computer

होळीसाठी बनवा घरच्या घरी नैसर्गिक रंग...बरचसं साहित्य घरीच मिळेल पाहा !!

उद्या धुळवड आहे मंडळी. धुळवडीसाठी पहिली तयारी ही रंगाची असते. बाजारात तसे हवे तेवढे आणि हवे ते रंग मिळू शकतात, पण समस्या अशी असते की हे रंग रासायनिक असतात. रासायनिक रंगांनी जळजळ, अॅलर्जी, पोटाचे विकार उद्भवू शकतात. हे सगळं माहित असूनही लोकांची पसंती रासायनिक रंगांनाच असते, कारण रसायनीक रंग सहज उपलब्ध असतात आणि कमी खर्चिक पण असतात.

राव खरी गोष्ट तरी अशी आहे की रासायनिक रंगांच्याच खर्चात तुम्हाला नैसर्गिक रंग तयार करता येऊ शकतात. तेही अगदी सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी. कसं  ? ते आज बोभाटा तुम्हाला सांगणार आहे. चला तर या खास टिप्स पाहून घ्या.

नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी काही निवडक वनस्पतींचा वापर करता येतो. उदाहरणार्थ - झेंडू, गुलाब, बेडका, डाळींबसाल, शेंद्री, पळस, काटेसावर, पालक, पुदीना, बीट, कडूलिंब, मेंहदी, निलमोहर, बहावा, बारतोंडी, हिरडा, धायटी, पांगरा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, जांभूळ, टोमॅटो, गोकर्ण, शेवगा, गाजर, कडीपत्ता, इत्यादी.

आता एकेक करून रंग कसा तयार करायचा ते पाहू.

१. हिरवा रंग

हिरवा रंग तयार करण्यासाठी कडूनिंबाची पानं, मेंदीची पूड, गुलमोहराची वाळलेली पानं, पालक, कोथिंबीर, पुदिना किंवा टोमॅटोच्या पानांचा वापर करता येतो. यापैकी कडूनिंबाची पानं चेहऱ्यासाठी गुणकारी असल्याने त्याचा आपल्याला दुहेरी फायदा मिळतो. कडूनिंबाची पानं आणि पीठ एकत्र करून हिरव्या रंगाची भुकटी तयार करता येते.

२. लाल रंग

रक्तचंदनाच्या सालीपासून लाल रंग तयार करता येतो. गुलालला हा एका चांगला पर्याय असू शकतो. बीट पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो. पाण्याचं प्रमाण वाढवल्यास गुलाबी रंग पण तयार करता येऊ शकतो. याखेरीज जास्वंदाची वाळलेली फुले आणि सेंद्रिच्या बियांचा पण तुम्ही वापर करू शकता.

३. पिवळा रंग

हळद आणि मक्याचं पीठ किंवा बेसन एकत्र करून पिवळ्या रंगाची पेस्ट तयार करता येते. या पेस्टने धुळवड खेळल्यास त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेला फायदा होतो. बेसन आणि मक्याच्या पिठाला पर्याय म्हणून मैदा, तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरता येऊ शकते. याव्यतिरिक्त अमलताश वनस्पतीची फुले, बाभळीची फुले, पिवळ्या झेंडूची फुले वाळवून बारीक करून भुकटी तयार केल्यास पिवळा रंग मिळतो.

पिवळा हर्बल रंग बनवण्यासाठी २०० ग्राम अरारोटची भुकटी, १०० ग्राम हळद, ५० ग्राम पिवळ्या झेंडूची फुले, २० ग्राम संत्र्यांच्या साली, २० थेंब लिंबाचे तेल एकत्र करून पिवळा हर्बल गुलाल तयार होतो. 

४. निळा रंग

निळा जास्वंद आणि जकरांडाच्या फुलांपासून निळ्या रंगाची भुकटी तयार करता येते. गुलाबी कचनार या वनस्पतीच्या फुलापासून आणि बीट पासून निळ्या रंगाचे द्रावण तयार होते.

५. केसरी/नारंगी रंग

केसरी रंग तयार करण्यासाठी झेंडूची फुले चांगला पर्याय आहेत. याशिवाय पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करता येऊ शकतो. यासाठी १०० ग्राम पळसाची फुले जवळ जवळ एक बादली पाण्यात उकळून किंवा नुसती भिजवून ठेवावीत. सकाळी त्यातला अर्क बाहेर काढावा किंवा अर्क पाण्यात आणखी मिसळल्यास गर्द केसरी रंग तयार होतो. होळीच्या काळात पळसाची फुले भरपूर मिळत असल्याने तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात रंग तयार करता येतो.

६. काळा रंग

काळा रंग तयार करण्यासाठी आवळ्याची फळे रात्रभर भिजवून सकाळी त्यात पाणी टाकल्यास काळा रंग तयार करता येतो.

कोरडी होळी खेळण्यासाठी

(फूड कलर)

वरती दिलेल्या पर्यायांमध्ये जिथे शक्य आहे तिथे वाळलेल्या पानांचा किंवा फुलांचा वापर कोरड्या होळीसाठी होऊ शकतो. आणखी एका भन्नाट कल्पनेने तुम्ही कोरडा रंग तयार करू शकता. पिठात योग्य प्रमाणात फूड कलर मिसळून २ चमचे पाणी टाका. तयार झालेली पेस्ट कोरडी होऊद्या. या पेस्टला वाटून कोरडा रंग तयार होतो.

राव आता पटापट कामाला लागा. उद्याची धुळवड नैसगिक रंगाने होऊन जाऊ द्या !!

बोभाटा तर्फे सर्व वाचकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा !!

 

 

आणखी वाचा :

होळी स्पेशल : थंडाई बनवण्याची रेसिपी बघून घ्या राव !!

शिनिमात दिसतं येक आणि आमचं असतं येक! तुमी बी आसलीच होळी खेळता का??

सबस्क्राईब करा

* indicates required