computer

चक्क १ नागरिक असलेली ही ७ गावे माहित आहेत का ? पाहा बरं कुठे आहेत ही गावे !!

मंडळी, जग अनेक विचित्र गोष्टींनी भरलेलं आहे. आता हेच बघा ना, एकीकडे देशांची लोकसंख्या भरमसाठ वाढत असताना दुसरीकडे मात्र अशी काही गावं आहेत जिथे फक्त एक नागरिक राहतो. आपण भारतासारख्या देशात राहातो. इथल्या गजबजलेल्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहतो तिथे राहून या गावांची कल्पना करता येणार नाही. पण मंडळी, अशी गावं खरंच अस्तित्वात आहेत.

चला तर, आज एकमेव नागरिक असलेली ही गावे फिरून येऊया. आणि हो हे लोक तिथे एकटेच का राहतात हेही समजून घेऊया... 

१. जॉर्डन नदीच्या भागातील गाव, कॅनडा

मंडळी, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी, शांत वारा, खिडकीतून दिसणारा सुर्यास्त अशा दृश्यांनी नदीकाठचं घर स्वप्नासारखं वाटू शकतं. पण जेव्हा त्सुनामी, वादळ, पूर येतो तेव्हा हीच नदी काठावर राहणाऱ्या माणसांना गिळून टाकते. असंच काहीसं जॉर्डन नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्यांचं झालं. सतत येणारे पूर आणि भूकंपामुळे इथली माणसं गाव सोडून निघून गेली. अपवाद होता तो फक्त ७२ वर्षांच्या ‘ह्यूज पिट’ नावाच्या आजोबांचा. हे आजोबा आपलं घर सोडून कधीच गेले नाहीत. त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्यांनी घर सोडण्यास नकार दिला. आता हे आजोबा एकटेच या गावात राहतात. 

२. मोनोवी, नेब्रास्का, अमेरिका

‘एल्सी एलर’ या मोनोवी गावाच्या एकमेव नागरिक आहेत. खरं तर या गावात ‘तब्बल’ दोन नागरिक राहायचे.  एक व्यक्ती अर्थातच एल्सी एलर आणि दुसरे म्हणजे त्यांचे पती रुडी एलर. रुडी एलर यांच्या मृत्यूनंतर एल्सी ह्या एकमेव नागरिक बनल्या आहेत. कधीकाळी या गावात १५० माणसं राहत होती.  पण नोकरीच्या निमित्तानं सगळ्यांनी शहराकडं स्थलांतर केलं.

३. बफोर्ड, वोमिंग, अमेरिका

नोकरी-कामासाठी गावे उजाड होणं हे फक्त आपल्याकडेच नाही राव. अमेरिकेत सुद्धा असंच घडलं आहे.  बफोर्ड गाव हे याच पद्धतीने उजाड झालं. या गावाची स्थापना झाली तेव्हा १८६६ साली या गावात २००० माणसं राहत होती. पुढे गावातली माणसं जवळच्या शहरात निघून गेली. १९९२ च्या दरम्यान गावात फक्त ७ रहिवासी उरले होते. यापैकी एक होते डॉन सोमोन्स. ते आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहायचे. १९९५ रोजी त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि मुलगा शहरात निघून गेला. अशारीतीने डॉन सोमोन्स बफोर्डचे एकमेव निवासी बनले.

४. लॉस्ट स्प्रिंग्स, वोमिंग, अमेरिका

लॉस्ट स्प्रिंग्स गावाची स्थापना १८८० साली झाली. या गावात मुख्यत्वे कामगारांची वस्ती होती. रेल्वे रुळाच्या बांधकामात काम करणारे व कोळसा खाणीत काम करणारे कामगार इथे राहत. १९११ साली या गावाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यावेळी २०० नागरिक गावात राहत होते. १९३० साली कोळसा खाण बंद पडली आणि इथली लोकसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. राव, १९६० पर्यंत गावात फक्त ६ लोक राहत होते. यानंतर या गावाला अमेरिकेतील सर्वात कमी लोकवस्तीचं गाव ठरवण्यात आलं.

२००० च्या जनगणनेनुसार लॉस्ट स्प्रिंग्समध्ये फक्त एक नागरिक राहतो. पण पुढे याला खोटं ठरवण्यात आलं. २०१० च्या जनगणनेनुसार या गावात ४ नागरिक राहत आहेत.

