तो कामावर वेळेत पोहोचण्यासाठी ३२ किलोमीटर चालला आणि....पाहा शेवटी काय घडले ?

मंडळी, भारतात कामाच्या वेळा पाळणे अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे आपण इंडियन ष्टांडर्ड टाईमावर पोचण्यासाठी प्रसिध्द आहोत.  कितीही धावपळ केली तरी माणूस ५, १०, १५ मिनिटं उशिरा पोहोचतोच. आता यातही एक गंमत आहे.  ५ मिनिट म्हटलं की १० मिनिट उशीर आणि १० किंवा १५ मिनिट म्हटलं म्हणजे अर्धा तास उशीर होणार हे गृहीत धरून चालावं. असो, आज वेळेबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे, अमेरिकेतील एका कर्मचाऱ्याने ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी ३२ किलोमीटरचा प्रवास चक्क चालत केला आहे.

पण या कर्मचाऱ्याला तब्बल ३२ किलोमीटर का चालावं लागलं? चला जाणून घेऊया हा किस्सा आहे तरी काय...

तर, ही गोष्ट आहे ‘वॉल्टर कर्र’ या विद्यार्थ्याची. त्याचा ऑफिसचा पहिलाच दिवस होता आणि आदल्या रात्रीच त्याची कार बंद पडली. त्याने मित्रांना फोन करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मदत मिळाली नाही. मग त्याने आपला GPS चेक केला. त्याच्या घरापासून ऑफिसचं अंतर जवळ जवळ २० मैल म्हणजे ३२ किलोमीटर होतं. हे अंतर कापायला त्याला ७ तास लागणार होते. विश्वास बसणार नाही, पण त्याने खरंच चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

स्रोत

त्याने मध्यरात्री चालण्यास सुरुवात केली.  २२ किलोमीटर अंतर पूर्ण केल्यावर त्याला पोलिसांनी हटकलं. पण जेव्हा वॉल्टरने त्याच्या चालण्याचं कारण सांगितलं, तेव्हा पोलिसांनी स्वतः त्याची मदत केली. त्याला खायला दिलं व त्याला काही किलोमीटरपर्यंत आपल्या कारमधून सोडलं. मग वॉल्टरने पुन्हा चालायला सुरुवात केली.

शेवटीचे ६ किलोमीटर उरलेले असताना त्याला पुन्हा पोलिसांनी अडवलं. पण या पोलिसांना आधीच्या पोलिसांनी संपर्क साधून वॉल्टरला मदत करण्यास सांगितलं होतं. या वेळच्या पोलिसांनी मग वॉल्टरला कामाच्या ठिकाणी सोडलं. 

मंडळी, वॉल्टरला सकाळी ८ वाजता पोहोचून शिफ्टींगचं काम करायचं होतं. ज्या जोडप्याकडे तो हे काम करणार होता, त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून वॉल्टरची स्टोरी सांगितली. आणि बघता बघता ३०० हून अधिक लोकांनी ती शेअर केली.

कंपनीच्या मालकांनी सुद्धा ट्विट करून वॉल्टरचं कौतुक केलं. विशेष म्हणजे इथेच न थांबता त्यांनी वॉल्टरला आपली कार गिफ्ट केली. याहून मोठं बक्षीस काय असेल ?

 

मंडळी, वॉल्टर म्हणतो की, ‘हा वेडेपणा होता पण मला कामावर पोहोचणे भाग होते..’

सबस्क्राईब करा

* indicates required