computer

इंका या प्राचीन संस्कृतीत 'ही' भयानक परंपरा अस्तित्वात होती.

इतिहासाच्या उदरात नेमके काय दडले आहे याची कल्पना माणसाला तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत पुरातत्त्व संशोधक हे जगासमोर आणत नाहीत. पुरातत्त्व संशोधक अनेक अज्ञात रहस्यं जगासमोर आणतात. नुकताच अशाच एका रहस्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि पेरूमध्ये अस्तित्वात असलेल्या इन्का संस्कृतीतल्या एका धार्मिक प्रथेविषयीची मन हेलावून टाकणारी गोष्ट उघड झाली

पेरूमधील अँडीज पर्वतराजीत इन्का संस्कृती विकसित झाली.या संस्कृतीच्या आपल्या स्वतःच्या अशा प्रथा परंपरा होत्या. देवदेवतांना संतुष्ट करून घेण्यासाठी, निसर्गाचा प्रकोप होऊ नये म्हणून किंवा नैसर्गिक संकट येऊ नयेत म्हणून नरबळी देणं ही अशीच एक प्रथा.हा नरबळी देण्यासाठी  मुख्यतः  लहान मुलांचा वापर होत असे. कॅपाकोचा या नावाने त्यांच्यात प्रसिद्ध असलेला हा विधी समारंभपूर्वक केला जायचा. यामध्ये मुलांचा बळी देण्यासाठी चार पद्धती वापरल्या जायच्या. गळा दाबून मारणं, डोक्यावर एखाद्या अवजड हत्याराने प्रहार करणं, जिवंत पुरणं आणि श्वास कोंडणं.

पेरू मधल्या ॲम्पॅटो या ज्वालामुखीच्या परिसरात शास्त्रज्ञांना काही लहान मुलांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर झालेल्या उत्खननामधून या रहस्यावरचा पडदा दूर झाला. ही मुलं कोण? ती कशाने गेली? या सगळ्याचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासादरम्यानच असं आढळून आलं की या मुलांना मरण्याच्या आधी गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र उघड होऊ शकलं नाही. मात्र हे एवढ्यावरच थांबलं नाही. पुरातत्व संशोधकांना याच अँडीज पर्वतरांगांमध्ये एका किशोरवयीन मुलीचे अवशेष मिळाले. तिचे रंगीबेरंगी अल्पाका लोकरीचे कपडे, काळे केस, दात आणि नखं व्यवस्थित शाबूत होती. मात्र तिचा चेहरा मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. पण त्या चेहऱ्याला जिवंतपणा आणि आकार प्राप्त करून देण्याचं आव्हान माणसाने स्वीकारलं आणि ते पूर्णत्वालाही नेलं.
 

जुआनिता ऊर्फ लेडी ऑफ ॲम्पॅटो असं टोपणनाव ठेवल्या गेलेल्या या ममीच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशोधकांनी तिच्या अवशेषांचा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार  मृत्यूच्या वेळी तिचं वय अंदाजे १३ ते १५ वर्षं होतं आणि १४४०-५० या काळात तिचा मृत्यू झाला होता. तिची अंदाजे उंची ४ फूट ६ इंच होती आणि वजन अंदाजे ७७ पौंड होतं. ती इन्का जमातीची होती. इतकंच नाही तर या ममीच्या सिटीस्कॅनमधून त्यांनी मृत्यूचं कारण शोधून काढलं. डोक्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. तिच्या चेहऱ्याची पुनर्रचना करण्याचं काम स्वीडनचा शिल्पकार आणि पुरातत्त्व संशोधक ऑस्कर निल्सन याने केलं. तिचा चेहरा तयार करण्यासाठी त्याने जवळपास ४०० तास अथक परिश्रम केले. पेरूच्या अरेकिप्पा येथील ॲंडियन अभयारण्य संग्रहालयात तात्पुरत्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून ही ममी ठेवण्यात आली आहे.

जोहान रेन हार्ड १९९५ मध्ये या ममीचा शोध लावणाऱ्या टीमचा सदस्य होता. हा पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाई. तयार झालेल्या चेहऱ्याबद्दल या बेट्याने मांडलेलं मत ऐकल्यावर निल्सन याच्या शिल्पकलेच्या अत्युच्च दर्जाची कल्पना येते. त्याच्या म्हणण्यानुसार तिचा तयार केलेला चेहरा हा इतका हुबेहूब होता, की जिवंत असताना ती कशी दिसत असेल? याची चेहऱ्यावरून कल्पना येऊ शकते.

काही पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते इन्का संस्कृतीतील कॅपाकोचा या धार्मिक विधी दरम्यान या मुलीचा बळी देण्यात आला होता. या विधीला या संस्कृतीत अतिशय महत्त्व होतं. या मुलांचं बलिदान म्हणजे त्या मुलांचा खरा मृत्यू नसून ही मुले त्यांच्या पूर्वजांच्या बरोबर जमिनीवर लक्ष ठेवण्याचं काम करतात असा विश्वास इन्का लोकांमध्ये होता.पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तिच्या समुदायाने कदाचित तिची निवड केली असावी. त्यांच्या मते ही निवड तिच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब होती. तिची राख जवळच सापडल्यामुळे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तिचा बळी दिला गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

ही गोष्ट वाचल्यानंतर अनेकांना आजच्या काळातही अधून मधून  असलेल्या लहान मुलांचा बळी देण्याच्या अघोरी  गुन्ह्यांच्या बातम्यांची आठवण झाली असेल आणि मनावर हलकासा का होईना ओरखडा उमटला असेल.


- राधा परांजपे

सबस्क्राईब करा

* indicates required