म्हणून जपानमधले ज्येष्ठ नागरिक गुन्हे करत आहेत? त्यांना तुरुंगाची इतकी आस का लागली आहे?

जपानमध्ये राहणारी बरीचशी जपान शिनियर शिटिझन आहे. बरीचशी म्हणजे किती? तर अगदी पूर्ण लोकसंख्येच्या जवळजवळ २५%. आपल्याकडचे वृद्ध लोक घरी नातवंडाना सांभाळतात, कुठं तीर्थयात्रेला फिरतात, अगदीच काही नाही तर एसटी आणि ट्रेनमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करत कुठे ना कुठे जाऊन येतात. मंग हे जपानी म्हातारे लोक जेलमंदी का जाऊन राह्यले भौ? वाचा तर मग..

तर, ब्लूमबर्ग नावाच्या एका संस्थेनं एक सर्व्हे केला, काही मुलाखतीही घेतल्या. त्यात आढळून आलं की जपानमधले वृद्ध लोक त्यांना तुरुंगात घातलं जावं म्हणून लहानसहान गुन्हे करत होते. अशा गुन्ह्यांचं प्रमाण अलिकडच्या वीसेक वर्षांत दुप्पट झालंय. तुरुंगातही पाह्यलं तर दर पाच कैद्यांतला एकजण वयाची साठी पार केलेला असतोच. वृद्ध स्त्रियांत तर दहातल्या नऊजणी एखाद्या दुकानात हात मारताना पकडल्या गेल्या आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलंय.   या वृध्दांना या वयात असं करण्याची गरज का पडते हे त्यांनी मुलाखती घेऊन  शोधून काढलं आणि ते कारण खूपच हृदयद्रावक होतं. 

का करत आहेत हे वृद्ध लोक गुन्हे?

पाश्चात्त्य देशांत बरेच लोक एकेकटे राहतात. वृद्धत्वात मात्र हे एकटं राहाणं समस्या होऊन बसलीय. त्यांची काळजी घ्यायला कोणी नसतं. त्यांचे कुटुंबिय दुरावलेले असतात किंवा आयुष्याच्या या वळणावर येईपर्यंत कधीकधी त्यांची कुटुंबंच नाहीशी झालेली असतात. दिवसेंदिवस त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यात म्हातारपणासोबत अनेक व्याधी जडलेल्या असतात, त्यांच्या औषधपाण्यासाठी पैसे लागतात. हे सगळं कुणाच्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक आधाराशिवाय होणं शक्य नसतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टप्रमाणे ४०% लोकांशी बोलायला कुणी लोकच नव्हते. त्यामुळं या साऱ्यांसाठी तुरुंगातलं आयुष्य हाच एक आशेचा किरण होता. 

जपानमध्ये एका सामान्य कैद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी साधारण २०,००० डॉलर्स इतका खर्च येतो. पण वृद्ध लोकांना औषधपाणी, हॉस्पीटल असा सगळा लवाजमा लागत असल्यानं हा खर्च २०,०००डॉलर्सच्या खूप पलिकडे जातो. वेळ कधी कशी सांगून येईल हे आधीच सांगता येत नाही. त्यामुळं तुरुंगातले कर्मचारी बरेचदा या कैद्यांची काळजी घेताना, आणि त्यांची इतर कामं करताना दिसतात. इवाकुणी इथल्या स्त्रियांच्या तुरुंगाच्या वॉर्डन युमी मुरानाका म्हणतात, " त्यांना घर आणि कुटुंब मिळू शकतं, पण तुरुंग म्हणजे त्यांचं घर होऊ शकत नाही". पण ही झाली तुरुंगवाल्यांची बाजू. या तुरुंगात जाणाऱ्या जनतेला नक्की काय वाटतं?

एका बाईच्या मते तुरुंगात आजूबाजूला लोक असतात, तिला तिथं एकटं, एकाकी वाटत नाही. त्यामुळं तिला तुरुंगात राहायला आवडतं. ही बाई जेव्हा दुसऱ्यांदा तुरुंगातून सुटून बाहेर गेली, तेव्हा तिनं आपण इथं परत यायचं नाही असा निश्चयही केला होता. पण तिला तुरुंगाची इतकी आठवण येऊ लागली की ती काहीतरी गुन्हा करुन तिथं परत आली. 

अर्थात हे फक्त जपानमध्येच होतं असं काही नाही हं. अमेरिकेतही कडक हिवाळा पडायच्या सुमारास किंवा आजारी पडल्यास लोक स्वत:ला अटक करवून घेतात. पण जपानमध्ये हे वृद्धांचं अटक करवून घेणं इतकं वाढलंय की अधिकारीवर्ग त्यामुळं चिंतेत पडलाय. सध्या जपान सरकार त्यांच्या आरोग्यविषयक सेवा आणि समाजसेवेचे कार्यक्रम सुधारुन तुरुंगातला वृद्धांचा टक्का कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीही जपानमध्ये तुरुंगात जाऊ इच्छिणाऱ्यांचा ओघ काही संपत नाहीय. 

तिथल्या एका समाजसेवकाचं म्हणणं आहे, "आतलं आयुष्य काही साधं सरळ नाही, पण काही लोकांसाठी बाहेरचं आयुष्य जास्त खडतर आहे". खरंय ना? 

सबस्क्राईब करा

* indicates required