computer

सलमानला कोर्टात खेचणाऱ्या बिश्नोई समाजाबद्दल या ७ गोष्टी माहित आहेत का ?

१९९८ साली सल्लू भाईजानने काळविटाची शिकार केली. आज जोधपुर न्यायालयात याच खटल्याचा निकाल लागला आणि आपला लाडका भाई दोषी ठरला आहे. मंडळी, सलमानने काळविटाची शिकार केल्यानंतर त्याच्या विरोधात ज्या समाजाने आवाज उठवला तो समाज म्हणजे बिश्नोई. सलमानला न्यायालयात खेचून दोषी ठरवण्याचं श्रेय बिश्नोई समाजालाच जातं.  

बिश्नोई समाज पर्यावरणाशी व वन्यजीवनाशी घट्ट जोडला गेला आहे. सलमानने ज्या गावात काळविटाची शिकार केली ते गाव बिश्नोई समाजाचं होतं. वन्यप्राणी आणि पर्यावरणावर प्रेम असलेले हे लोक काळविटाच्या शिकारीवर गप्प बसले नाहीत. आज २० वर्षानंतरही हा लढा सुरूच आहे.

मंडळी, आज आपण याच बिश्नोई समाजाबद्दल जाणून घेणार आहोत. इतर समाजापेक्षा हा समाज वेगळा का आहे हे जाणून घेऊया खालील ६ मुद्द्यांच्या आधारे...

१. थर वाळवंटातील रांगडे गडी.

राजस्थानच्या थर वाळवंटात राहणारी एक रांगडी जमात म्हणून बिश्नोई ओळखले जातात. त्याचं मूळ स्थान राजस्थान असलं तरी ते हरयाणा उत्तर प्रेदेश, पंजाब पर्यंत पसरलेले आहेत.  

२. २९ सिद्धांत

बिश्नोई चा अर्थ होतो बिश म्हणजे वीस आणि नोई म्हणजे नऊ. म्हणजे २९ सिद्धांतावर आधारलेला समाज. हे सिद्धांत गुरू जम्भेश्वर या संताने तयार केले. जम्भेश्वर यांनीच बिश्नोई समाजाची स्थापना केली होती.

३. कोणकोणते सिद्धांत आहेत ?

२९ सिद्धांतापैकी १० सिद्धांत हे स्वच्छता आणि आरोग्याविषयी आहेत. ७ सिद्धांत हे समाजातील वर्तनाबद्दल आहेत. ८ सिद्धांत जैवविविधतेच्या संरक्षणासंदर्भात आणि उरलेले ४ हे देव पूजेविषयी आहेत.

४. पर्यावरण संरक्षण

संस्थापक गुरु जम्भेश्वर यांनी ज्या विचाराने बिश्नोई समाजाची स्थापना केली ती मुळातच पर्यावरण संरक्षणावर आधारलेली आहे. १४५१ साली जन्मलेल्या जम्भेश्वर यांनी आजूबाजूच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला थांबवण्यासाठी लोकांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आणि तिथूनच हा समाज तयार झाला.

५. चिपको आंदोलन

मंडळी, चिपको आंदोलनाची मूळ प्रेरणा ही बिश्नोई समाजाच्या बलीदानावर आधारलेली आहे. १७३० साली जोधपुरच्या महाराजाने आपला राजवाडा बांधण्यासाठी खेजरी वृक्षांची तोड करण्याचे आदेश दिले होते. सैनिक जेव्हा झाडं तोडण्यासाठी आले तेव्हा अम्रिता देवी नामक महिलेने त्यांना विरोध केला. ती झाडाला चिकटून उभी राहली. तिच्या कुटुंबातील व गावातील लोकांनी तिचं अनुकरण केलं. जीव गेला तरी झाड तोडू देणार नाही हे धोरण तिने ठेवलं. शेवटी तिला झाडापासून वेगळं करण्यासाठी सैनिकांनी तिचा खून केला. तिच्या बरोबर तब्बल ३६२ बिश्नोई लोक यात मारले गेले.

 

आणखी वाचा :

गुगलच्या या डूडल मागचा अर्थ काय आहे ? माहित्ये का भाऊ ?

६. तीर्थस्थळ

राजस्थानच्या बिकानेर जवळील मुकाम हे बिश्नोई समाजाचं तीर्थस्थळ आहे. याच जागी गुरू जम्भेश्वर यांची समाधी आहे.

७. वन्यजीवन आणि विचित्र प्रथा

आपल्याला बिश्नोई समाजाचं वन्यजीवनावरील प्रेम थोडं विचित्र वाटू शकतं. आता हेच बघा ना, बिश्नोई स्त्रिया वेळ आली तर हरणाच्या पाडसाला स्वतःचं दुध पाजतात जेणेकरून ते पाडस जिवंत राहावं.

 

मंडळी, बिश्नोई शिवाय पर्यावरणावर एवढं प्रेम असणारा दुसरा समाज आम्ही तरी पाहिला नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required