हा मासा विना अन्नपाण्याचा आणि तेही  चक्क जमीनीखाली काही वर्षं राहतो!!

Subscribe to Bobhata

आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात  पाण्याशिवाय चक्क काही वर्षं राहू शकणारा मासा सापडतो. हा आहे गोड्या पाण्यात राहणारा सॅलामँडर नावाचा मासा. पण त्याला या नावानं ओळखण्याशिवाय लंग फिश किंवा चिखलात सापडतो म्हणून मडफिश अशा सुटसुटीत नावानं ओळखलं जातं. 

याला लंग फिश का म्हणतात?
लंग म्हणजे फुफ्फुस. या माशाची फुप्फुसं इतकी विकसित झालेली असतात, की तो आपल्यासारखा थेट हवेतून प्राणवायू घेऊ शकतो. पाण्यात असतानाही तो पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वासोछवास करतो. त्यांच्या काही जाती तर जशजशा वयानं मोठ्या होतात, तसतशा कल्ल्यांमधून श्वास घेणंच बंद करतात. आणि या प्रकारचे मासे  पूर्णवेळ पाण्याखाली राहिले तर गुदमरुन मरतात म्हणे!! आहे की नाही गंमत?

हा जमिनीच्या खाली का आणि कसा जातो?
हा लांबोळका मासा तसा पाण्यातच राहातो. तेव्हा मग लहान मासे, शंख-शिंपल्यांमधले जीव खातो. जेव्हा तिथं पाणी आटू लागतं, हा आपला चिखलात खोलखोल जात राहातो. तेव्हा तो तोंडानं चिखल खातो आणि कल्ल्यांमधून बाहेर सोडत राहातो. जेव्हा तो त्याला हव्या त्या खोलीला जाऊन पोचतो, तेव्हा तो शरीरातून एकप्रकारचा द्रवपदार्थ सोडतो आणि शरीराभोवती एकप्रकारचा कोश बनवतो. त्या कोशात त्याचं पूर्ण शरीर असतं, तोंड मात्र कोशाबाहेरच असतं. मग तो हळूहळू आपल्या हालचाली मंदावतो आणि शेपटीतल्या स्नायूंमधल्या टिश्यूंवर तो जगतो. या सुप्तावस्थेत तो अनेक दिवस, महिने राहू शकतो. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो अशा अवस्थेत चार वर्षंदेखील राहू शकतो. जेव्हा त्या जागेत पुन्हा पाणी येतं, हा लंगफिश कोशाच्या बाहेर येतो आणि पुन्हा पाण्यात बागडायला लागतो. 

हा पाहा असा तो जमिनीखाली जातो आणि आपला कोश बनवतो..

स्रोत

काही लोक हा मासा चिखलातून शोधून खातातदेखील. पण हा जरा उग्र चवीचा असल्यानं सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही.  वरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाह्यलंच आपल्या कोशात लपलेला लंगफिश कसा पकडतात ते!!

 

निसर्ग कसा चमत्कारिक गोष्टींनी भरलाय, नाही का?


 

सबस्क्राईब करा

* indicates required