computer

महाराष्ट्रातल्या नरभक्षक चेटकिणींचा अजब खटला...या खटल्याबद्दल तुम्ही नक्कीच वाचलं नसणार !!

महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ डहाणूला घडलेल्या एका अजब खटल्याची ही कहाणी आहे. या खून खटल्यात सहा बायकांवरती एका आदिवासी तरुणाला मारून त्याचं मांसभक्षण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कहाणी तशी जुनी आहे म्हणजे १९५८ सालची आहे, पण भारत म्हणजे जादूटोणा भूतंखेतं आणि चेटकीण असा समाज असलेल्या पाश्चात्य जगताला आणि भारतातल्या त्यांच्या बगलबच्च्यांना ही बातमी फारच रोमहर्षक वाटत होती. पण त्यापूर्वी आपण जाणून घेऊया नक्की काय घडले होते.

डहाणूच्या जवळ असलेल्या “सूत्रकार” नावाच्या एका छोट्या खेड्यात घडलेली ही कथा आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेला हा भाग दाट जंगलांचा, पारशांच्या मोठमोठ्या वाड्यांचा आणि मूळ आदिवासींच्या निवासाचा आहे. उधना या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सूत्रकार हे गाव यायचे. एकदिवस सावंत नावाचे एक पोलीस हवालदार साप्ताहिक फेरी मारायला तिकडे आले आणि त्यांनी गावात काय घडतंय याची चौकशी केली. फारसं काही नव्हतंच पण एका पारशाच्या माळावरती माणसाची कवटी आणि हाडं बघण्यात आल्याचं एका आदिवासीने सांगितलं. पोलीस हवालदाराने ताबडतोब जागेला भेट दिली, पंचनामा केला. जमा झालेली हाडं आणि कवटी माणसाची आहे अशी खात्री झाल्यानंतर चौकशीचे सत्र सुरु झाले. ते मानवी अवशेष कोणाचे हा शोध घेताघेता पोलिसांनी त्या विभागातल्या बेपत्ता माणसांची यादी बनवायला घेतली आणि कळलं की वाज्या नावाचा एक आदिवासी बरेच दिवस दिसेनासा झाला आहे. पोलीस वाज्याच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याच्या बायकोनं वाज्या बरेच दिवस घरी नसल्याचं सांगितलं पण त्याबद्दल तिची काही तक्रारही नव्हती. शेवटी पोलीस ते पोलिसच त्यांनी त्यांच्या पद्धतीने वाज्याच्या दोन लहान मुलींची चौकशी केली आणि मोठ्या मुलीनं म्हणजे नवशीने अचानक विधान केलं की “तिने आणि इतरांनी वाज्याला मारून त्याचं मांस खाऊन टाकलं आहे.”

आता इतर म्हणजे कोण हे विचारल्यावर तिनं गावातल्या सुप्रसिद्ध चेटकिणीकडे बोट दाखवले. त्याकाळी गावात या सर्व स्त्रिया चेटकीण म्हणून नाव कमावून होत्या. गावात काहीही अभद्र घडलं तर ते कृत्य या चेटकिणींच आहे असंच गृहीत धरलं जायचं. सोबत गावातल्या तरुण मुलींना चेटकीण बनवण्याची दीक्षा पण या बायका द्यायच्या असा पण प्रवाद होता.

नवशी आणि तिची धाकटी बहिण पटेरी या दोघी शिकाऊ चेटकिणी होत्या. त्यांच्या अभ्यासक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे घरातल्या माणसाची हत्या करून त्याचे मांसभक्षण करणे. अशी माहिती या मुलींकडून कळल्यावर पोलिसांना फक्त वेड लागायचे बाकी होते.

दोन्ही मुलींनी त्यांच्या बापाला कसे मारले, रानात चूल पेटवून त्याच्या मांस कसे शिजवले हे दाखवण्यासाठी रानातली जागा आणि चूल पण दाखवली. पोलिसांनी आसपासची जमीन आणि राख यांचे नमुने पण गोळा केले. एकूण ६ जणींना अटक केली. या सहाजणींमध्ये २ वाज्याच्या आयाच होत्या. चक्रावून गेलेल्या पोलिसांनी जमेल तितके पुरावे कोर्टात दाखल करून सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक न्यायमूर्ती समोर चेटकिणीचे जबाब नोंदवण्यात आले. एका चेटकिणीचा त्यावर अंगठा घेण्यात आला. वाज्याला का मारलं या एका प्रश्नाचे सगळ्यांनी एकंच उत्तर दिले ते म्हणजे “तुमचा देव कोंबड खादा, आमचा देव माणूस खादा.”

