तो ३० दिवस फक्त नारळाचं पाणी पिऊन जगला आणि शेवटी.....वाचा पुढे काय झालं !!

आपण बऱ्याचदा विचार करतो की सगळी कामं सोडवीत आणि जिथे पाय नेतील तिकडे निघून जावं. पण हे फक्त स्वप्नरंजन असतं ना भाऊ. प्रत्यक्षात हे शक्य नसतं. पण काही माणसं असतात जे हे प्रत्यक्षात करून दाखवतात. अशाच माणसांमध्ये सध्या चर्चेत आहेत अनुज आणि इशांत. यांनी खिशात एक रुपयाही न घेता चक्क भारत भ्रमण करून दाखवलं होतं. आता त्यांचं भारत भ्रमण पूर्ण झालेलं आहे पण सध्या ते एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत.

दोघांनी २ वर्षांपूर्वी झिरो बजेटवर भारत भ्रमण केलं. त्या प्रवासानंतर काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी एक नवीन चॅलेंज घ्यायचं ठरवलं. या चॅलेंज मध्ये दोघांना ३० दिवस 'ओडीसा' भ्रमंती करायची होती. पण या प्रवासात फक्त नारळाचं पाणी प्यायचं. असा नियम होता. फक्त नारळाचं पाणी बरं का, त्यातील मलाई सुद्धा खायची नाही खायची.

दोघांनी या चॅलेंजला सुरुवात केली. काहीच दिवसात इशांतला नारळाच्या पाण्यावर जगणं कठीण गेलं आणि त्याने माघार घेतली. पण अनुज ने हे चॅलेंज पूर्ण करून दाखवलं. ३० दिवसांमध्ये त्याचं चॅलेंज पूर्ण तर झालं पण त्याच बरोबर त्याचं तब्बल १४ किलो वजन कमी झालं होतं.

आता आपल्याला प्रश्न पडेल की तो ३० दिवस नारळ पाणी खाऊन जगला कसा ?

त्याचं काय आहे ना, दोघांनी वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या उचापती केल्या. अनोळखी माणसांशी गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर खेळणे, मार्गात येईल त्या शाळेत जाऊन आपल्या प्रवासाबद्दल सांगणे. अशा प्रकारे त्यांनी ३० दिवस पूर्ण केले.

हा सर्व प्रवास त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दोघांच्या या अनोख्या चॅलेंजला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. काही लोक अर्थात त्यांना वेड्यात काढत आहेत. पण काहींनी त्यांचं कौतुक सुद्धा केलंय.

दोघांच्या भारत भ्रमंतीची थोडी ओळख करून घेऊ :

अनुज अलिगढचा आहे तर इशान हसनपूरचा. दोघांनाही प्रवासाची प्रचंड आवड आहे. आपल्या प्रवासाच्या वेडापाई त्यांनी भारत भ्रमण करायचं ठरवलं. प्रवास म्हटलं की नवीन जागा, नवीन माणसं भेटणार या विचाराने दोघे भारावलेले होते. जेव्हा त्यांनी आपल्या या प्लॅन बद्दल घरात सांगितलं तेव्हा घरच्यांनी विरोध केला. घरच्यांशी त्यांचे संबंध बिघडले. पण त्यांनी या सगळ्यातून मार्ग काढला आणि आपला प्रवास सुरु केला.

तब्बल १८ तास उपाशी राहण्यापासून ते एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अंघोळी शिवाय राहणे, हॉटेल मधलं उरलेलं अन्न खाणे तसेच रस्त्याच्या बाजूला झोपण्या पर्यंत त्यांनी सगळं केलं. प्रवास करत असताना त्यांना अनेक माणसं भेटली. काही चांगली तर काही वाईट. दोघे म्हणतात त्या प्रमाणे त्यांना स्वतःचा शोध घ्यायचा होता.

काहींना ही गोष्ट निरर्थक वाटेल पण या दोघांसाठी अनोळखी ठिकाणांवर जाऊन नवीन माणसांना भेटणे हेच महत्वाचं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required