जाणून घ्या नक्की कसं चालतं ATM !!

मंडळी, देशात सध्या ATM चा मुद्दा गाजतोय. चलन तुटवडा निर्माण झाल्याने ATM मशीन मध्ये खडखडाट निर्माण झालाय. त्याची वेगवेगळी करणे दिली जात आहेत. आपण आज त्या कारणांबद्दल न बोलता ATM बद्दल बोलूया.

आपण बऱ्याचदा ATM मधून पैसे काढतो. आपल्याला हवी असलेली रक्कम डायल करून झाली की मशीन मध्ये काही तरी हालचाल होते आणि मशीन आपल्या खात्यातून तेवढे पैसे वजा करून ती रक्कम आपल्याला देते. हे सर्व घडतं तरी कसं ? म्हणजे बघा हा, आपण कार्ड रीडर मध्ये आपलं डेबिट कार्ड टाकतो, आपलं पिन डायल करतो आणि बँकेत जाऊन जे काम होणार असतं ते ही मशीन एका झटक्यात करून देते. ATM मशीन हे सर्व काम करते तरी कशी ? तुम्हाला माहित आहे का ? नाही ?

चला आम्हीच सांगतो तुम्हाला....आज जाणून घेऊया ATM मशीन काम कसं करते ते !!

स्रोत

‘ऑटोमेटेड टेलर मशीन’ म्हणजेच ATM. ATM मशीन ही ‘ऑटोमॅटीक बँकिंग मशीन’ आहे. ATM मशीन्स दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे जी तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढून देण्याचं काम करते आणि दुसरी म्हणजे जी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याचं काम करते.

मंडळी, आज आपण पहिल्या प्रकारातील ATM मशीन बद्दल जाणून घेणार आहोत. या प्रकारातील ATM मशीनला आपण एक प्रकारे डाटा टर्मिनल म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ATM मशीन चं काम म्हणजे तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमची मागणी पूर्ण करणे. ATM ला बँकेच्या ‘सर्व्हर’शी जोडण्यासाठी होस्ट प्रोसेसरची मदत घेतली जाते. हे काम इंटरनेटच्या माध्यमातून होतं.

स्रोत

ATM मशीन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणजे डेबिट कार्ड. डेबिट कार्डच्या मागच्या बाजूला Magnetic strip असते. या Magnetic strip मध्ये तुमचा पिन नंबर आणि बँक खात्याशी निगडीत जरुरी माहिती भरलेली असते. आपण जेव्हा कार्ड रीडर मध्ये डेबिट कार्ड ‘इन्सर्ट’ करतो त्यावेळी आपली माहिती होस्ट प्रोसेसर जवळ पोहचते. होस्ट प्रोसेसर ती माहिती बँकेशी संपर्क साधून तपासून बघतो. ती माहिती जर बरोबर असेल तर ATM मशीन पुढील प्रक्रिया करण्याची परवानगी देतं.

यानंतरचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा ATM मधून पैसे काढता तेव्हा ATM मशीन काम कसं करतं ?

स्रोत

ATM मशीन आणि बँकेच्या सर्व्हर मध्ये वर सांगितल्याप्रमाणे संपर्क होत असतो. जेव्हा तुम्ही ATM मशिनकडे पैश्यांची मागणी करता तेव्हा तुमची विनंती होस्ट प्रोसेसरद्वारे तुमच्या बँकेच्या सर्व्हरला पाठवली जाते. त्यानंतर तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची तपासणी होते. त्याप्रमाणे तेवढी रक्कम दिली जाऊ शकते का हेही तपासलं जातं. जर तुम्ही मागितलेल्या रकमे एवढी रक्कम तुमच्या खात्यात असेल व हे सर्व इतर नियमांमध्ये बसत असेल तर तशी माहिती बँकेच्या सर्व्हरद्वारे होस्ट प्रोसेसरकडे पाठवली जाते. होस्ट प्रोसेसर ATM मशीनला एक विशिष्ट कोड पाठवतो. एकंदरीत होस्ट प्रोसेसर ATM मशीनला पैसे देण्याबाबत परवानगीदेतो. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचे पैसे मिळतात. बँक सर्व्हर आणि होस्ट प्रोसेसर मध्ये होणाऱ्या या देवाणघेवाणीला Electronic Fund Transfer म्हटलं जातं.

स्रोत

मंडळी, ATM मधून पैसे काढण्यासाठी काही मिनिट लागतात पण त्यापाठी एवढी मोठी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सुद्धा काही सेकंदात होत असते... आहे की नाही कमाल ?  

 

आणखी वाचा :

ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

सबस्क्राईब करा

* indicates required