५. एला एपेकुयेन, अर्जेन्टिना

१९२० साली ‘लोगो एपेकुयेन’ नामक खाऱ्या पाण्याच्या तलावाकाठी एला एपेकुयेन गाव वसवण्यात आलं होतं. हे गाव म्हणजे एक पर्यटनस्थळ होतं. गावाबद्दल सांगण्याआधी या तलावाबद्दल जाणून घेऊया. लोगो एपेकुयेनची खारेपणाची क्षमता मृत समुद्राच्या खालोखाल आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की कोणत्याही समुद्रापेक्षा जास्त खारं पाणी या तलावात आहे.

१९२० साली स्थापना झाल्यानंतर १९७० पर्यंत या गावाची भरभराट झाली. जवळजवळ ५००० माणसं गावात होती. माणसांची रेलचेल, हॉटेल्स, स्पा, दुकाने, म्युझियम अशा सगळ्या गोष्टी इथं होत्या. पण अचानक निसर्गानं गावावर झडप घातली आणि या गावातलं सगळं नष्ट झालं.

स्रोत

१९८५ च्या सुमारास एला एपेकुयेन गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. प्रचंड पावसामुळे गावातलं धरण व बांध फुटला. हे कमी होतं म्हणून की काय म्हणून तलावाची पातळीसुद्धा वाढली. १९९३ पर्यंत या गावाला पाण्याने जवळजवळ गिळून टाकलं आणि गाव राहण्यासाठी अयोग्य ठरवण्यात आलं. तब्बल १६ वर्षांनी म्हणजे २००९ साली या गावावर असलेलं संकट कमी झालं. पण गेलेले नागरिक परतले नाहीत. पाब्लो नोवाक हे ८१ वर्षांचे आजोबा तेवढेच पुन्हा राहण्यासाठी आले. आज ते या भल्यामोठ्या गावाचे एकमेव नागरिक आहेत.

६. टोमिओका, जपान

११ मार्च, २०११ च्या फुकुशिमा अणुभट्टीतल्या स्फोटामुळं बाधित झालेल्या भागात टोमिओका हे गाव वसलेलं आहे. आधी भूकंप मग त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तीनंतर अणुभट्टीत स्फोट होऊन जवळजवळ २० किलोमीटरचा परिसर किरणोत्सर्गामुळं बाधित झाला होता. त्यानंतर आजूबाजूची गावे रिकामी करण्यात आली होती.

टोमिओका गावात जवळजवळ १६००० माणसं राहत होती. दुर्घटनेनंतर आजही ह्या भागात राहणं धोक्याचं म्हटलं जातं. पण धोका असूनही ‘नाओटो मात्सुमुरा’ (वय ५४) हे परत गावात राहायला आले. त्यांनी इतरांसोबत स्फोटानंतर गाव सोडलं होतं. पण काही वर्षांनी ते पुन्हा गावी परतले. आज ते गावात एकटेच राहतात. 

७. कास, न्युझीलंड

स्टेट हायवे ७३ हा न्यूझीलंड मधला एक महत्वाचा महामार्ग आहे. हा मार्ग पूर्व-पश्चिम न्यूझीलंडला जोडतो. त्याचबरोबर मिडलंड लाईन ही न्यूझीलंडची एक महत्वाची रेल्वी लाईन आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेले हे दोन्ही मार्ग ‘कास’ या गावाजवळून जातात. त्यामुळं एकेकाळी हे गाव गजबजलेलं होतं. मिडलंड लाईन तयार होत असताना या गावाची लोकसंख्या ८०० होती. रेल्वे लाईन बनून पूर्ण झाल्यानंतर अनेकजण गाव सोडून गेले.

बॅरी ड्रम्माँड हे २५ वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त कास गावात आले होते. त्यावेळी गावात बरीच लोकवस्ती शिल्लक होती. पुढे लोक गाव सोडून गेले पण बॅरी यांनी गाव सोडलं नाही. आज या भागात ५ घरं असली तरी बॅरी हे एकमेव नागरिक आहेत.

आहे ना खरंच विचित्र प्रकार? भारतात प्रत्येकच लहानमोठ्या गावात इतकी लोकसंख्या आहे की असं जगणं कुणाच्या नशिबी येईल असं वाटत नाही. पण जर समजा असं कधी काळी चुकून घडलं तर तुम्ही एकटे राहाल की दुसरीकडे जाऊन जरा चार लोकांत राहाल ?

सबस्क्राईब करा

* indicates required