computer

६ फुट उंच आणि ९० किलो वजनाचा जगातला सर्वात धोकादायक पक्षी - कॅसोवरी !!

कुत्रे, मांजर, पक्षी, मासे तर सगळेच पाळतात, पण काहींना हटके काही तरी करायचं असतं. मग ते सरळ वाघच घेऊन येतात. आता कोणताही प्राणी असो तो पाळीव नसेल तर तो आपल्या मालकावरच उलटू शकतो. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे.

फ्लोरिडा येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या मर्विन होजोस यांच्यावर कॅसोवारी या पक्षाने हल्ला केला होता. असं म्हणतात की त्यांनी त्याला 'पेट' म्हणून सांभाळलं होतं.  पण कॅसोवारी पक्षी हे काही  पाळीव नसतात.  त्याने मर्विन यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

राव, या आजोबांनी ज्या पक्षाला पाळीव पक्षी म्हणून सांभाळलं तो 'जगातील सर्वात धोकादायक पक्षी' म्हणून कुप्रसिद्ध आहे. चला तर यानिमित्ताने तुमची आणि कॅसोवरीची ओळख करून देतो. थोडं लांबच राहा पण.

मंडळी, तुम्हाला एमू, शहामृग माहित असेलच. या दोन्ही पक्षांच्या कुळातला आणखी एक पक्षी आहे तो म्हणजे कॅसोवरी. आपल्या भाईबंदाप्रमाणेच तोही दांडगा असतो. त्याची उंची ६ फुट असते. वजन जवळजवळ ९० किलोपर्यंत असू शकतं. त्याच्या शरीरावर काळी दाट पिसे असतात, तर मानेखाली गडद निळा व लाल रंग असतो. शहामृग, एमू मध्ये न आढळणारा डोक्यावर तुरा देखील असतो.

कॅसोवारी शाकाहारी पक्षी आहे. तो माणसांपासून तसा जपूनच असतो, पण जर त्याला डिवचलं तर तो हल्लाही करू शकतो. त्याचे पंजे त्याचं हत्यार असतात राव. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याची नखं एक प्रकारे “रामपुरी” सारखी काम करतात. एका लाथेने माणसाला दिवसा तारे दिसू शकतात. कॅसोवारीच्या हल्ल्याने मृत्यू किंवा गंभीर दुखापत पण होऊ शकते. जसं या आजोबांसोबत घडलं आहे.

कॅसोवारी न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया भागात आढळतो. अमेरिकेत हा पक्षी वन्यप्राण्यांच्या वर्गीकरणात Class II प्रकारात येतो. म्हणजे हा पक्षी जर पाळायचा झाला तर त्यासाठी विशेष लायसन्स लागतं.

ज्या प्राणीसंग्रहालयात कॅसोवारी ठेवला जातो तिथे अत्यंत लक्षपूर्वक काळजी घेतली जाते. प्राणीसंग्रहालयाला भेट देणारी माणसं आणि त्याच्यात अंतर ठेवलं जातं. हे तर काहीच नाही, प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी पण जपूनच असतात.

मंडळी, असा हा कॅसोवरी. या खतरनाक पक्षाबद्दल तुम्हाला माहित होतं का ?? सांगा बरं !!

 

आणखी वाचा :

जेव्हा पक्षी गनिमी कावा वापरून माणसांशी युद्ध जिंकतात...वाचा हा अतरंगी इतिहास !!

सबस्क्राईब करा

* indicates required