computer

मुंबईत आमरस थाळी मिळण्याची ही सहा ठिकाणे, कधीचा बेत आहे मग??

राव, फळांचा राजाने भक्तांना दर्शन द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही घेतलं की नाही दर्शन ? अहो आपला आंबा भौ. आंब्याच्या सिझन मध्ये किती आंबे खाऊ नी किती नाही असं होतं. महाराष्ट्रात आंबा किती प्रकारे खाल्ला जातो हे काही वेगळं सांगायला नको. यातलाच एक प्रकार आहे आमरस पुरी. आंब्याचा रस आणि त्या सोबत गरमागरम पुऱ्या म्हणजे स्वर्ग असतो, पण सगळ्यांनाच काही घरच्याघरी आमरस पुरी चाखायला मिळत नाही. मग अशा पब्लिकसाठी काय पर्याय आहे ? तर हाच पर्याय आम्ही आज सांगणार आहोत.

आम्ही आज घेऊन आलो आहोत मुंबईच्या ६ हॉटेल्सची नावे जिथे तुम्हाला अगदी घरच्या सारखी आमरस पुरी खायला मिळेल ? मग येताय ना आमरस पुरीच्या शोधात ?? चला मग...

१. पंचम पुरीवाला.

फोर्ट भागातील पंचम पुरीवाला या हॉटेल मध्ये प्रत्येक उन्हाळ्यात एक अख्खी थाळी आंब्याच्या नावावर केलेली असते. एका मोठ्या वाटीत आमरस पुऱ्या वाढल्या जातात. यात वेगळेपण असं की या पुऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे पनीर पुरी, मसाला पुरी, पालक पुरी, साधी पुरी. अशा पुऱ्यांची रेंजच इथे तयार असते. शेवटी नावात पुरीवाला आहे ना भाऊ.

किंमत : १५०

पत्ता : ८, १०, पेरीन नरीमन मार्ग, बोराबाजार प्रिसिंट, बालार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई.

२. गोल्डन स्टार थाळी.

नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की हे थाळीसाठी प्रसिद्ध असेल. दर उन्हाळ्यात गोल्डन स्टार थाळी हॉटेल मध्ये आमरस स्पेशल थाळी असते. यावर्षी ३० मार्च ते २३ जून पर्यंत ही थाळी असणार आहे. या काळात वेगवेगळ्या दिवसांसाठी वेगवेगळे पदार्थ वाढले जातील, मात्र आमरस हा ठरलेलाच असेल. सुट्टीच्या दिवशी वाटेल तितका आमरस मिळतो राव. याखेरीज तुम्ही हव्या तेवढ्या प्रमाणात आमरस विकत घेऊ शकता.

किंमत : ५०० (थाळी)

पत्ता : ३३०, राजा राम मोहन रॉय, चर्नी रोड स्टेशन.

३. सोअम

मंडळी, हे हॉटेल एक गुजराती हॉटेल आहे, पण तुम्हाला इथे हापूस आंब्याची उत्तम आमरस पुरी मिळेल. या हॉटेलची खासियत म्हणजे हे लोक फक्त हापूस पासून आमरस तयार करतात. गोडवा वाढवण्यासाठी साखरेचा वापर केला जात नाही. हा आमरस तुम्ही फुलके किंवा मग आपल्या पारंपारिक पद्धतीने पुरी सोबत खाऊ शकता.

किंमत : २५०.

पत्ता : सद्गुरू सदन, बाबुलनाथ मंदिराच्या समोर, गिरगाव चौपाटी.

४. आस्वाद

दादर भागाच्या जवळपास राहणाऱ्या पब्लिकसाठी ही जागा अगदी योग्य आहे. या ठिकाणी अगदी आपल्या मराठी पद्धतीने आमरस पुरी केली जाते. याखेरीज आस्वाद मध्ये मराठी पद्धतीचे आणखी पदार्थ पण आहेत.

किंमत : १७०

पत्ता ६१, मेजवानी, सदानंद, गोखले रोड, अमर हिंद मंडळाच्या समोर, दादर पश्चिम.

५. श्री ठाकर भोजनालय.

श्री ठाकर भोजनालयात गुजराती पद्धतीची थाळी मिळते. उन्हाळ्यात थाळी मध्ये आमरस हा ठरलेलाच असतो. एक खुशखबर सांगतो, विकेंडला हे लोक अनलिमिटेड आमरस वाढतात. पण जर तुम्ही कामाच्या दिवसांमध्ये गेलात तर एकच वाटी मिळते. आता या बातमीवर तुमचा बेत ठरवा.

किंमत : ६०० (थाळी)

पत्ता : ३१, दादीशेठ अग्यारी लेन, काळबादेवी रोड.

६. राजधानी

मंडळी, ही हॉटेलची एक चेन आहे. जवळजवळ सगळ्याच मॉल्स मध्ये राजधानी दिसेल. हे हॉटेल्स राजस्थानी पक्वनांसाठी प्रसिद्ध आहेत, पण आंब्याच्या मौसमात नेहमीच्या थाळीसोबत तुम्हाला आमरस पुरी पण चाखायला मिळेल. आमरस पुरी सोबत इथे मँगो हलवा, मँगो पुलाव पण मिळतो.

किंमत : ५०० (थाळी)

पत्ता : तिसरा मजला, आर सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम.

सबस्क्राईब करा

* indicates required