बच्चे कंपनी चला स्वयंपाकघरात 'धुडगूस' घालायला !!

आताच्या काळात बाहेर इतक्या गोष्टी तयार मिळतात की घरात स्वयंपाक म्हणजे अनेकदा केवळ वस्तू योग्य प्रमाणात मिसळून शिजवणे इतकाच उरला आहे.  शिवाय रोजच्या गडबडीत त्याहून अधिक करणे शक्यही नसते. त्यात मुलांना स्वयंपाक शिकवणे तर दूरच राहिले. मुलांचे अभ्यास, ग्राउंड वगैरेच्या गडबडीत रोजचा स्वयंपाक रांधतानाही मुलं भोवती नसतात. मुलं नेहमीच्या कार्यक्रमात इतकी गुंतली आहेत की त्यांना स्वयंपाक शिकवण्यासाठी म्हणून खास वेळ देणं शक्य होतं नाही.

यासाठी पुण्यातील काही पालकांनी मिळून या सुट्टीत आपल्या मुलांना स्वयंपाक शिकवायचा ठरवलं. पण मग विचार आला आपल्याच का? ज्यांना शिकावंस वाटतंय त्या सगळ्याच मुला-मुलींना शिकवूया स्वयंपाक - एक शिबीरच भरवूयात. त्या शिबीरातून जे पैसे उभे राहतील ते मराठी शाळेला देणगी म्हणून देऊयात असंही त्या पालकांनी ठरवलं आणि त्यातून उभं राहिलं एक अनोखं शिबीर 'स्वयंपाकघरातील धुडगूस'! 

इथे नुसता पदार्थ बनवला जाणार नाहीये तर वेगवेगळ्या अंगाने स्वयंपाकशास्त्राची ओळख करून दिली जाणार आहे. कोणताही पदार्थ बनवताना साहित्य आणि कृती अशी नेहमीच्या पद्धतीने दिलेल्या बेतशुद्ध रेसिपी पुस्तकात सोप्या वाटतात पण प्रत्यक्षात त्यात खूप ठिकाणी अडतं. याचं कारण अनेक बाबी नक्की करायच्या कशा, कशासाठी, त्याचा क्रम बदलला तर काही फरक पडेल की पडणार नाही, पूर्वतयारी नसणे/कमी पडणे इत्यादी गोष्टींबद्दल मुलांना (कित्येकदा मोठ्यांनाही) काहीही माहिती नसते. या शिबिरात मुलं अगदी प्राथमिक माहितीपासून शास्त्रीय माहितीपर्यंत अनेक बाबी शिकणार आहेत. 

उदा. घ्यायचं तर साधी फोडणी म्हटली तर तिचे कितीतरी प्रकार, तेव्हा होणारी रासायनिक प्रक्रिया, त्यातील घटक, कधी कोणते घटक वापरावे/टाळावे, फोडणीचे आशियाई वैशिष्ट्य, भाषिक स्थान वगैरे अनेक प्रकारची माहिती मुलांना दिली जाईल. बहुतांश पदार्थांमध्ये शेतीपासून ताटापर्यंत अनेक टप्प्यांची ओळख, पूर्वतयारी,  ओट्यावरची व्यवस्था, खाण्याशी संबंधित म्हणी, शाब्दिक खेळ, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील हवामान आणि पिकांचा तेथील अन्नावरचा परिमाण, काही अन्नघटकांचे शरीरावर होणारे परिमाण/फायदे/तोटे अश्या चतुरस्र माहितीसोबत जात्यावरच्या ओव्या, कविता, विषयानुरूप धमाल कथा अशा सगळ्या प्रकारच्या अनुभवांनी भरलेलं हे शिबिर असणार आहे.

स्रोत

वर दिलेल्या वेगवेगळ्या माहितीसह मुलं या शिबिरात रोजचं शाकाहारी जेवण आणि काही नाश्त्याच्या पदार्थांशी दोन हात तर करतीलच, त्याच सोबत विरजण लावण्यापासून, काकड्या चोचवण्यापर्यंत आणि कणीक मळण्यापासून कुकर लावण्यापर्यंत अनेक बाबी शिकून स्वयंपूर्ण होतील . 

स्वयंपाक मधील 'स्वयं' खूप महत्त्वाचा आहे. आताच्या युगात मुलांना कधी ना कधी आपापली घरटी सोडून दूर जावं लागेल हे स्पष्ट आहे. तेव्हा त्यासाठी त्यांचं पुढे अडू नये किंवा सतत 'बाहेरचं' निरस जेवण करण्यापेक्षा त्यांना 'स्वयं'पाक करता यावा यासाठी त्यांना आजच तयार करूयात.

या पालकांच्या गटाने पाहिलं शिबिर २८-२९ एप्रिल रोजी ठरवलं आहे. पुढिल तारखा लवकरच घोषित होतील. हे पहिक्लं शिबीर जुन्या कर्नाटक शाळेजवळ (प्रभात रोड जवळ) हे भरेल. प्रत्येकाला स्वयंपाककृती करता यावी हे ध्यानात घेता मुलांची संख्या मर्यादित ठेवली आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली जागा नक्की करा. अधिक माहितीसाठी या फेसबुक पेजला भेट द्या (तिथे पुढील चौकशीसाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध आहेत). तुमचा किमान १०-१२ मुलांचा गट असेल तर तुमच्या सोयीने अन्य तारखांना हे शिबीर भरवता येईल. त्यासाठीही तुम्ही संपर्क साधू शकता. 

स्रोत

चला या सुट्टीत बघा मुलांचा "स्वयंपाकघरातील धुडगूस!"

सबस्क्राईब करा

* indicates required