एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वापरता? मग या चार गोष्टी तुम्ही कधीच करू नका...

नमस्कार मंडळी. आजकाल रोज पेपर उघडला की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नाहीतर इंटरनेट बँकिंग वरून फसवणूक झाल्याची एकतरी बातमी असतेच असते. परवाच नवी मुंबईतल्या एका बाईनं तिला आलेला OTP म्हणजेच One Time Password चक्क २८ वेळा फोनवरून चोरांना दिला आणि तब्बल ७ लाख गमावले की हो..! काय आहे, अजून या सगळ्याबाबतची पूर्ण माहिती लोकांकडे नाही आणि हे चोर नेमके त्याचाच फायदा घेतात. तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे, तुम्हांला रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार आहेत असं काहीही सांगून तुम्हांला घाबरवतात किंवा लालूच दाखवून जी माहिती फक्त तुमच्याकडेच असते, ती विचारून घेतात.

स्त्रोत

हे चोर या चोऱ्यांमध्ये निर्ढावलेले आहेत. यांना आपण पकडले जाऊ याची भीतीही नाही. एकाच नंबरवरून ते तुम्हांला दिवसभर फोन करत राहतील. कधी कधी बँकेचा डेटा चोरीला जातो. त्यातून तुमच्या कार्डाची अर्धवट माहिती त्यांच्याकडे जाते. पण ती चोरीसाठी पुरेशी नसल्यानं तुम्हांला फोन केला जातो. मग कधी तुमच्या आवाजाची पडताळणी करायची आहे म्हणून मी अर्धी माहिती सांगतो, तुम्ही राहिलेली अर्धी माहिती द्या म्हणतात, कधी आम्ही नवी कार्डे पाठवत आहोत, म्हणून तुमच्या नवीन कार्डसाठी माहिती द्या म्हणतात.. म्हणजेच तुमच्याकडून हवं ते मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात.

पण मग नक्की काय माहिती आपण कुणालाही सांगायची नाहीय? वाचा तर मग.

१. आपला सोळा अंकी कार्ड नंबर

स्त्रोत

आपल्या डेबिट म्हणजेच एटीम कार्डवर किंवा क्रेडिट कार्डावर हा १६ अंकी नंबर समोरच्या बाजूस छापलेला असतो. पाहा बरं कार्ड काढून. हां, तोच तो. चार-चारच्या चार गटात लिहिलेला. हा कुणालाही पूर्ण सांगायचा नाही. आपण एटीम मधून पैसे काढतो तेव्हाची रिसीट किंवा क्रेडिट कार्डने बिल भरल्यावर आलेला मेसेज नाहीतर ईमेल पाहा, तिथेही हा नंबर xxxx xxxx xxxx 5671 असा काहीसा लिहिलेला असतो. म्हणजे तुमची बँक शेवटचे चार आकडे तुमचं कार्ड ओळखायला वापरते. मग कुणी आम्ही बँकेकडून बोलतोय म्हटलं तरी पूर्ण सोळा आकडे कशाला सांगायला हवेत? 
  
२. तुमचा CVV नंबर

स्त्रोत

आता तुमचं कार्ड उलट करा. मागे एक काळी पट्टी असते, तिच्या शेवटी एक तीन अंकी नंबर छापलेला आहे पाहा. तो आहे तुमचा CVV नंबर. हा नंबर हवंतर इथून खोडला तरी चालतो, फक्त त्याआधी तो नीट लक्षात ठेवा. खोडता यावा म्हणूनच तो वेगळ्या प्रकारे छापलेला असतो. 

