computer

जेव्हा अमेरिकेने रशियाचा उपग्रह चोरला...वाचा उपग्रहाच्या अपहरणाची गोष्ट !!

तुम्ही एखाद्या व्यक्तीचे अपहरण, विमानाचे अपहरण अशा अनेक कथा वाचल्या असतील, पण उपग्रहाचे अपहरण कधी ऐकले आहे का ? आज अशीच एक कथा आम्ही तुम्हला सांगणार आहोत ज्यामध्ये अमेरिकन गुप्तहेरांनी चक्क एका रशियन उपग्रहाचे अपहरण केले होते.

उपग्रह हायजॅक करायचा म्हणजे शास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागते, पण या घटनेत अंतराळ शास्त्रज्ञ गुंतलेले नव्हते. कारण हा उपग्रह जमिनीवर असतानाच त्याचं काही तासांसाठी अपहरण करण्यात आलं होतं. 

त्याचं असं झालं, की शीतयुद्धादरम्यान साम्यवादी रशिया आणि भांडवलशाहीदार अमेरिका या दोन्हीमध्ये अनेक क्षेत्रात स्पर्धा होती. आपले श्रेष्ठत्व मिरवण्यासाठी अधूनमधून जाहिरातबाजी चालायची. अंतराळात पहिले पाऊल टाकले ते सोवियेत रशियानेच. अंतराळात पहिला उपग्रह सोडला तोही सोवियेत रशियानेच. साहजिकच हे श्रेष्ठत्व मिरवण्यासाठी १९६० च्या दरम्यान सोवियेत रशियाने ‘ल्युनिक’ (ल्युना) या उपग्रहाचं फिरतं प्रदर्शन अनेक देशांमध्ये आयोजित केलं होतं. CIA च्या गुप्तहेरांना साहजिकच ल्युनिकच्या जडणघडणीबद्दल उत्सुकता होती. प्रदर्शनासाठी आणलेले ल्युनिक हा एखादा शोपीस असेल किंवा प्रोटोटाईप असेल अशी या गुप्तहेरांची अटकळ होती. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर CIA च्या हस्तकांना असे लक्षात आले की सोवियेत रशियाने एक खराखुरा उपग्रहच प्रदर्शनात ठेवला आहे. खात्री करण्यासाठी CIA चे गुप्तहेर चक्क ल्युनिकच्या आत मध्ये घुसले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला अंदाज बरोबर होता. इंजिन आणि काही इलेक्ट्रिकल भाग वगळता हा खराखुरा उपग्रहच आहे. 

त्यानंतर CIA चेच काही फोटोग्राफर आत घुसले आणि त्यांनी ल्युनिकचं संपूर्ण अंतरंग कॅमेऱ्यात टिपलं. इतक्या कामांनी संतुष्ट होईल ती CIA कुठली. फोटो मिळून पण समाधान झालं नाही म्हणून त्यांनी उपग्रहच उघडण्याची योजना आखली. पण तोपर्यंत ‘त्या’ देशातील प्रदर्शनाची मुदत संपली आता तो देश कोणता हे मात्र आजतागायत गुलदस्त्यातच आहे. त्याचे कारण असे की या कारनाम्याचे सर्व कागदपत्र काही वर्षानंतर जेव्हा डी-क्लासिफाय झाले त्यामध्ये बरीचशी महत्वाची माहिती गळून टाकण्यात आली.पण national security archive watch dog group या सेवाभावी संस्थेने बरीचशी माहिती १९६७ साली. Studies in intelligence या लेखात दिली आहे.

यानंतर दुसऱ्या प्रदर्शनस्थळी इतका सुरक्षा बंदोबस्त होता की CIA काहीच करू शकली नाही. सोवियेत रशियाची सुरक्षा व्यवस्था पण यानंतर थोडी शिथिल आणि गाफील झाली. पुढच्या प्रदर्शनासाठी ल्युनिक रेल्वेमार्गाने दुसऱ्या शहरात पाठवण्यात येणार असल्याची बातमी CIA ला मिळाली. सुरुवातीला ज्या वॅगन मध्ये उपग्रह पाठवण्यात येणार होता ती वॅगन फोडून आपला कार्यभाग साधायची CIA ची कल्पना होती. धावत्या गाडीमध्ये हे करणे कठीणच होते आणि पुरेसा वेळ देखील मिळाला नसता. यासाठी प्रदर्शनाच्या स्थळापासून रेल्वे यार्ड पर्यंत जे अंतर होतं त्यादरम्यान काही तासांसाठी त्या ट्रकचे अपहरण करून ल्युनिकची इथंभूत रचना समजून घेण्याचा इरादा CIA ने पक्का केला. त्याप्रमाणे प्रदर्शनातून लाकडी क्रेट मध्ये बंदिस्त ल्युनिक बाहेर पडला तेव्हा प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी ५.३० वाजता ड्राईव्हसकट ट्रकचं अपहरण करण्यात आले.

ड्राईव्हरला ताब्यात घेतल्यावर त्याची बाई-बाटलीसकट चोख व्यवस्था एका हॉटेलात करण्यात आली. अशा प्रकारे ड्राईव्हरला नजरबंद केल्यावर ट्रकच्या लाकडी क्रेटवर कॅनव्हासचे मोठे आच्छादन टाकून CIA चे टेक्निकल एक्सपर्ट्स आत घुसले. संध्याकाळी ५.३० पासून पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० पर्यंत ल्युनिकचा प्रत्येक कप्पा तपासण्यात आला. फोटो काढण्यात आले. त्यानंतर कप्प्यांची जशी होती तशी जुळणी करण्यात आली. यादरम्यान रेल्वे यार्ड मध्ये रशियन अधिकारी ट्रकची वाट बघून कंटाळले. बऱ्याच उशिरापर्यंत ट्रक न आल्यामुळे ते कंटाळून हॉटेलवर जाऊन झोपी गेले. त्यांना कुठलाही संशय आला नाही हे CIA च्या पथ्यावरच पडले. इकडे सकाळी ५.३० वाजता ट्रक पुन्हा एकदा ड्राईव्हरच्या ताब्यात देण्यात आला आणि सकाळी ७ वाजता ट्रक रेल्वे यार्ड मध्ये पोहोचला तेव्हा रशियन अधिकारी वाट बघतच होते. झाल्या प्रकारची किंचितही कल्पना नसल्याने ल्युनिक पुढच्या प्रदर्शनस्थळी रवाना झाले.

हा सगळा खटाटोप करून अमेरिकेला काही फायदा झाला असावा का ? तर त्याचं उत्तर असं आहे की झाला नसावा. कारण क्रमांक १ असे की, ल्युनिकचे तंत्रज्ञान तसे जुनेच झाले होते. अमेरिकेला इतके जरूर कळले की त्यांची भविष्यात सुरु होणारी अपोलो मोहीम ल्युनिकपेक्षा जास्त पुढारलेली होती. 

हा किस्सा सांगण्याचा उद्येश इतकाच आहे की प्रतिस्पर्धी देशावर हेरगिरी करण्यासाठी CIA कोणत्याही स्थरावर जाऊ शकते. 

सबस्क्राईब करा

* indicates required