computer

फेमस लोकांपासून प्रेरणा घेतलेल्या १० प्रसिद्ध फॅशन्स!! तुम्ही यातली कोणती स्टाईल केली होती?

सध्या सगळीकडे पाकिस्तानातून सुखरूप परत आलेल्या विंग पायलट अभिनंदन वर्तमान यांची चर्चा आहे. आणि चर्चा तर होणारच!  पाकिस्तानात जाऊन सुखरूप परत येणे म्हणजे जवळजवळ मरणाच्या दारातून परत फिरणेच की हो!!  त्यामुळं अभिनंदन यांचं सर्व भारतात कौतुक होतंय. पण सर्वात जास्त भाव खात आहे ती अभिनंदन यांच्या दाढीची स्टाईल! म्हणजे तशी ती मिशी आहे, पण तिनं दाढीला पण आपलंसं करुन ती दाढीमिशी झालीय.  कानाजवळून मिशीपर्यंत गेलेला कट अशी ती स्टाईल!!  अभिनंदन परत आले आणि देशभरात तरुणांनी अभिनंदन यांच्या सारखी मिशी ठेवायला सुरवात केली. त्यांच्याआधी साऊथ इंडियन चित्रपटातील अभिनेत्यांनी पण अनेक चित्रपटात अश्या प्रकारची स्टाईल केली होती.  पण जी हवा अभिनंदनने केली तिला तोड नाही बॉस!!

आता या स्टाईललाच अभिनंदन कट असे नाव पण पडलं आहे. तरुणांमध्ये सध्या या अभिनंदन कटची खूप क्रेझ आहे. अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन परत आल्यावर फक्त त्यांचा कट दिसेल अश्या ग्राफिक्समध्ये त्यांचे फोटो सोशल साईट्स वर टाकले होते. यावरून 'अभिनंदन कट' किती लोकप्रिय होत आहे याची कल्पना येईल...

पण हे पहिल्यांदा होत आहे असे समजू नका मंडळी.  याआधी पण अनेक सेलेब्रिटींची हेअर स्टाईल फेमस झाली आहे. कदाचित त्यातली एखादी स्टाईल तुम्ही पण कॉपी केली असेल. पण तुम्हाला माहीत नसलेले पण अनेक सेलेब्रिटी आणि त्यांच्या स्टाईल आहेत मंडळी!!

चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सेलेब्रिटी हेअर स्टाईलबद्दल..

साधना कट

आपल्या अफलातून ऍक्टिंग बरोबरच अभिनेत्री साधना प्रसिद्ध आहे ते तिच्या  साधना कट या हेअर स्टाईलमुळे! या मागची कथा पण रंजक आहे भाऊ! एका सिनेमाचं शूटिंग चालू होतं. डायरेक्टर आर के नय्यर यांना साधनाचं मोठं कपाळ खुपत होतं.  ते तिला मुंबईतल्या एका ब्युटीपार्लरमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी सांगितले की हॉलीवूडची हिरोईन ऑड्री हेपबर्नसारखी साधनाची हेअर स्टाईल करून घ्या. त्यांनी कपाळावरून जाणारी केसांची स्टाईल करून दिली. ती स्टाईल नंतर प्रचंड गाजली. एकदा एका पत्रकाराने साधनाला विचारले तुमच्या हेअरस्टाईलचे नाव काय? साधनाने उत्तर दिले, 'साधना कट'!!

अमिताभ

तरुण असताना आणि म्हातारपणात, दोन्हीवेळेस फेमस असणारा असा हा माणूस आहे. तरुण असताना थोडा तिरका भांग आणि तेल न लावलेले-कान झाकणारे तेव्हाच्या मानाने लांब केस अशी ती स्टाईल ठेवणं त्याकाळात अगदी मस्ट वाटावं अशा त्याकाळच्या लोकांच्या हेअरस्टाईल असायच्या.  

आता अमिताभने मेन रोल करणे कमी केल्यावर तो फ्रेंच कट दाढी ठेवायला लागला. बॉलीवूडचा महानायक ही स्टाईल ठेवतोय म्हणजे ती स्टाईल फेमस होणारच ना!! मग काय अमिताभची ही स्टाईल पण फेमस झाली.  मुख्य म्हणजे उंच असणारे लोकं मोठया प्रमाणावर हा फ्रेंच कट ठेवायला लागले.

टकलू हैवान

लक्ष्या आणि महेश कोठारेचा थरथराट चित्रपट आठवतोय? 

कसा नाही आठवणार! आणि त्यातला टकलू हैवान तर आजही सर्वांच्या लक्षात आहे. तर मंडळी एखाद्या विलनची हेअरस्टाईल फेमस होणे म्हणजे लई लई भन्नाट गोष्ट! या थरथराट मधल्या टकलू हैवानची हेअरस्टाईल पण महाराष्ट्रात खूप गाजली होती मित्रहो...

