बिहारमध्ये दारुबंदीमुळं वाढलाय महागड्या साड्यांचा खप!! किती? विश्वास बसणार नाही, इतका!!

कशामुळं काय होईल हे प्रत्यक्ष देव जरी धरतीवर अवतरला तरी त्यालाही सांगता यायचं नाही. पण यावेळचा बदल जाम सुखद आहे मंडळी. बिहारमध्ये दारुबंदी झाली तेव्हा बऱ्याच जणांनी तिला विरोध केला होता. नाहीतरी ज्याला किंवा जिला प्यायचीच आहे, त्यांना दारुबंदीमुळं काही फरक पडत नाही. फक्त जास्त दराने आणि आणखीच जरा जास्त चोरुन प्यायला लागते, इतकंच. 

असो, तर बिहारमध्ये एप्रिल २०१६पासून दारुबंदी लागू झाली. तिचा नक्की कसा आणि काय परिणाम झाला आहे हे पाहण्यासाठी एक सर्व्हे केला गेला. हा सर्व्हे एशियन डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिटयूट आणि शासनपुरस्कृत संस्था - डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं केला गेलाय.

या सर्व्हेचं म्हणणं आहे की आता महागड्या साड्यांचा खप १७५१% वाढलाय. म्हणजे  पूर्वी जिथं १०० साड्यांची खरेदी व्हायची, तिथं आता १७५१ साड्या खरेदी केल्या जातात. आणि त्यासुद्धा साध्या नाही, तर महागड्या साड्या!! आहात  कुठं?  फक्त साड्याच नाही, तर महागड्या ड्रेस मटेरियलच्या खरेदीचं प्रमाण ९१०%नी वाढलंय. 

इतकंच नाही, तर आता बिहारमध्ये मधाच्या खरेदीचं प्रमाण ३८०% नी तर चीज खरेदीचं प्रमाण आधीच्या दुप्पट झालंय, म्हणजेच २००%नी वाढलंय. तसंच फर्निचर, तयार अन्नपदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीतही आधीच्या तुलनेत बरीच वाढ झालीय. 

मग, आहे की दारुबंदी चांगली? ज्या बायकांनी अशा मस्त मस्त साड्या आणि ड्रेस मटिरियल घेतले असतील, त्या तर नक्कीच "माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारु, बाई देव पावलाय गो" म्हणत असतील नाही??

सबस्क्राईब करा

* indicates required