आता फक्त 4999 रुपयात मिळवा एक स्मार्ट टीव्ही. पाहा काय भानगड आहे ही.

 

 

सध्या स्मार्टफोनचा सुळसुळाट झाला आहेच, पण आता स्वस्त स्मार्ट टीव्ही बाजारात येणार आहे असं या बातमीतून दिसतंय. तर मंडळी, samy नावाच्या एका स्मार्ट टीव्ही कंपनीने बत्तीस इंचाचा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेला स्मार्ट टीव्ही फक्त 4999 रुपये कींमतीत द्यायचे ठरवले आहे. पण ही पूर्ण स्टोरी नाही बरे, या टीव्हीची किंमत सगळे टॅक्स जोडले तर तुम्हाला थोडी जास्त पडेल. म्हणजे असं पाहा, पूर्ण भारतात शिपिंगसहित टीव्हीची किंमत साधारण आठ हजार रुपयांपर्यंत जाईल. तरीदेखील 8000 हा आकडासुद्धा अँड्रॉइड टीव्हीसाठी फारच आकर्षक आहे असं म्हणावं लागेल.

 

यासाठीची एक अट 

 

तर या स्वस्त टीव्ही मिळवण्यासाठी तुम्हाला या कंपनीचे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. यासोबतच तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने प्रायव्हेट कंपन्यांना आधार वापरण्यास बंदी घातली आहे. हे पाहता या कंपनीने आधार क्रमांक मागणे हे भुवया उंचावणारी गोष्ट आहे. पण या टीव्हीच्या किमतीकडे बघता लोक या या गोष्टीकडे दुर्लक्ष करतील ही शक्यताही नाकारता येत नाही.

 

काय आहे स्पेसिफिकेशन्स?

 

या टीव्हीच्या किमतीकडे दुर्लक्ष करून या टीव्हीमध्ये आपण काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा टीव्ही अँड्रॉइड टीव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आणि यात तुम्हाला गुगल प्ले स्टोअर टीव्हीवरून अनेक ॲप डाऊनलोड करता येतात. पण गंमत अशी आहे की अँड्रॉइड किटकॅट 4.4 या वर्जन वर आधारित हा टीव्ही आहे पण प्रत्यक्षात मार्केटमध्ये आता अँड्रॉइड 8.1 या व्हर्जनचे टीव्ही उपलब्ध आहेत. टीव्हीमध्ये आईपीएस एचडी डिस्प्ले १३६६* ७६८ या रिझोल्युशनमध्ये आहे. याशिवाय टीव्हीमध्ये १०W स्पीकर, दोन एचडीएमआय पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट उपलब्ध आहेत.

 

या टीव्हीची किंमत भारतात बनलेले पार्ट वापरल्यामुळे इतकी स्वस्त आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यांनी मेक इन इंडियाचा नाराच दिला आहे जणू. पण एकूणच हे सगळे पाहता हा टीव्ही कितपत चालेल हे काय सांगता येत नाही. या सगळ्या प्रकारावरुन आम्हाला  २५१ रुपयात स्मार्टफोन देणाऱ्या रिंगिंग बेल या फ्रॉड कंपनीची आठवण होते. त्यामुळे हे टीव्ही बाजारात येऊन त्यांचे रिव्यू आल्यानंतरच घ्यायचे की नाही हे ठरवा.

सबस्क्राईब करा

* indicates required