आंतरराष्ट्रीय योग दिन : कोण आहेत योग दिनाचे खरे शिल्पकार ? जाणून घ्या !!

'योग' हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा असून तो जगातील समस्त मानवजातीसाठी आहे. युनोने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर केल्यापासून योगदिन हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील जवळपास सर्वच देशांत साजरा केला जातो आहे! ही बाब सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची आहे !

आज भारतीय प्राचीन 'योगविद्या' जगाचा वारसा म्हणून ओळखली जाते आहे, युनायटेड नेशन्स म्हणजे युनो या विद्येचा सन्मान करत आहे, ही युनोच्या आणि योगाच्याही मोठेपणाची साक्ष आहे.
पतंजली ऋषींच्या 'योगदर्शन' या ग्रंथात योगाचे महत्व केवळ शरीरस्वास्थ्यासाठी नाही, तर आत्मशुद्धीसाठी देखील आहे. भारतीय परंपरेनुसार समाधीयोग साधन मानून स्थितप्रज्ञ होणे महत्वाचे मानले गेले आहे. योगविद्येचा मुळ उद्देश चित्तशुद्धी हाच आहे !

स्रोत

चित्तशुद्धीविना केलेला योग म्हणजे निव्वळ एक दिवशीय उत्सवाचे दांभिक प्रदर्शन ठरेल! प्रत्यक्ष विठ्ठलाला योगेश्वर म्हणून नामस्मरण करणारे संत तुकाराम म्हणतात....

चित्त शुद्ध तरी । शत्रू मित्र होती ।
व्याघ्र ही न खाती । सर्प तया।।

आज २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून युनोकडून मान्यता मिळण्यास विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाची भुमिका बजावलेली आहे, पण फार पुर्वीच योगविद्येचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले गेले होते. याचे संपूर्ण श्रेय योगी अरविदबाबू यांना जाते !

स्रोत

आधुनिक कालखंडात योगाचे महत्व आध्यत्मिक स्वरुपात मांडणारे महान भारतीय सुपुत्र 'योगी अरविंद घोष' त्यांच्या 'The Synthesis of Yoga and The Life Divine" या ग्रंथात म्हणतात, मानवी मनातील 'षडरिपूं'चे समूळ उच्चाटन होवून 'चित्तशुद्धी' होणे ,हाच योगाचा मुख्य हेतू आहे, यालाच त्यांनी 'अंतर्योग' म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांतीकारक म्हणून योगदान दिले आणि कारावासही भोगला. परंतु कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांनी योगविद्या आत्मसात करण्यासाठी राजकारण पुर्णत: त्यागले. पाँडिचेरी ही फ्रेंचाची वसाहत असल्यामुळे त्यांनी तेथेच आश्रम निर्माण करून योगसाधना केली आणि योग पाश्चात्य राष्ट्रांत स्वतंत्र स्वरुपात मांडला. त्यातूनच तो अधिक लोकप्रिय झाला. जागतिक पातळीवर भारताला एक नवी ओळख करून देण्याच्या काळात अरविंदबाबुंच्या योगप्रसाराच्या कार्याचे महत्व अनन्य साधारण असे आहे.

स्रोत

योगविद्येचे सामर्थ्य जाणणाऱ्या योगी अरविंद यांचे विचारदर्शन, विश्वव्यापक होते. ते म्हणतात "If a religion is not universal, it cannot be eternal. A narrow religion, a sectarian religion, an exclusive religion can live only for a limited time and a limited purpose" या शब्दांत त्यांनी संकुचितवृत्तीस धिक्कारले आहे. वेद, उपनिषद, गीता आणि अष्टदर्शने यांना त्यांनी विश्वव्यापक स्वरूपात प्रकट केले! आधुनिक काळातील महान तत्वज्ञानी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

योगविद्येला केवळ हिंदु धर्माचे प्रतिक न मानता, भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आणि समस्त मानव जातीच्या चित्तशुद्धीच्या साधनांच प्राचीन भारतीय प्रतिक म्हणून त्याचा प्रचार प्रसार केला तर, 'योग' आज आहे त्यापेक्षाही अधिक विश्वव्यापक होऊ शकतो. योगींच्याच शब्दांत सांगायचे तर...

"The Divine Truth is greater than any religion or creed or scripture or idea or philosophy"

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्व बोभाटाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !!

 

लेखक : राज कुलकर्णी.

सबस्क्राईब करा

* indicates required