानलं जातं, त्यमुळे हे डोहाळे अगदी हट्टाने पुरविले जातात.

डोहाळे का लागतात याचं नक्की कारण समजलेलं नाही. ज्या अन्नपदार्थात फारसे पोषक गुण नाहीत असे पदार्थ गर्भावस्थेत काही स्त्रियांना खूपच खावेसे वाटतात. उदाहरणार्थ आंबट (चिंचा), लोणचं,चाट म्हणजे तेच ते आपलं भेळ-पाणीपुरी सारख्या गोष्टी, बर्फाचा गोळा, माती-खडू वगैरे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे डोहाळे  केवळ खाद्यपदार्थांशी निगडीत नसतात.  कोणत्याही गोष्टींचे डोहाळे लागू शकतात.  याला वैद्यकीय भाषेमध्ये ‘पिका’ म्हणतात. गर्भावस्थेत अनेक विचित्र वस्तूंचे डोहाळे महिलांना लागू शकतात. बनवाबनवी सिनेमात नाही  का डोहाळे लागले ह्या नावाखाली पार्वती विड्या ओढते, ह्यातला विनोदाचा भाग वगळता खरोखर असे काही विचित्र पदार्थ खाण्याची त्यांची इच्छा फार तीव्र असू शकते. असं काही तरी खाऊन आपल्या मनाचं तात्पुरतं सांत्वन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

ह्या असल्या विचित्र डोहाळ्यांचा गर्भवती स्त्रीवर विपरीत परिणाम होऊ शकतो कसा तो बघूया.

माती, खडू यांसारखे पदार्थ खावेसे वाटणे हे त्या स्त्रीला रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया झाला असल्याचं लक्षण समजलं जातं.  काही गरोदर बायकांना कोळसा खाण्याचे डोहाळे लागतात. सुमारे २५ ते ३० टक्के गर्भवती महिलांमध्ये कोळसा खाण्याची इच्छा उत्पन्न होताना पहावयास मिळते. वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये कोळशाचा वापर रुग्णाच्या शरीरातील घातक पदार्थ शोषण्यासाठी केला जातो. हे जरी खरे असले तरी गरोदर बाईनं कोळसा खाणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोळसा खात राहिल्याने त्या बाईच्या शरीरातली पोषक तत्वे कोळशामध्ये शोषली जातात. ह्याचे नुकसान ती बाई आणि तिच्या पोटात वाढणारा जीव या दोघांनाही होऊ शकते.

नुकतंच एक संशोधन केलं गेलं आहे, त्यात असं दिसून आलं आहे की माती खावीशी वाटणाऱ्या गरोदर बायकांचं प्रमाण खूप जास्त  आहे. गर्भावस्थेमध्ये जर बाईच्या शरीरात तांबे आणि लोहाची मात्रा कमी असेल, तर माती खाण्याची इच्छा त्यांच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. पण मातीसोबत मातीतले घातक जीवाणू खाल्ले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माती खाण्याची इच्छा वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचं आहे.

अनेक गरोदर बायकांना कच्च्या कांद्याचा वास देखील सहन होत नाही, तर अनेक बायकांना कच्चा कांदा खावासा वाटतो. कच्चा कांदा खाण्यात कोणतेही नुकसान नसले तरी तो प्रमाणातच खाल्ला जावा. अनेक बायकांना बर्फ खाण्याची इच्छा होते. खरंतर बर्फाला काहीच चव नसते, तरी ही बर्फ खाण्याची अनिवार इच्छा या महिलांना होत असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वस्तूचे डोहाळे हे त्यांच्या चवीवर नाही तर त्या वस्तूच्या पोतावर अवलंबून असते.  म्हणजे ती वस्तू स्पर्शाला कशी आहे यावर त्या वस्तूची वाटणारी असोशी अबलंबून असते.

पण काही असो, डोहाळे लागतात आणि ते पुरवावेतच. फक्त डोहाळे प्रमाणाच्या बाहेर लागले असतील तर डॉक्टरांना नक्की भेटावे.. यानिमित्तानं पाहून घेऊयात अस्सल मराठमोळी डोहाळ्यांची लावणी..

तुमच्यापण घरी या मागण्या कधी ना कधी आल्या असतील किंवा भविष्यात येतीलच की हो...

 

 

आणखी वाचा :

डोहाळ्यांवरून ओळखा बाळाचे गुण

डोहाळेजेवण साजरे करण्याच्या ५ वेगवेगळ्या पद्धती

सबस्क्राईब करा

* indicates required