३. तुमचा चार अंकी पिन

पैसे काढताना, कुठे पेमेंट करताना किंवा अशाच काही कामासाठी तुम्हाला जो चार अंकी पासवर्ड टाकावा लागतो, तो कुणालाही सांगायचा नाही. एटीममध्ये पैसे भरताना किंवा काढताना काही प्रॉब्लेम आला आणि कुणी लगेच मदतीला सरसावला, तरी नाही. कालच्याच  बातमीत एका गरोदर बाईने तिला बाहेर जाता येत नव्हतं म्हणून नवऱ्याला कार्ड आणि पिन देऊन पैसे काढायला पाठवलं, पण काहीतरी प्रॉब्लेम होऊन पैसे आले नाहीत. प्रकरण कोर्टात गेलं, बाहेर न आलेले पैसे एटीममध्येच असल्याचं सिद्धही झालं, पण फक्त ती व्यक्ती स्वतः पैसे काढायला न गेल्यानं त्यांना पैसे मिळाले नाहीत. म्हणजे बघा, हा नंबर तुमच्या लग्नाच्या बायकोला किंवा नवऱ्याला पण सांगायचा नाहीय, मग इतर लोक तर दूरच राह्यले.

४. तुम्हांला एसेमेसद्वारे आलेला OTP

स्त्रोत

इंटरनेट बँकिंग  करताना, काही खरेदी करताना किंवा मोबाईल नंबर पडताळून पाहायला बरेचदा आपल्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड येतो. हा कुणालाही सांगायचा नाही. कुणी तरुण मुलगी फोन करून म्हणेल, "मी जॉब अँप्लिकेशनला चुकून तुमचा नंबर दिला हो, कारण माझा आणि तुमचा नंबर जवळजवळ सारखाच आहे. मला नोकरीची खूप गरज आहे हो, प्लीज तुमच्या मोबाईलवर आलेला OTP मला अमक्या नंबरवर द्या ना."तुमचा-माझा नंबर सारखा आहे म्हणणाऱ्या मुलीनं दिलेला नंबर आणि तुमचा नंबर यात जमीन अस्मानाचा फरक असतो, कारण ती तुम्हांला चुना लावायचा प्रयत्न करत असते. तेव्हा कुणालाच हा नंबर देऊ नका नाहीतर छानपैकी पैसे गमावून बसाल.

५. तुमची व्यक्तिगत माहिती

स्त्रोत

बऱ्याच ठिकाणी, विशेषतः जिथे आपलं अकाउंट असतं, ते लोक हे अकाउंट तुमचंच आहे हे व्हेरिफाय करण्यासाठी तुमची व्यक्तिगत माहिती विचारत असतात. ही माहिती इतरांना मिळाली, तर तिचा दुरुपयोग हमखास!!
म्हणून तुमची पूर्ण जन्मतारीख, आईचं पूर्ण नाव अशा गोष्टी बाहेरून अनोळखी व्यक्तीने फोन करून विचारल्यास सांगू नका.
जर समजा, तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन केलाय, आणि तो नंबर बरोबर बँकेचाच असल्याची तुम्हाला खात्री आहे, तर तिथं ही माहिती दिल्यास काही अडचण नाही. 

पण तुमचा CVV, OTP आणि चार अंकी पिन ही  माहिती कुणालाही सांगायची नाही, अगदी बँकेत गेल्यावर तिथल्या कारकूनाला किंवा अधिकाऱ्यालाही नाही!!

या व्यतिरिक्त आणखी काही माहिती कुणी फोन करून विचारू लागलं, आणि तुम्हाला यात काही काळंबेरं असेल असा थोडा जरी संशय आला, तरी ती माहिती देऊ नका. सरळ थोडा वेळ काढा आणि थेट आपल्या बँकेतच जाऊन या ना राव! एक-दोन दिवस थांबलं म्हणून कार्ड काही ब्लॉक होत नाही. जर होणार असेल तर बँक दरदिवसाआड मेसेज पाठवत राहाते, त्यामुळे खरंखोटं लगेच करता येतं. 

त्यामुळं 'जरासी सावधानी, जिंदगीमे लायेगी बहोत आसानी' हे लक्षात ठेवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required