तेरे नाम

निर्जलाला बघून आपल्या डोळ्यांवर येणारी झुलपं बाजूला करणारा तेरे नाम मधला राधे म्हणजेच आपला सल्लूभाय तुम्हाला आठवत असेलच. डोक्याच्या मधोमध भांग पाडून डोळ्यावर येणारी केसं अशी ती स्टाईल. सल्लूच्या आधी आधी भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची पण तशीच स्टाईल होती,  पण तेरे नाम नंतर ही स्टाईल देशभरात प्रसिद्ध झाली. आजही अनेक लोकांचे केस तेरे नाम स्टाईलचे दिसतात.

गझनी

गझनी चित्रपटात दर पंधरा मिनिटांनी सर्व काही विसरणारा म्हणून सर्व काही अंगावर लिहून घेणारा असा वेगळा रोल आमिर खानने केला होता. त्यातली त्याची हेअरस्टाईल पण अशीच फेमस झाली होती.  एका हल्यात आमिरच्या डोक्यावर मार बसल्याने त्याच्या डोक्यावर एक व्रण उमटला होता.  तर ती स्टाईल पण लईच फेमस झाली होती. आमिरने त्याची स्टाईल फेमस करण्यासाठी फार भन्नाट आयडिया शोधून काढली होती, ती म्हणजे तो स्वतःच्या हाताने लोकांना गझनी स्टाईल कटींग करून द्यायचा. आहे ना भन्नाट आयडिया?

दिल चाहता है

आमिरखानवरुन आठवलं.. दिल चाहता है बघून लै लोकांनी गोटी ठेवायला सुरवात केली. पिक्चर येऊन १८ वर्षं होऊन गेली पण काही लोक अजून ती स्टाईल ठेवतात. 

तारें जमीं पर..

नाही, यावेळेस आमीरखान नाही.. इशान अवस्थी आणि त्याचे स्पाईक्स. आतापण आजूबाजूला पाहा, केसाला पाणी लावून स्पाईक्स तयार करणारी बरीच जनता तुम्हांला दिसेल. 

प्रीति झिंटाचे कुरळे केस

दिल चाहता है मध्ये प्रीति झिंटाने नेहमीपेक्षा वेगळी हेअरस्टाईल केली होती. कुरळ्या केसांची ही स्टाईल पण भन्नाट चालली. आधी कुरळे केस म्हणजे वाईट अशी समजूत होती. प्रितीने ती मोडून काढत कुरळ्या केसांनासुद्धा ग्लॅमर मिळवून दिले.

विराट कोहली

विराट म्हणजे पोरींचा जीव की प्राण! पण तो मुलांमध्ये पण तेवढाच हिट आहे. पोरांचा स्टाईल आयकॉन आहे गडी! मग त्याने स्टाईल केली आणि ती ट्रेडिंग नाही झाली असे कुठे होईल का राव!! तर या आपल्या विराटची पण स्टाईल चांगलीच फेमस आहे मंडळी. खासकरुन लहान मुलांचे हेअर कट आजकाल विराटसारखेच असतात. 

रोनाल्डो

विराट जसा भारतात स्टाईल आयकॉन आहे तसा हा रोनाल्डो जगातला पोरांचा स्टाईल आयकॉन आहे मंडळी! आपल्याकडे गल्लीतली बारकी पोरं पण जेल लावून डोक्याच्या मधोमध केसं वरती करून फिरतात ती स्टाईल म्हणजेच रोनाल्डो स्टाईल! रोनाल्डोची ही स्टाईल जगभरात खूपच फेमस आहे मंडळी! अनेक सेलेब्रिटीसुद्धा रोनाल्डोची स्टाईल फॉलो करतात.

देवानंद

बॉलीवुडचा सदाबहार हिरो म्हणजे देवानंद!  त्याची एका साइडला वाकून बोलण्याची स्टाईल अनेक मिमिक्री आर्टिस्ट करून दाखवतात. देवानंदची हेयर स्टाईल पण अशीच फेमस झाली होती. कपाळावरचा केसांचा कोंबडा  अशी देवानंदची स्टाईल जी अनेक आजही बॉलीवुडमधील अनेक हीरो फॉलो करताना दिसतात.

महाराज

महाराजांना आदर देण्यासाठी गड-किल्ले संवर्धन करण्यापेक्षा एक शॉर्टकट लोकांना सापडलाय. तो म्हणजे महाराजांसारखी दाढी ठेवणं. आता महाराजांसारखी स्टाईल ठेवणे फॅशन सेन्सचा भाग झालाय हो मंडळी.. 

 

हे सगळं झालं हो, पण तुमची सध्याची हेअरस्टाईल किंवा दाढी-मिशीची स्टाईल काय आहे मंडळी?? टाका की फोटो कमेंटबॉक्समध्ये!!

सबस्क्राईब करा

* indicates required