computer

फ्रान्सच्या 'नोत्र देम'ला लागलेल्या आगीमुळे जग का हळहळत आहे ? वाचा नोत्र देमचा इतिहास !!

काल सगळीकडे फ्रान्सच्या ‘नोत्र देम’ला लागलेल्या आगीची चर्चा होती. जगभरातल्या मोठमोठ्या व्यक्तींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. हे बघून नक्कीच प्रश्न पडतो की ‘नोत्र देम’ मध्ये एवढं महत्वाचं काय आहे. हेच आम्ही आज आपल्या मायबोली मराठीत समजावून सांगणार आहोत.

चला तर जाणून घेऊया नोत्र देमबद्दल.

मंडळी, आपल्याकडच्या ऐतिहासिक जुन्या वास्तूला जर आग लागली तर आपल्याला ज्या वेदना होतील त्याच वेदना काल फ्रेंच लोकांना झाल्या. नोत्र देम हे फ्रान्सचं जवळजवळ ८५० वर्ष जुनं चर्च आहे. नोत्र देमचा अर्थ होतो “Our Lady”. व्हर्जिन मेरीला हे चर्च समर्पित आहे. पॅरीसचं सौंदर्य बघायला गेलेली प्रत्येक व्यक्ती या भव्य चर्चला भेट देतेच. दरवर्षी १.३ कोटी लोक नोत्र देमला भेट देतात.

नोत्र देम फार जुनं चर्च आहे आणि धार्मिक ठिकाण आहे म्हणून लोकांना वाईट वाटत आहे का ? तर नाही !! नोत्र देम म्हणजे एक इतिहास आहे. गॉथिक पद्धतीने बांधलेलं  जगातील सर्वोत्कृष्ट चर्च म्हणून आज त्याची गणना केली जाते. अनेक वर्षापासून वास्तुविशारदांना, इतिहासकारांना भुरळ घालणारं हे चर्च आहे.

नोत्र देमच्या इतिहासावर एक नजर टाकू.

११६३ साली Ile de la Cite या बेटावर नोत्र देम बांधायला सुरुवात झाली. तेव्हा फ्रान्सवर लुईस सातवा या राजाचं राज्य होतं. त्याच्या राज्यात काम सुरु झालं असलं तरी त्याच्या नजरेसमोर काम पूर्ण झालं नाही. नोत्र देम बांधून पूर्ण व्हायला तब्बल २०० वर्ष लागली. बांधकाम लवकरही पूर्ण झालं असतं पण तेवढ्यात आगीने चर्चला उध्वस्त केलं. पुढे १३४५ साली हे बांधकाम पूर्ण झालं.

पुढील अनेक वर्षांच्या काळात नेहमीच नोत्र देमचा कोणता ना कोणता तरी भाग उध्वस्त होतच राहिला. जसं की १५४८ साली झालेल्या दंगलीत नोत्र देमच्या मुर्त्या उध्वस्त झाल्या. ऐतिहासिक फ्रेन्च राज्यक्रांतीच्या काळात (१७८९) तर चर्चचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

१८०४ साली फ्रान्सचा सम्राट झालेल्या नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक याच नोत्र देम मध्ये करण्यात आला होतं. एवढंच काय त्याचं लग्नही इथेच उरकलं होतं. नेपोलियनची सत्ता जेमतेम १० वर्ष टिकली. नोत्र देम त्यानंतरही वापरात होते, पण चर्चच्या एका भागाची अवस्था वाईट होती आणि त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते.

१८३१ साली विक्टर ह्युगो या एका थोर कवी, लेखाने नोत्र देमवर आधारित “The Hunchback of Notre Dame,” हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात नोत्र देमच्या दयनीय अवस्थेचं वर्णन होतं. या पुस्तकाने पुन्हा एकदा जगाचं लक्ष नोत्र देमकडे ओढलं गेलं. नुकत्याच लागलेल्या आगीमुळे या पुस्तकाचा खप पुन्हा एकदा प्रचंड वाढला आहे.

१८४४ साली लुईस फिलीप राजाने नोत्र देम पुन्हा एकदा बंघायचा हुकुम सोडला. ३१ वर्षांच्या दोन वास्तुविशारादांवर हे काम सोपवण्यात आलं. त्यांचं नाव होतं  Jean-Baptiste-Antoine Lassus आणि  Eugène Viollet-le-Duc.

दोघांनी मिळून चर्चला मुळापासून नवीन रूप दिलं. चर्चच्या भिंतीवर असलेली चित्र नव्याने रंगवण्यात आली. जो भाग कायमचा नष्ट झाला होता तिथे नव्याने कलाकृती तयार केल्या गेल्या. मुर्त्या नव्याने उभारण्यात आल्या. अशा प्रकारे शतकांची मरगळ झटकून नोत्र देम पुन्हा एकदा उभे राहिले.

सध्याची परिस्थिती.

नोत्र देमला डागडुजीची आवश्यकता आहे असं न्युयोर्क टाईम्सने २०१७ साली सुचवलं होतं. यावर्षी ते काम सुरु झालं होतं. १५ एप्रिल रोजी अचानक आग लागल्यानंतर पुढील काही तास आग भडकलेली होती. आग कशी लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. आगीत चर्चच्या छताचा भाग आणि घुमट जळाला आहेत. नोत्र देमचा प्रसिद्ध मनोराही आगीत भस्मसात झाला आहे. मुख्य इमारतीला आगीपासून वाचवण्यात यश आलं आहे.

 

तर मंडळी, कसा वाटला हा इतिहास. तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required