computer

इंदिरा गांधी यांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?

आज इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हत्येचं मूळ आहे खलिस्तान चळवळ आणि वादग्रस्त ठरलेलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार.

७०-८० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी जोर धरू लागली होती. काही जहालमतवादी शिखांनी खलिस्तानच्या मागणीसाठी सशस्त्र उठावाचा मार्ग निवडला. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसर हा अशाच जहालमतवादी कट्टरपंथीयांचा अड्डा बनला होता. पवित्र अशा सुवर्ण मंदिरातच दहशतवाद्यांनी शस्त्र गोळा केली होती. या सर्व दहशतवादी घडामोडींच नेतृत्व 'जर्नेल सिंह भिंद्रनवाले’ करत होता. तो आपला जहाल भाषणातून तरुणांना भडकवण्याचं काम करत होता. त्याचा व त्याच्या साथीदारांचा बिमोड करण्यासाठी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही मोहीम आखण्यात आली. या मोहिमेत काय घडलं ? त्याचे काय परिणाम झाले ? चला जाणून घेऊया या १० महत्वाच्या गोष्टी !!

 

१. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे दोन भाग होते. पहिला भाग होता ऑपरेशन मेटल. ऑपरेशन मेटल मोहिमेत भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिर परिसरातील दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देण्यात आले होते.

(मध्यभागी : जर्नेल सिंह भिंद्रनवाले)

२. दुसरा भाग होता ऑपरेशन शॉप. या मोहिमेत संपूर्ण पंजाब भागात छापे मारून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

३. ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम १ जून ते १० जून १९८४ पर्यंत चालू होती.

४. मोहिमेच्या पहिल्या दिवशी (१ जून) सैन्याने सुवर्ण मंदिराच्या प्रसिद्ध गुरु रामदास लंगरवर हल्ला केला. या हल्ल्यात ८ ते १० लोक मारले गेले.

५. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी पंजाब मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. खास करून सुवर्ण मंदिरात येण्याजाण्याचा मार्ग लष्कराने पूर्णपणे बंद केला.

६. ४ जून रोजी सुवर्ण मंदिर भागातील रामगढ़िया बंगा नामक इमारतीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला.

याच दरम्यान अकाली दलातील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष गुरुचरण सिंग तोहरा यांच्या सोबत मिळून एक कमिटी स्थापण्यात आली. या कमिटीने ‘जर्नेल सिंह भिंद्रनवाले’ सोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. 

७. ६ जून रोजी सैन्याने रणगाड्याच्या सहाय्याने अकाल तख्त उध्वस्त केले.

यावेळी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या समाप्तीनंतर भारत सरकारद्वारे अकाल तख्तची पुनर्बांधणी केली, पण शिखांनी त्याला पाडून स्वतः अकाल तख्तची पुनर्बांधणी केली. शिखांच्या मते सरकारने बांधलेलं तख्त हे अकाल तख्त नसून ‘सरकारी तख्त’ होतं. 

८. अकाल तख्त पडल्यानंतर ७ जून रोजी सैन्याने अकाल तख्त मध्ये प्रवेश केला. तिथेच जर्नेल सिंह भिंद्रनवाले आणि त्याच्या इतर साथीदारांचे मृतदेह आढळले. ७ जून रोजी भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर परिसरावर पूर्णपणे ताबा मिळवला होता.

९. सुवर्ण मंदिर आणि तिथला परिसर ताब्यात आल्यानंतरही पंजाब मध्ये संचारबंदी कायम राहिली. या दरम्यान पंजाब मधल्या घडामोडी टिपण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांना पंजाब मध्ये येण्यापासून रोखण्यात आलं होतं.

१०. ऑपरेशन ब्ल्यू स्टार संपल्यानंतर ४ महिन्यानंतर इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. हत्या करणारे २ अंगरक्षक होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर तब्बल ३३ गोळ्या झाडल्या होत्या.

मंडळी, ऑपरेशन ब्ल्यू स्टारने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि वाद उभा केला होता. मोहीम संपलीनंतरही त्याचे पडसाद खोलवर उमटले. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात दंगल उसळली. या दंगलीत जवळजवळ ३००० शीख मारले गेले. उरलेल्या काही दहशतवाद्यांनी एअर इंडियाचं विमान बॉम्बस्फोटाने उडवलं होतं. विमानातील तब्बल ३२९ प्रवासी मारले गेले. जनरल अरुण वैद्य यांचीही हत्या ब्लु स्टारचा सूड घेण्यासाठीच केली गेली. नंतरच्या काळात उरलेल्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी ब्लॅक थंडर नावाची मोहीम २ वर्षापर्यंत राबवण्यात आली.

या सर्व घडामोडी भारताचा इतिहास कायमस्वरूपी बदलण्यासाठी कारणीभूत ठरल्या.

 

आणखी वाचा :

आर. के. धवन यांना का म्हटलं जायचं वाघीणीचा म्हणजेच इंदिरा गांधींचा पंजा ??

जेव्हा इंदिरा गांधींवरील चित्रपटाची रीळ जाळण्यात आली होती...वाचा 'किस्सा कुर्सी का' !!!

तरूणपणातील जागतिक नेते : पाहा प्रसिद्ध लोकांचे दुर्मिळ फोटो..

सबस्क्राईब करा

* indicates required