computer

भारतीय लष्करात दिली जातात ही सन्मानाची पदके, तुम्हांला यातली किती माहित आहेत?

तुम्हांला माहित आहेच की भारतात सर्वोच्च मान हा 'भारतरत्न' या किताबाला आहे. त्यापुढे मात्र नागरी आणि लष्करी किताब हे वेगवेगळे मानले जातात. तुम्हांला परमवीरचक्र, अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र अशी काही नावं ऐकून माहित असतील, पण त्यातलं कोणतं मोठं? त्यांची उतरंड काय वगैरे माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच असते असे नाही. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतीय लष्करातल्या शौर्य पदकांबद्दलची माहिती.. 

(सावित्रीबाई खानोलकर)

यातली बरीचशी पदकं, म्हणजेच अशोकचक्र, महावीरचक्र,  परमवीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र, वीरचक्र यांचं संकल्पनाचित्र बनवलं आहे सावित्रीबाई खानोलकरांनी. मूळच्या स्वित्झर्लंडच्या या बाई भारतात आल्या आणि 'चुकून युरोपात जन्माला आले' म्हणण्याइतक्या भारतीय झाल्या. त्यांचा हिंदू संस्कृती आणि प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास पाहाता या पदकांच्या डिझाईनचं काम त्यांनाच देण्यात आलं होतं.

१. परमवीर चक्र (आरंभ- ३ नोव्हेंबर १९४७)

लष्करात सर्वात मोठं समजलं जाणारं परमवीर चक्र हे पदक कांस्य धातूत बनवलेलं आहे. त्याच्या मध्यभागी उठावदार वर्तुळावर भारताची राजमुद्रा आहे, तर चारही बाजूंना चार तलवारी आहेत. या तलवारी शिवरायांच्या भवानी तलवारीचं प्रतिनिधित्व करतात असं पूर्वी म्हटलं जायचं. पण खरं तर ते इंद्राचं वज्रास्त्र चार बाजूंनी लावलेलं दिसतं.   या पदकाला ३२मिलीमीटरची जांभळी रिबन लावलेली असते. 
जर समजा, एखाद्या व्यक्तीस एकदा परमवीरचक्र मिळालं आणि पुन्हा त्या व्यक्तीने परमवीरचक्र मिळण्यासारखी मोठी कामगिरी केली, तर त्या रिबिनला एक 'अधिक' बार लावला जातो.

(परमवीर चक्र पदकाचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा-स्रोत

योगायोगानं पहिलं परमवीर चक्र सावित्रीबाई खानोलकरांचे जावई मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आलं होतं. 

आजवर एकून २१ लोकांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

२. अशोकचक्र (आरंभ- १९५२)

परमवीर चक्राच्या खालोखाल हा मान जातो अशोक चक्राकडे. हा किताब शांततेच्या काळात दाखवलेल्या शौर्य, धाडस आणि त्याग या गोष्टींसाठी दिला जातो.  तसे पाहता परमवीर चक्र आणि अशोक चक्र एकाच पात्रतेचे मानले जातात, फरक इतकाच की परमवीर चक्र हे शत्रूसोबत लढतानाच्या अतुलनीय शौर्याबद्दल दिलं जातं, तर अशोक चक्र हे शत्रू आणि युद्धभूमीपासून दूर असताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी दाखवलेल्या शौर्यासाठी दिलं जातं. 

हा मान लष्करी अधिकारी किंवा भारतीय नागरिक अशा दोघांनाही दिला जाऊ शकतो. या पदकावर अर्थातच, एका बाजूला अशोक चक्र तर दुसऱ्या बाजूस अशोक चक्र असं देवनागरी-इंग्रजीत लिहिलं आहे. यालाही ३२ मिलीमीटर लांबीची मध्ये केशरी पट्टा असलेली हिरवी रिबन लावलेली असते.

( फ्लाईट लेफ्टनंट सुहास बिस्वास -  स्रोत)

पहिलं अशोक चक्र मिळण्याचा मान फ्लाईट लेफ्टनंट सुहास बिस्वास यांच्याकडे जातो. ३ फेब्रुवारी १९५२ रोजी त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला आणि त्याला आग लागली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो विफल ठरला. अखेर त्यांनी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामगिरीसाठी त्यांना अशोक चक्राने गौरवण्यात आलं होतं. 

पूर्वी अशोकचक्राच्या तीन वर्गवाऱ्या म्हणजेच अशोक चक्र वर्ग -१,अशोक चक्र वर्ग -२ आणि अशोक चक्र वर्ग -३ अशा होत्या. कालांतराने सुमारे १९६७पासून या तीन वर्गवाऱ्यांना अशोक चक्र, किर्ती चक्र आणि शौर्य चक्र म्हणण्यात येऊ लागलं. 

आजवर एकून ८३ लोकांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

३. महावीर चक्र (आरंभ- ऑक्टोबर १९४७)

हा सन्मान जल, वायू अथवा पृथ्वी अशा कोणत्याही ठिकाणी शत्रूविरुद्ध दाखवलेल्या अपार शौर्याबद्दल दिला जातो. 
हे पदक चांदी या धातूपासून बनवलेलं असतं. एका बाजूला पाच टोकं असलेली आणि ती टोकं पदकाच्या किनारीला टोचतील अशी असणारी चांदणी या पदकाच्या एका बाजूस असते, तर दुसऱ्या बाजूला महावीर चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं. या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलेलं असतं.   या पदकाला जोडणारी रिबिन अर्धी पांढरी, तर अर्धी नारिंगी रंगाची असते. 
१९७१च्या भारत-पाक युद्धात हे पदक सर्वाधिक, म्हणजेच ११ लोकांना देण्यात आलं होतं. इतर पदकांप्रमाणं हे पदक त्याच व्यक्तीस दुसऱ्यांदाही तशाच शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल दिलं जाऊ शकतं. आजवर ६ लोकांना हा सन्मान दोनवेळा प्राप्त झाला आहे. 