खटला सुरु होण्याआधीच या प्रकरणाचा इतका गवगवा झाला होता की देशविदेशातील पत्रकार, स्थानिक बातमीदार यांच्या माध्यमातून नरभक्षक प्रकरणाची जाहिरातच झाली होती. त्यामुळे ही केस जेव्हा ठाण्यात सेशन कमिट झाली तेव्हा न्यायालयात भयंकर गर्दी झाली होती.

सर्व आरोपी गरीब आदिवासी समाजातले असल्यामुळे, त्यांचा जबाब आधीच हाताशी असल्यामुळे ही एक प्रकारची ‘ओपन अँड शट केस’ आहे असा सगळ्यांचाच समज होता. सेशन कोर्टाचे न्यायमूर्ती श्री. गटणे यांचा विचार मात्र असा होता की या सर्व आरोपींना त्यांचा बचाव करण्याची संधी मिळायला हवी. ही केस घेणार कोण ? आदिवासी गरीब असल्याने सरकारतर्फेच त्यांना वकील देण्यात आला. या वकिलांचे नाव “अॅडव्होकेट रमाकांत ओवळेकर”. (होय !! हे नाव तुमच्या ओळखीचं असेल कारण महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र. अंतुले यांना सिमेंट खटल्यातून निर्दोष मुक्त सिद्ध करणारे हेच ते रमाकांत ओवळेकर.)

एखाद्या खटल्याचा विचार करताना वकील आणि न्यायाधीश या दोघांनी कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ३ प्रमाणे कोर्टापुढे सादर केलेल्या घटनांचा एकत्रित विचार करून सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून पुराव्यावर विश्वास ठेवण्या इतकी परिस्थिती अस्तित्वात आहे किंवा काय याचा विचार करायचा असतो. या एका सिद्धांतावर हा खटला पुढे कसा चालला ते आपण बघूया.

(अॅडव्होकेट रमाकांत ओवळेकर)

खटल्याच्या पहिल्यादिवशी सहाही चेटकिणीना कोर्टासमोर उभे करण्यात आले तेव्हा त्यांचे दर्शनी रूप भयकारकच होते. त्यांची उंची जेमतेम ३ ते ३.५ फुट एवढी होती, नजर भेदक होत्या, केस पांढरे आणि विस्कटलेले होते. हसणं आणि बोलणं विकट होतं. एकूण रामसेच्या चित्रपटात शोभाव्यात असा त्यांचा अवतार होता.

न्यायाधीशांनी गुन्हा काबुल आहे का असं विचारल्यावर या बाया फक्त हसल्या, आपसात पुटपुटत राहिल्या आणि थोडं रागावून विचारल्यावर “नाहा” असं बोलून मोकळ्या झाल्या. पहिली साक्षीदार नवशी जेव्हा कोर्टासमोर उभी राहिली तेव्हा ती आदिवासी आहे यावर कोणाचा विश्वासच बसेना. लोकांच्या समोर उभी होती एक गोरीगोमटी, शेलाट्या बांध्याची, मंजुळ आवाजाची एक सुंदर तरुणी !!

नवशी आणि पटेरी या दोघीही अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात पाठवले होते. तिथेच या दोघींचा मेकओव्हर झाला होता. अर्थातच प्रथमदर्शनी झालेला आभास जेव्हा नवशीने प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली तेव्हा मातीच्या ढिगाऱ्यासारखा कोसळला. तिच्या म्हणण्याप्रमाणे ती आणि पटेरी दोघीजणी रोज रात्री नग्नावस्थेत घराबाहेर पडून जादूटोण्याचे शिक्षण घेत होत्या. दसऱ्याला हे शिक्षण पूर्ण झाल्यावर या शिक्षणाची समाप्ती घरातल्या माणसाच्या मांसाने करायची असते म्हणून वाज्याचा खून करून त्याचे मांस खाल्याचे तिने काबुल केले.

वरवर पाहता प्रचंड अंधविश्वासातून ही हत्या घडून आली असे दिसत होते पण उलट तपासणीत रमाकांत ओवळेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना जी उत्तरं या मुलींनी दिली त्यावरून वाज्याचा खून झाला किंवा नाही याबद्दलच कोर्टाच्या मनात शंका उत्पन्न झाली.

