म्हणून या ब्रँडने २५६करोडोंचे कपडे, परफ्युम आणि इतर गोष्टी चक्क जाळल्या !!

मंडळी, दरवर्षी आपण लोक ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर कधी सेल लागतोय, किंवा मॉलमध्ये दरवर्षी मान्सून आणि विंटर सेल कधी लागतो याची वाट पाहातो आणि हवी तशी मनसोक्त खरेदी करतो. पण लग्झरी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रँड्समध्ये असे सेलबिल काही नसतात. उलट त्यांचं महागडं असणंच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांसाठी प्रतिष्ठेचं लक्षण असतं. उगीच रोल्स राईस घेतल्यावर फेस्टिव्हल डिस्काऊंट मागणं आणि तो नाही मिळाला तर 'किमान सीट कव्हर्स फ्री मध्ये द्या' असल्या मागण्या करणारी गिऱ्हाईकं काही लग्झरी ब्रँडसकडे जात नाहीत.

तर, आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत की त्या-त्या सीझनमध्ये माल खपला नाही, तर हे लग्झरी ब्रँड्स करतात काय ? 

स्रोत

तर ते चक्क हा माल-म्हणजेच कपडे, परफ्युम, चपला आणि इतर सगळ्या गोष्टी- चक्क जाळून टाकतात. यावर्षी बर्बरी या ब्रिटिश ब्रँडनं २५६ करोडोंचा माल जाळला आहे. हो, चक्क जाळलाय. तसा त्यांनी गेल्या पाच वर्षांत मिळून ८०६ करोडोंचा माल जाळलाय. हे एकटेच असे नाहीत बरं.. H&M या प्रसिद्ध इंटरनॅशनल ब्रँडनेही असा माल जाळल्याचं कबूल केलं आहे. रिचमाँट या कार्टिअर आणि माँटब्लँक हे दोन ब्रँड्स चालवणाऱ्या कंपनीनं गेल्या दोन वर्षांत न खपलेला  तब्बल ३६ अब्ज रूपयांचा माल व्यापाऱ्यांकडून पुन्हा विकत घेऊन नष्ट केल्याचं मान्य केलं आहे. बर्बरीच्या मते, गेल्या दोन वर्षांत तयार मालापैकी जवळजवळ ५०% माल खपला जात नाहीय. 

लग्झरी ब्रँड्स न खपलेला माल असा नष्ट का करत आहेत ?

स्रोत

एकतर असतात हे महागडे ब्रँड्स. सहसा अतिश्रीमंताकडूनच वापरले जातात. ते लोक आऊट ऑफ फॅशन गोष्टी विकत घेत नाहीत आणि अशा लोकांसाठी फॅशन्स सतत बदलत असतात. अशा वेळेस नवीन माल ठेवायला जागा तर लागतेच आणि यांची उत्पादनं विकत घेऊन पुढे विकणाऱ्या दुकानदारांना आपले गुंतवलेले पैसे अडकून राहायला नको असतात. मग माल खपत नाही म्हणून अशा दुकानदारांनी तो किमान काही पैसे सुटावे म्हणून स्वस्तात विकला, किंवा न खपलेला माल दान केला, फेकून दिला किंवा त्याचं काहीही केलं, तर त्या वस्तू कमी श्रीमंत अशा सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होऊ शकतात. मग अतिश्रीमंत लोकांची आणि सर्वसामान्य लोकांची फॅशन एकच होईल. हे अतिश्रीमंतांना आणि पर्यायानं त्यांच्या लग्झरी ब्रँड्सना कसं बरं चालेल? म्हणूनच ते न खपलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा किंवा कमी किंमतीत विकण्यापेक्षा, सरळ जाळून टाकतात किंवा पुन्हा कुणाला वापरता येणार नाही अशा प्रकारे नष्ट करतात. 

बर्बरीनं हे असं करणारे आम्ही एकटेच नाही आहोत, उलट आमच्यासारख्या ब्रँड्समध्ये असंच करायची पद्धत आहे असं स्पष्टीकरण दिलंय, तर पर्यावरणवाद्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. या श्रीमंत मिजासखोर पद्धतीबद्दल तुम्हांला काय वाटतं? कमेंटबॉक्समध्ये तुमची मतं लिहा..

सबस्क्राईब करा

* indicates required