बेंगलोरमधल्या पब्लिक फ्रीजबद्दल ऐकलं का मंडळी ?? या मस्त आयडियाला तुम्हीही सलाम ठोकाल !!

मंडळी, आजच्या काळात वाईट बातम्यांची मोजदाद नाही.  पण अगदी थोड्या चांगल्या बातम्यासुद्धा अधूनमधून येत असतात. अशीच एक चांगली बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. 

तर बातमी अशी आहे, बेंगलोरमध्ये ‘पब्लिक फ्रीज’ ही अनोखी संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या संकल्पनेत गरीब व गरजू लोकांना अन्न पुरवलं जातं. मंडळी, ही संकल्पना अगदी साधी सोपी आहे. अन्नदान करणाऱ्यांनी आपल्याजवळचं अन्न या पब्लिक फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गरजूंनी ते घ्यायचं. आज या संकल्पनेतून ४०० लोकांच्या अन्नाची समस्या सोडवली जात आहे.

स्रोत

पब्लिक फौंडेशनच्या ट्रस्टी फातिमा जास्मिन यांनी ही संकल्पना मांडली आहे. उरलेल्या अन्नाचं काय करायचं याचा विचार करत असताना त्यांना ही कल्पना सुचली. सुरुवातीला त्यांनी बाहेर एक फ्रीज ठेवला आणि त्यात अन्न ठेवण्यास सुरुवात केली. कालांतराने याला यश येत गेलं.

आज बेंगलोरच्या  ब्रूकफिल्ड, इंदिरानगर, बेन्सॉन टाऊन, बीटीएम लेआउट आणि कोरमंगला या भागात पब्लिक फ्रीज उभारण्यात आले आहेत. फातिमा यांनी सांगितल्या प्रमाणे पब्लिक फ्रीजच्या माध्यमातून एकट्या बीटीएम लेआउट भागात ८० ते १०० व्यक्तींचं पोट भरलं जातं आहे.

स्रोत

या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकजण आपल्याकडचं अन्न या फ्रीजमध्ये ठेवून जातात. फक्त नागरिकांनीच नाही, तर मोठमोठ्या हॉटेल्सनीसुद्धा या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. हॉटेल्सच्या मालकांनी हॉटेलच्याच बाहेर फ्रीज उभारला आहे आणि यात उरलेलं अन्न ठेवण्यात येतं. काहीवेळा तर ग्राहक स्वतः अन्न ठेवून जातात. अशा तऱ्हेनं या लहानशा कल्पनेचं रुपांतर आज चळवळीत झालं आहे.

मंडळी, उरलेलं अन्न अनेकदा फेकावं लागतं. पण आपल्याच आजूबाजूला अशी काही माणसं राहतात ज्यांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही. अशा माणसांच्या आत्मसन्मानाला धक्का न लावता त्यांना मदत करण्यासाठी या पब्लिक फ्रीजची कल्पना सर्वोत्तम आहे.

स्रोत

या संकल्पनेचं पुढचं पाऊल आहे कपडे व पुस्तकं दान करणे. नुकतंच पब्लिक फ्रीजच्या बाजूला एक कपाट लावण्यात आलेलं असून या कपाटात लोक घरातील वापरात नसलेले कपडे आणून ठेवू शकतात. गरजूंना अन्नासोबत कपडे व पुस्तकं दान देण्यासाठी या मोहिमेचा आता उपयोग होतोय.

मंडळी बंगळुरु पाठोपाठ भारतातल्या इतर मोठ्या शहरांमध्ये असे पब्लिक फ्रीज उभारले जावेत का ? तुम्हाला काय वाटतं ?

 

आणखी वाचा :

माणसातली माणुसकी दाखवत आहे माणुसकीची भिंत : नागपूर आणि कोल्हापूर

रोटी बॅंक : औरंगाबादचा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम

सबस्क्राईब करा

* indicates required