computer

चष्म्याची काळजी घेण्याच्या ५ भन्नाट टिप्स !!

चष्मीश मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत. तुमचा चष्मा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तरी चष्मा सांभाळताना काही चुका या होतातच. मग चष्म्यावर ओरखडे पडतात, काच जास्तीची घासली जाते आणि त्याचा त्रास शेवटी डोळ्यांनाच होतो.

या लहानसहान चुका टाळण्यासाठीच आज आम्ही तुम्हाला चष्म्याची काळजी घेण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. चला तर पाहून घ्या !!

१. नेहमी चष्मा दोन्ही हातांनी काढा.

सिनेमात दाखवतात तसं एका हाताने चष्मा काढू नये. एका हाताने चष्मा काढणं हे सनग्लासेस सोबत शोभू शकतं, पण नंबरचा चष्मा असेल तर हे टाळायला हवं. एका हाताने चष्मा काढल्यास फ्रेम हलू शकते आणि ती तुमच्या चेहऱ्यावर नीट बसणार नाही.

२. चष्मा साफ करताना या चुका टाळा.

चष्मा साफ करण्यासाठी क्लीनरचा वापर हा केलाच पाहिजे. या क्लीनर मध्ये अमोनिया किंवा अल्कोहोल आहे की नाही हेही तपासून पाहायला हवं. क्लीनर नसेल तर तुम्ही लिक्विड डिश सोप पण वापरू शकता. लिक्विड डिश सोप ? हो भाऊ !! घाबरू नका लिक्विड डिश सोपने तुमच्या चष्म्याचं नुकसान होणार नाही. काचेवर लिक्विड डिश सोप लावून बोटांनी तो पसरवा आणि नंतर धुवून टाका.

आणि हो सर्वात महत्वाचं, चष्मा पुसण्यासाठी टॉवेल, शर्ट, जुन्या बनियनचा तुकडा किंवा आणखी कोणतंही कापड वापरू नका. चष्मा साफ करण्यासाठी जे खास कापड मिळतं त्याचाच वापर करा.

३. आपल्या चष्म्याला उष्ण जागी ठेवू नका.

चष्म्याची काच बनवण्यासाठी हल्ली प्लास्टिक वापरलं जातं. हे प्लास्टिक उष्ण जागेत राहिल्यास विरघळू शकतं.

४. चष्म्याच्या बॉक्स मध्ये चष्मा कसा ठेवाल ?

चष्मा वापरायला सुरुवात केल्यापासून बरेचजण त्यासोबत आलेल्या बॉक्सला विसरतात, पण तसं करून चालणार नाही. या बॉक्सचा वापर झाला पाहिजे. बॉक्स मध्ये चष्मा ठेवताना पण काच खाली नसेल याची काळजी घ्या. काच जर खाली असेल तर ओरखडा पडण्याची शक्यता असते.

५. चष्मा जर सारखा सारखा नाकावर येत असेल तर घ्यावयाची काळजी.

चष्मा नाकावर घसरत असेल तर चिडचिड होते, पण यावर सुद्ध उपाय आहे. चष्मा एका जागी टिकून राहावा म्हणून तुम्ही Wedgees वापरू शकता. Wedgees कापडापासून बनवलेलं असतं. कानाजवळच्या चष्म्याच्या काडीवर लावल्यास चष्मा एकाजागी स्थिर राहतो. याखेरीज Nerdwax हा खास बाम वापरू शकता. Nerdwax चष्म्याच्या नाकाजवळच्या भागात लावता लावल्यास चष्मा घसरत नाही.

 

तर मंडळी या खास टिप्स कशा वाटल्या ? तुम्ही तुमच्या चष्म्याची काळजी कशी घेता हे आम्हाला सांगायला विसरू नका !!

 

आणखी वाचा :

हे १२ त्रास फक्त चश्मिष माणसंच समजू शकतात!!!

सबस्क्राईब करा

* indicates required