computer

हाशिमपुरा हत्याकांड : कशाप्रकारे एका धाडसी पत्रकारामुळे ४२ जणांच्या खुनाचा छडा लागला ?

नाझी राजवटीत ज्यूंना मारण्यासाठी त्यांना त्यांच्या गावातून उचलून एका खड्ड्याजवळ आणलं जायचं तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जायच्या. मग त्याच खड्ड्यात त्यांना पुरलं जायचं. अशा प्रकारच्या खुनाची आठवण करून देणारं भारतातलं ‘हाशिमपुरा हत्याकांड’ होतं.

१९८७ साली बाबरी मशिदीच्या प्रकरणावरून उत्तर प्रदेश भागात जातीय दंगल उसळली होती. १४ एप्रिल पासून मेरठच्या भागात घरांची व दुकानांची जाळपोळ, हत्या, लुटमारीला नुसता उत आला होता. मे पर्यंत शहरात अनेकदा संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीनेही फरक पडला नाही म्हणून सैन्याला बोलावण्यात आलं. १९ आणि २० मे रोजी पोलीस, PAC (Provincial Armed Constabulary) चे जवान आणि सैन्याने मिळून शोध मोहीम आरंभली. शोध मोहिमेत स्फोटकं आणि हत्यारं सापडली.

हाशिमपुरा मोहल्ल्यातील गल्ल्यांमध्ये अशाच प्रकारची शोध मोहीम सुरु होती पण इथलं स्वरूप काहीसं वेगळं होतं. जवानांनी तरुण, म्हातारे, प्रौढ अश्या ४५ मुसलमान व्यक्तींना घरातून उचलून PAC च्या ट्रक मध्ये कोंबण्यास सुरुवात केली होती. नक्की काय प्रकार चालू आहे याचा कोणालाच पत्ता लागत नव्हता.

या सगळ्यांना नंतर दिल्ली रोडवरील मुरादनगर ‘गंग’ कालव्यावर नेण्यात आलं. सगळ्यांना ट्रक मधून बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या. नंतर मृतदेहांना गंग कालव्यातच फेकून देण्यात आलं. काही जणांना ट्रक मध्येच गोळ्या घालून गाझियाबाद जवळच्या हिंडन नदीत फेकून देण्यात आलं. ४५ मधले ३ जण सुदैवाने वाचले.

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात केस उभी राहिली, पण कोर्टाला वाचलेल्या ३ जणांची साक्ष पुरेशी वाटली नाही म्हणून त्यांनी PAC च्या १६ जवानांना पुराव्याअभावी सोडून दिलं. यावेळी मदतीस धावून आले पत्रकार प्रवीण जैन.

प्रवीण जैन

हे सगळं घडत असताना संडे मेलचे पत्रकार प्रवीण जैन हे हाशिमपुरा भागात प्रत्यक्ष होते. एका सीमेपलीकडे पत्रकार आणि फोटोग्राफर्सना येऊ दिलं जात नव्हतं. पण प्रवीण जैन यांनी अशा परिस्थितीतही कॅमेरा लपवून हाशिमपुरा मोहल्ल्यात प्रवेश केला. शोध मोहिमेत गुंतलेले पोलीस/सैन्य, घाबरलेल्या स्त्रिया, लहान मुलं असं चित्र तिथे होतं. महत्वाचं म्हणजे सैनिक मुस्लीम व्यक्तींना गटागटाने पकडून नेत होते. काही व्यक्तींना सैन्याचा चोपही मिळत होता. हे सगळं प्रवीण जैन यांच्या कॅमेऱ्याने टिपलं.  

केस उभी राहिल्यानंतर प्रवीण जैन यांनी स्वतःहून आपल्याकडचे फोटोग्राफ्स कोर्टात सादर केले. पण या फोटोग्राफ्सनेही गुन्हा सिद्ध झाला नाही. जज साहेबांनी प्रतिपक्षाच्या दाव्यावरून फोटोचे निगेटिव्हज मागवले. प्रवीण जैन यांनी हजारो निगेटिव्हज मधून हाशिमपुराचे निगेटिव्हज शोधून काढले. यानंतर मात्र कोणतीही पळवाट उरली नव्हती. आज तब्बल ३१ वर्षांनी दिल्ली हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करू या १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. याचं सगळं श्रेय प्रवीण जैन यांना जातं.

हे शक्य झालं ते प्रवीण जैन यांच्या प्रसंगावधानामुळे. वेळीच जर त्यांनी धोका पत्करून हाशिमपुरा भागात प्रवेश केला नसता तर कदाचित ही केस आणखी काही दशकं रखडली असती. प्रवीण जैन यांच्या हिमतीची खरंच दाद द्यायला हवी.

आता प्रत्यक्ष प्रवीण जैन यांच्या तोंडून ऐकुया त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required