(लेफ्टनंट कर्नल दिवान रंजीत राय -  स्रोत )

महावीर चक्र मिळण्याचा पहिला मान जातो लेफ्टनंट कर्नल दिवान रंजीत राय यांच्याकडे. १९४७च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सेनेने काश्मीर खोऱ्याचं मोठ्या शर्थीनं रक्षण केलं होतं. या युद्धादरम्यान दिवान रंजीत राय शहीद झाले आणि त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. 

आजवर एकून २१८ लोकांना महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

४. किर्ती चक्र (नामकरण - २७ जानेवारी १९६७)

हे पदकही चांदी या धातूपासून बनवलेलं असतं. पूर्वीच्या अशोक चक्र वर्ग-२चं नामकरण किर्ती चक्र असं झालं आहे. म्हणजेच अशोक चक्राप्रमाणे हा सन्मानही शत्रूशी लढण्यासाठी नव्हे, तर इतर वेळी शौर्य दाखवून शांतता प्रस्थापित करण्याच्या अत्यंत अवघड कामगिरीकरता देता येतो. 
या पदकावर मधोमध अशोक चक्र व सभोवती कमळ फुले आणि कळ्यांचं कडं रेखलेलं असतं. तर पाठच्या बाजूस देवनागरी आणि इंग्रजीमध्ये किर्ती चक्र लिहिलेले असते. या दोन्ही भाषांच्या अक्षरांच्या मध्ये दोन कमळं असतात. 
या पदकाला जोडणारी रिबिन हिरव्या रंगाची असते. मात्र, दोन उभ्या नारिंगी रंगांच्या रेघांनी या हिरव्या  रंगाच्या पट्टीचे तीन समान भाग केलेले असतात. 

( कॅप्टन जोगिंदरसिंग घराया - स्रोत )

कॅप्टन जोगिंदरसिंग घराया यांना हा पुरस्कार सर्वात पहिल्यांदा देण्यात आला होता. १९४८मध्ये आपल्या तुकडीसोबत जोगिंदरसिंगजी जात असताना त्यांचा सामना रझाकारांच्या दोन ट्र्कसोबत झाला. अपुऱ्या बळानिशी जोगिंदरजींनी त्यांना लढत दिली आणि एकूण चौदा रझाकारांना त्यांनी कंठस्नान घातले. सशस्त्र रझाकारांविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी पोलिसांना दिलेलं सहकार्य, प्रसंगी जीवाची पर्वा न करता हस्तक्षेप करणे आणि नेहमी आनंदी व्यक्तीमत्व या सर्व गोष्टींनी त्यांची इतरांवर छाप पडत असे. त्यांच्या याच अतुलनीय शौर्यासाठी भारत सरकारने पहिला किर्तीचक्र पुरस्कार कॅप्टन जोगिंदरसिंग घराया यांना दिला. 

आजवर एकून ४५८ लोकांना किर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

५. वीर चक्र (आरंभ- १९५०)

हे पदकसुद्धा चांदी या धातूपासून बनवलेलं असतं. एका बाजूला पाच टोकं असलेली आणि ती टोकं पदकाच्या किनारीला टोचतील अशी असणारी चांदणी या पदकाच्या एका बाजूस असते. या चांदणीच्या मधोमध अशोकचक्र आणि अशोक चक्रावर भारताची उठावदार राजमुद्रा असते,  तर दुसऱ्या बाजूला वीर चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं. या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलेलं असतं.   या पदकाला जोडणारी रिबिन अर्धी निळी आणि  अर्धी नारिंगी रंगाची असते. 

(लेफ्टनंट कर्नल हिरानंद -स्रोत )
लेफ्टनंट कर्नल हिरानंद यांना हा पुरस्कार प्रथमत: देण्यात आला होता. त्यांना हा पुरस्कार जम्मू काश्मिरमध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल मिळाला होता. 

आजवर एकून १३२२लोकांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

 

आजवर एकून १३२२ लोकांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

६. शौर्य चक्र (आरंभ -१९५२, नामकरण - १९६७)

पूर्वीच्या अशोक चक्र वर्ग-३चं नामकरण शौर्य चक्र असं झालं आहे. म्हणजेच अशोक चक्राप्रमाणे हा सन्मानही शत्रूशी लढण्यासाठी नव्हे, तर इतर वेळी शौर्य दाखवून शांतता प्रस्थापित करण्याच्या अत्यंत अवघड कामगिरीकरता देता येतो. 
कांस्य धातूपासून बनलेल्या या गोलाकार  पदकावर  एका बाजूला  मधोमध अशोक चक्र आणि त्यासभोवती कमळाची महिरप असते तर दुसऱ्या बाजूस शौर्य चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीत लिहिलेलं असतं.  या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलेलं असतं.  या पदकाला लावलेली रिबिन हिरव्या रंगाची असते, मात्र तीन उभ्या केशवी पट्ट्यांनी त्या हिरव्या रंगाला चार भागांत विभागलेलं असतं.

( मेजर पी. एस. गहून - स्रोत )
मेजर पी. एस. गहून यांना प्रथमत: शौर्य पुरस्कार देण्यात आला होता. १९४८च्या हैदराबादेत झालेल्या पोलिस कारवाईमधल्या त्यांच्या शौर्यपूर्ण सहकार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.

आजवर एकून १९९७ लोकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 
 

सबस्क्राईब करा

* indicates required