त्यादिवशी रात्री काय घडले असा प्रश्न विचारल्यावर नवशीने जे सांगितले ते असे की, त्यारात्री अंगावरचे कपडे फेडून त्यासर्वजणी वाज्या झोपला होता तिथे गेल्या त्यांनी वाज्याला सांगितले की तुझा बळी द्यायचा आहे तेव्हा त्याला सोबत यावे लागेल. सोबत दारूच्या २ बाटल्या घेऊन चेटकिणी जंगलात गेल्या. इतक्या दूर जंगलात हे सर्व रात्री कसे गेले असं विचारल्यावर नवशीने सांगितले की वाज्या आणि दोन म्हाताऱ्या चेटकिणींनी त्यांचा मूळ आकार एक फुटाचा केला आणि एका कुत्र्यावर काकडी आणि जमनी स्वार झाल्या. दुसऱ्या कुत्र्यावर आकार लहान केलेला वाज्या पण स्वार झाला आणि ही दिंडी जंगलात पोहोचली. तिथे गेल्यावर सर्वांनी दारू प्यायली आणि त्यानंतर वाज्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्यानंतर मंत्राने जमीन दुभंगण्यात आली त्यातून अग्नी बाहेर आला आणि चूल पेटवली गेली. त्याचे मांस एका पातेल्यात जमा करून शिजवण्यात आले. हे शिजलेले मांस खाल्ल्यावर नवशी आणि पटेरी पूर्ण चेटकीण झाल्याचा दाखला देण्यात आला. पुन्हा एकदा मंत्र म्हणून दुभंगलेली जमीन एकत्र करण्यात आली आणि कार्यक्रम संपला.

कोर्टासमोर हा जबाब जेव्हा देण्यात आला तेव्हा न्यायमूर्तींच्या लक्षात आले की आरोपी एका विकृत आणि विस्कळीत विचाराने भरलेले आहेत. त्यांचा जबाब ऐकून त्यावर न्यायपूर्ण भाष्य करावे असे काहीच नाही. रमाकांत ओवळेकरांनी यानंतर उपलब्ध पुराव्याची छाननी कोर्टासमोर केली.

१. सापडलेल्या कवटीत दात नव्हते किंवा दात असल्याचा पुरावा नव्हता. वाज्याच्या तोंडात सगळे दात होते. असे सरकारी वकिलाने आधीच सांगितले होते.

२. ज्या ठिकाणी हे अस्थि अवशेष सापडले होते ती जागा गावाची दफनभूमी होती. यामुळेच तिथे असे अवशेष सापडणे साहजिकच होते.

३. अस्थींवरती कोणत्याही वार केल्याचे, आघात केल्याचे दिसत नव्हते. चेटकिणींनी वाज्याचे तुकडे तुकडे केल्याचे म्हटले होते.

४. एका प्रेताचे मांस एका पातेलात मावेल हे अशक्य आहे. उरलेले मांस किंवा अवशेष पोलिसांना सापडले नव्हते.

५. थोडक्यात प्रेत म्हणावे असे काहीही पुरावे पोलिसांना मिळालेले नव्हते.

६. ज्या वाज्याचा खून झाला असे पोलिसांचे म्हणणे होते त्याला महिनोंमहिने गवत कापण्याच्या कामासाठी घर सोडून बाहेर राहण्याची सवय होती.

पुरावे समजूतदार माणसाच्या बुद्धीने बघावे हा दंडक अनुसरून कोर्ट अशा निर्णयवर आले की एका न घडलेल्या कपोलकल्पित खूनाच्या आरोपाखाली या आदिवासी स्त्रियांना अटक करण्यात आली आहे. हा विचार करताना स्थानिक न्यायाधीशासमोर जो कबुलीजबाब नोंदवण्यात आला होता त्या न्यायाधीशांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यांचे मत हे पूर्वग्रहदूषित असल्याचे कबूल केले. साहजिकच सर्व चेटकिणींची निर्दोष सुटका करण्यात आली. 

हा किस्सा सांगण्याचे काम बोभाटाने अशासाठी केले की समाजात अनेकवेळा आपण गैरसमजुतीचे चष्मे वापरून एकमेकांवरती आरोपप्रत्यारोप करत असतो. हे असे नसावे असे आम्ही नाही तर संत सांगून गेले आहेत. म्हणून या लेखाच्या शेवटी संतांचे ते वचन आम्ही पुन्हा देत आहोत.

कल्पनेची बाधा न हो कोणे काळी | हि संत मंडळी सुखी असो ||

 

 

संदर्भ :

पुस्तक : दॅॅट्स ऑल माय लॉर्ड

लेखक : अॅडव्होकेट रमाकांत ओवळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required