computer

नॅशनल जिओग्राफीची फोटो स्पर्धा...पाहून घ्या कोण कोण कुठल्या फोटोंसाठी ही स्पर्धा जिंकलं ते !!

मंडळी, दरवर्षी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत जगभरातून फोटोग्राफ्स मागवले जातात, वन्यजीवन (Wildlife), लोक (People), ठिकाण (Places) अशा ३ कॅटेगरीत ही स्पर्धा होते. या तीन कॅटेगरीज मधून पहिला, दुसरा व तिसरा असे तीन विजेते निवडले जातात. विजेत्यांना लाखो रुपयांचं बक्षीस असतं. त्याचा आकडा खालील लेखात आम्ही दिला आहेच.

२०१८ सालच्या स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यावर्षीच्या स्पर्धेत एकट्या प्लेसेस म्हणजे ठिकाणांच्या फोटोग्राफी स्पर्धेत जवळजवळ १०,००० फोटोग्राफ्स आले होते. यातून ३ फोटोग्राफ्सची निवड करण्यात आली आहेत. निवडण्यात आलेले फोटोग्राफ्स सर्वोत्कृष्ट का आहेत हे तुम्हाला फोटोज बघूनच समजेल. चला तर पाहूया ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनेल’ फोटोग्राफी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफ्स....

 

लोक (People)

१. लोक - प्रथम क्रमांक

फोटोग्राफर - मिया कॉलिस

फोटोत दिसणारा माणूस नैरोबीच्या एका फोटो स्टुडिओचा मालक आहे. त्याचं नाव डेव्हिड. ३७ वर्ष फोटो स्टुडिओ चालवल्यानंतर तो आता त्याचं दुकान कायमचं बंद करणार आहे. मोबाईलच्या युगात फोटो स्टुडीओचा वापर कोणी फारसं करत नसल्याने त्याला हा निर्णय घ्यावा लागला. त्याच्याच फोटो स्टुडीओ मध्ये त्याचा घेण्यात आलेला हा फोटो पहिला क्रमांक पटकावून गेला.

२. लोक - दुसरा क्रमांक

फोटोग्राफर – टोड कॅनेडी

हा फोटो फोटोग्राफरच्या मुलीचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या उन्हाळ्यात एका हॉटेल मध्ये हा फोटो घेण्यात आला. दिसायला अगदी साधा असला तरी फोटोत दिसणारे शेड्स, प्रकाशयोजना, फ्रेमिंग या गोष्टी फोटोला स्पेशल बनवतात.

३. लोक - तिसरा क्रमांक

फोटोग्राफर – अविषेक दास

चरक पूजा उत्सव हा पश्चिम बंगालच्या भागात साजरा केला जातो. या उत्सवात काही लोक मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तर काही लोक नवस फेडण्यासाठी स्वतःला लोखंडी आकड्याच्या सहाय्याने लटकावून घेतात. या लोकांची मग मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या फोटोग्राफ मध्ये याच उत्सवातील एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बापाच्या पाठीवर अडकवलेला आकड्याचा दोर आपण पाहू शकतो.

 

ठिकाणे (Places)

१. ठिकाणे - पहिला क्रमांक (ग्रँड प्राईज विनर)

फोटोग्राफर – जस्सेन टोडोरोव्ह

कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात उभ्या असलेल्या ऑडी आणि फोक्सवागनच्या गाड्यांचा हा फोटोग्राफ आहे. अमेरिकेच्या ‘पर्यावरण संरक्षण एजन्सी’च्या चाचणीला चकवा देण्यासाठी गाडीच्या निर्मितीत फेरफार केल्याचा आरोप दोन्ही कंपन्यांनवर होता. त्यानिमित्ताने २००९ ते २०१५ च्या सर्व कार्स परत मागवण्यात आल्या. या लाखो कार एकत्र उभ्या केल्यानंतर जस्सेन टोडोरोव्ह हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. फोटोत दिसणारे काळे, पांढरे व लाल ठिपके काय आहेत हे यामागची माहिती वाचल्याशिवाय चटकन समजून येत नाही हेच या फोटोग्राफचं यश म्हणता येईल.

२. ठिकाणे - दुसरा क्रमांक

फोटोग्राफर - ‘निकोलस मोयर’

ही आहे जुन्या फोर्ड थंडरबर्डची वादळानंतरची अवस्था. वादळानंतर गाडी लाल मातीने माखली आहे. वादळाच्या वेळी व्हिडीओग्राफर्स आणि फोटोग्राफर्सच्या टीम सोबत असलेल्या निकोलने हा क्षण टिपला आहे.

३. ठिकाणे - तिसरा क्रमांक

फोटोग्राफर – ख्रिस्चन वेर्नर

सिरियाच्या होम्स शहराच्या खालीदिया भागातील हा फोटोग्राफ आहे. युद्धामुळे बेचिराख झालेल्या शहराचं हे नजीकच्या काळातलं चित्रण. आजूबाजूला कोणतेही उंच ठिकाण नसल्याने फोटोग्राफरने एका मोडकळीस आलेल्या घराच्या छतावर जाऊन हे दृश्य टिपलं आहे. हे खरंतर ख्रिस्चन वेर्नरच्या जीवावरही बेतलं असतं. स्थानिक सैनिकाने तशी तंबी देऊनच हे पाऊल उचलण्याचा सल्ला दिला होता.

 

वन्यजीवन (Wildlife)

१. वन्यजीवन – पहिला क्रमांक

फोटोग्राफर – पिम वॉकर्स

हा प्राणी आहे विल्डबीस्ट. टांझानियाची ‘मारा नदी’ पार करतानाचा हा क्षण आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह, धूळ माती, अंधुक प्रकाश या साऱ्यांनी मिळून या फोटोग्राफला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

२. वन्यजीवन – दुसरा क्रमांक

फोटोग्राफर – जोनास बेयर

फोटो नक्की कसला आहे असा प्रश्न पडला असेल ना ? हा ‘मस्कॉक्स’ नावाचा प्राणी आहे. ग्रीनलँडच्या बर्फात ‘मस्कॉक्स’ प्राण्यांचा झुंड धावताना एकत्र आल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

३. वन्यजीवन – तिसरा क्रमांक

फोटोग्राफर – एलिसन लॉंगवेड

दक्षिण आफ्रिकेतील जीमांगा गेम रिझर्व हे फोटोग्राफीसाठी तयार करण्यात आलेला वन्य भाग आहे. फोटोग्राफी मध्ये वेळ साधणं फार महत्वाचं असतं. मध्यरात्रीच्या वेळी डोळे जड झालेल्या अवस्थेत असताना दोन पांढरे गेंडे एलिसन लॉंगवेडला दिसले. त्याने लगेचच परफेक्ट वेळ साधून हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

तर आता जाणून घेऊया स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या बक्षिसांबद्दल

‘ग्रँड प्राईज विनर’ असलेल्या फोटोग्राफरला ५००० डॉलर्स एवढी रक्कम मिळते. त्याशिवाय त्याचा फोटोग्राफ नेटजिओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पब्लिश करण्यात येतो. उरलेल्या कॅटेगरीतील वेजेत्यांना पुढील प्रमाणे बक्षीसे आहेत.

पहिला क्रमांक – २५०० डॉलर्स

दुसरा क्रमांक – १५०० डॉलर्स

तिसरा क्रमांक – ७५० डॉलर्स

 

तर मंडळी, पुढच्यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत आपल्या मराठी माणसाचा नंबर लागला पाहिजे. काय म्हणता मग ? लागा कामाला !!

सबस्क्राईब करा

* indicates required