जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!

घाई घाईत अन्न चावत असताना अचानक आपल्याच दातांनी आपली जीभ चावली जाते. जिभेला जखम होते, रक्त सुद्धा येतं. पण काय कमाल आहे राव, सकाळ पर्यंत जीभ अगदी ठणठणीत झालेली असते. आपल्या हातांना किंवा पायाला झालेली जखम भरून यायला काही दिवस तरी लागतातच पण जिभेची जखम एका रात्रीत कशी बरी होते ? विचार केलाय कधी ?

मंडळी, याचं उत्तर आहे आपली ‘लाळ’. आपल्या लाळेत हिस्टाटिन नामक रोग प्रतिकारक प्रथिने असतात.  हिस्टाटिनमुळे जखमेवर जमणारे सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि जखम भरण्यास सुरुवात होते. राव, ही प्रक्रिया फारच जलद असते.

स्रोत

जखम झालेल्या ठिकाणी जिथून कातडी निघालेली असते त्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि ती जागा भरून येऊ लागते. त्याचबरोबर मदतीला फायबरब्लास्ट नावाच्या पेशी येतात. या पेशी जोड पेशींना तयार करण्याचं काम करतात. फायबरब्लास्टचं आणखी एक काम म्हणजे नव्या पेशींना गरजेच्या असलेल्या प्रथिनांची निर्मिती करणे.

मंडळी, हे सगळं होत असताना शरीरातून जखमेच्या दिशेने रक्तप्रवाह वाढवला जातो आणि जखम भरून येण्याची गती वाढते. एकंदरीत काय तर युद्धपातळीवर काम सुरु होतं तेही फक्त लाळेच्या आधारावर.

मंडळी, शरीरावर कुठेही जखम झाली तर त्यावर औषध लावलं जातं पण जीभ हे एकमेव असं अंग आहे ज्याला बरं करण्यासाठी शरीरातच तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

 

आणखी वाचा :

दातांची कीड, उपाय आणि उपचार : थेट दंतवैद्यांच्या शब्दात !!

सबस्क्राईब करा

* indicates required