computer

छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत चित्र तयार करणारे कलायोगी जी कांबळे

महाराजांचं अधिकृत चित्र तयार करणारे कलायोगी जी कांबळे

चित्रकलेचं एक अनोखं विश्व आहे. एका विशिष्ट उच्चभ्रू वर्तुळात चित्रकलेची किंमत ही कोट्यवधींची उड्डाणे घेत असते. बरेच  चित्रकार त्यामुळे आर्थिक दृष्ट्या प्रचंड श्रीमंत होतात. अनेक चित्रकार मात्र श्रेष्ठ कलाकार असूनही विस्मृतीचं आयुष्य जगतात. अशाच चित्रकारांपैकी एक म्हणजे चित्रकार जी. कांबळे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून आलेल्या कलायोगी जी कांबळे अर्थात गोपाळ बळवंत कांबळे यांनी आपल्या कुंचल्याने अनेक चित्रपटांचे पोस्टर्स तर सजवलेच, पण त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत चित्र त्यांनी तयार केलं. हे चित्र तयार करण्यासाठी त्यांनी तब्बल पाच वर्ष अभ्यास केला.  महाराष्ट्र शासनाने हे चित्र महाराजांचं अधिकृत चित्र म्हणून १९७० साली स्वीकृत केलं आहे. या चित्रासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना रॉयल्टीही देऊ केली होती. पण या सच्च्या कलावंताने देवाचं चित्र काढण्याचे पैसे घेत नसतात, असं सांगून ही रॉयल्टी विनम्रपणे नाकारली ! छत्रपती शाहू महाराज यांचं एक चित्र जे कलायोगी कांबळे यांनी काढलं  आहे ते  प्रमाण मानून भारत सरकारने १९७९ मध्ये पोस्ट स्टॅम्प प्रसिद्ध केला आहे.  

जी कांबळे अर्थात यांचा जन्म कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. मग काय त्यांनी चित्रकलेचा प्रचंड सराव  केला. आणि या कलेवर प्रभुत्व मिळवलं. विशेष म्हणजे कोणताही गुरु नसताना त्यांनी एकलव्यासारखी साधना केली. कुठल्याही कला महाविद्यालयात प्रवेश न  घेताही त्यांनी  चित्रकलेवर जे प्रभुत्व मिळवलं ते अचाट आणि अफाट होतं. इंग्रजी सिनेमाची पोस्टर पाहून आणि त्यांचं अनुकरण करून कांबळे पोस्टर तयार करण्याची कला शिकले. इंग्रजी बोधचित्रकार फोर्तुनिनो मतानिया यांना कलायोगी कांबळे आपला आदर्श मानत असत. दिग्गजांचा काम बघून कांबळे यांनी स्वतःची कलासाधना सुरु ठेवली.  सुरुवातीच्या काळात  कांबळे यांनी कुठल्याही मानधनाशिवाय कोल्हापूरच्या छत्रपती सिनेस्टोनसाठी पोस्टर आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे कांबळे यांची  कुंचल्यावरची पकड बघता त्यांना चित्रपट पोस्टरची भरपूर  कामे मिळत गेली. आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. तिथे त्यांना बॉम्बे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ अशा स्टुडिओसाठी काम केलं. त्यांचं काम बघून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल स्टुडिओमध्ये सन्मानानं बोलावलं. तिथे त्यांनी एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा चित्रपटांचे पोस्टर्स तयार केले. राजकमल स्टुडीओसाठी कांबळे यांनी दो आंखे बारह हाथ, सावता माळी, झनक झनक पायल बाजे यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांची पोस्टर्स तयार केली.  'दहेज' या चित्रपटाचं पोस्टर बघून व्ही शांताराम यांनी खुश होऊन त्यांना चक्क हिल्मन मोटार  (कार) बक्षीस दिली होती.  के.आसिफ यांच्या जगप्रसिद्ध मुघले आझम चित्रपटाचं भव्य पोस्टरही कांबळे यांची अजरामर कलाकृती आहे. 

दिल्लीत १९६० "साली मुघले  आझम "चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती त्या इतक्या पोस्टर पेंटिंग वर प्रभावित झाल्या होत्या .भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता आली तिचा पाया कालायोगी यांनीच घालून दिला.  पोस्टर पेंटिंगला अभिजात कलेचा दर्जा प्रतिष्ठा आणि जागतिक किर्ती मिळवून देण्यात कांबळे यांचा मोलाचा वाटा आहे. 

मुघले आझम हा चित्रपट प्रचंड गाजला तरी कांबळे यांच्या पदरी मात्र या चित्रपटाने निराशाच दिली. या चित्रपटाच्या पोस्टर्ससाठी कांबळे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. ही पोस्टर्स तयार करण्यासाठी त्यांनी मुंबईत जेवढे विंडसर अँड न्यूटनचे रंग उपलब्ध होते तेवढे  एकट्याने खरेदी केले. (त्या काळात 'विंडसर अँड न्यूटन' हा रंगाचा एकाच परदेशी आणि महागडा ब्रँड उपलब्ध होता.) मुंबईतील रंग संपल्यावर त्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मद्रास इथून रंग मागवले. आणि भव्य अशा 'मुघल ए आझम'च्या पोस्टर्सची निर्मिती केली. चित्रपट यशस्वी झाला तरी के. आसिफ यांनी कांबळे यांची देणी थकवली असं सांगितलं जातं. त्यामुळे व्यवसायात नुकसान झाल्याने कांबळे यांना कोल्हापूरला परत यावं लागलं.  

पोस्टर्सच्या कलेने कांबळे यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला तरी कांबळे यांचा ओढा हा पेंटिंगकडे होता. आपल्या हातून केवळ चित्रपटांची पोस्टर्स तयार न होता अभिजात कलाकृती तयार व्हाव्यात या ओढीतून कांबळे यांनी अनेक पेंटिंग्स तयार केली. पौराणिक विषय आणि पोर्ट्रेट यामध्ये कांबळे यांनी अनेक कलाकृती तयार केल्या. अनेक समाजोपयोगी कामासाठी कांबळे यांनी चित्रे तयार केली. त्यातून उभा राहिलेला पैसे सामाजिक कामांसाठी दिला. त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन देश विदेशात झालं. १९६४ साली अमेरिकेतही त्यांचं चित्र प्रदर्शन झालं. 

भारत सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे चित्रावरूनच पोस्ट स्टॅम्प प्रकाशित केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. संतुजी लाड, पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी, रशियन नेते लेनिन, लाल बहादुर शास्त्री, रवींद्रनाथ टागोर, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, स्व. मीनाताई ठाकरे अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय थोर नेत्यांची, व्यक्तीची पोट्रेट पेंटिंग बनवण्याचा मानही जी कांबळेंना मिळाला. 

अशा या कलायोगी जी कांबळे यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी २००२ साली निधन झालं. छत्रपती शिवरायांच्या त्यांनी रेखाटलेल्या तैलचित्राने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली त्यांनी चित्रपटसृष्टीतील मोलाचे योगदान दिले. पण महाराष्ट्राने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही असंच म्हणावं लागेल. कारण त्यांच्या कुटुंबीयांनी २०१३ साली कांबळे यांच्या राहत्या घरी त्यांच्या चित्रांची गॅलरी सुरु करण्याचं नियोजन केलं होतं. सरकारी पाठबळा आभावी ही गॅलरी पूर्ण होऊ शकली नाही. हे महाराष्ट्राच्या कला क्षेत्रच मोठं दुर्दैव आहे.

-कनक वाईकर

सबस्क्राईब करा

* indicates required