computer

या शेतकऱ्याला त्याच्या वांग्याला पत्र लिहावंसं का वाटतंय?? पाहा बरं काय म्हणतोय त्याच्या वांग्याला??

आपण आपल्या मित्रांचा वाढदिवस साजरा करतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करतो. काही त्यांच्याकडे कामाला असलेल्या लोकांचा वाढदिवस साजरा करतात आणि काही तर त्यांच्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करतात. आपल्याला पण त्यांचे खूप कौतुक वाटते. वाटायलाच पाहिजे कारण त्यांना त्या लोकांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल स्वतःच्या कुटुंबातील सदस्य अशी भावना असते. पण शेतात असलेला पिकाचा वाढदिवस साजरा करून त्या पिकाला पत्र लिहिणारा माणूस पाहिला आहे का मंडळी? नाही ना?

स्रोत

तर, आम्ही आज अश्याच एका शेतकऱ्याची ओळख करून देणार आहोत ज्याने आपल्या वांग्याच्या पिकाला पत्र लिहिले आहे. हे थोडं आश्चर्यकारक वाटते ना? पण त्याला कारण पण तसेच आहे मित्रांनो. भर दुष्काळात जेव्हा बाकीची पिके माना टाकत होते तेव्हा नंदुरबार जिल्ह्यातील कुंदन पाटील या शेतकऱ्याला वर्षभर चांगले वांगे आले. आणि त्याला दुष्काळी वर्षाची झळ बसली नाही. पाऊस कमी आणि वर्षभर रोगांची साथ असताना सुद्धा या वांग्याच्या पिकाने त्याची साथ सोडली नाही. तर मंडळी कुंदनने त्याच्या वांग्याला काय लिहिले आहे हे वाचण्याची उत्सुकता वाढली असेल तर जास्त उशीर न करता आम्ही ते पत्र खाली जसेच्या तसे देत आहोत.

                        माझ्या वांग्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

      " काय बोलावं माझ्या वांग्या तुझ्याबद्धल कारण आज बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले, आणि आजही तू पहिल्या दिवसासारखा टवटवीत आहेस. १९७२ सालच्या  खालोखाल २०१८/१९ चा नंदुरबार जिल्ह्याचा दुष्काळ, तरीही दुष्काळाची कळ मला जाणवलीच नाही. दोन दोन दिवस पाण्याला उशीर झाला, फवारणी उशिरा झाली, पण तरीही तु तुझा गुणधर्म हा सोडलाच नाही. माझ्या वांग्या पाचव्या ऐवजी सातव्या दिवसाला पाणी, फवारणी केली. मात्र वांगे तु तुझ्या बंधनानुसार पाचव्या दिवसालाच तोडणीवर आलं. किती सहन केलं रे तू आमच्यासाठी कसे आभार मानू वांगे तुझे.

          भाव असताना खुप खूष करायचास,आणि भाव नसताना नाराजही, तुझ्यासारखा सोबती नाही भेटला दुसरा आम्हाला आणि नाही त्या वेळेस तुझ्यासारखा शत्रूही नाही. कारण एखाद वेळी भाव नाही भेटायचा त्या वेळेस विचार यायचा की बस आता वांग्याची लागवड नाही करायची पण तुझ्यावाचून राहावले ही जात नाही. सालाबादप्रमाणे शेंडीअळी, फळअळी, बुरशी, मावा तुडतुडे असे इतर रोग असूनही तू मात्र स्वतः झेलत राहिला व तुझ्या उत्पादनावर फरकही नाही पडू दिला. वांग्यावर शेंडीअळी आणि फळअळी सारखा भयंकर रोग नाही या रोगांच्या तडाख्यात बाकीच्या शेतकऱ्यांचे हातचे वांगे जात असताना तु मात्र खंबीरपणे आमच्यासोबत उभा राहिला आणि तू तो रोगही शोषून घेतला, आणि तरीही तू आपल्या उत्पादनावर ठाम राहिला.    

          तीन आठवडे जर वांग्याला भाव नाही भेटला तर, तू एकाच आठवड्यात मागील तीन आठवड्याचे वजा करून गुणकारासहित सगळी कसर भरून द्यायचा. विहिरीला पाणी नसतानाही तू उन्हाचे चटके सहन करत तू आमच्या साठी आजही धडपडत आहे.तुझे खरच मनापासून खूप खूप आभार....

       या वर्षी पाण्याची ताण असल्या कारणामुळे तीन महिने उशिरा लागवड होईल, मात्र लागवड होईलच हे निश्चित .

ह्याच माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. "

              कुंदन पाटील
           वांग्याचा शेतकरी
          धन्यवाद 

 

वांग्याची गणना गरीब बिचाऱ्या भाजीच्या यादीत असते,वांगं म्हटलं की आवडणाऱ्या पेक्षा नाक मुरडणाऱ्यांची संख्याच जास्त असते. भरीत, भरली वांगी, वांग्याचे काप अशा रेसिपी लोकप्रिय आहेत पण निव्वळ वांग्याची भाजी म्हटलं की खाणाऱ्याचा मूडच खराब होतो.  उत्तर भारतात घरातील मुलगा बिघडण्याच्या मार्गावर असेल तर देवाला वांगे वाहतात. ज्याच्यात काही गुण नाहीत ते बेगुन म्हणजे बैंगन अशा अंगचे गुण नसलेल्या वांग्याला हॅपी बड्डे.

तर मंडळी जसे शेतकरी त्याच्या गुरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीव लावतो. त्याचप्रमाणे त्याच्या पिकावर देखील त्याचा मुलाप्रमाणे जीव असतो. तुम्ही शेतकरी असाल किंवा नसाल पण या पत्रातील शेतकऱ्याची भावना तुम्हाला निश्चित कळली असेल. आणि शेतकऱ्याची भावना जास्त लोकांना कळायला हवी म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करा.

 

आणखी वाचा :

एका शेतकऱ्याचा बैलगाडी ते मर्सिडिजपर्यंतचा प्रवास...वाचा एक प्रेरणादायी कहाणी !!

भारतातल्या या राज्यात कित्येक वर्षांपासून दुकानदारांशिवाय दुकानं चालत आहेत..

या कारणांमुळे यवतमाळमध्ये झालाय १८ शेतकऱ्यांचा मृत्यू...

पंतप्रधानांना पत्र – एका शेतकऱ्याचे मनोगत !

सबस्क्राईब करा

* indicates required